उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी या तीन माजी मुख्यमंत्र्यांमधील एक साम्य म्हणजे, पराकोटीचा अहंकार आणि त्यातून झालेली राजकीय पीछेहाट. महाराष्ट्र, दिल्ली, प. बंगालसारख्या देशातील तीन महत्त्वपूर्ण राज्यांचे नेतृत्व करण्याची संधी या तिन्ही नेत्यांना मिळाली. पण, अखेरीस तिघेही ‘स्व-पतना’चे बळी ठरले.
उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी हे तिघे अनुक्रमे महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगाल राज्यांचे मुख्यमंत्री होते. आज ते मुख्यमंत्री नाहीत, हे सर्वांना माहीत आहे. निवडणुकांचा विचार करता, केजरीवाल आणि त्यांचा पक्ष हा दिल्लीची निवडणूक हरला. उद्धव ठाकरे आणि त्यांचे मित्रपक्ष महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले आणि ममता बॅनर्जीदेखील बंगालची निवडणूक जिंकू शकल्या नाहीत. हे तिघेजण निवडणूक का हरले, याचे चर्वितचर्वण खूप झालेले आहे. म्हणून, त्यात पुन्हा शिरण्याचे आपल्याला काही कारण नाही. पण, या तिघांमध्ये नेमक्या कोणत्या समान गोष्टी आहेत, हे बघणे नक्कीच मोठे रंजक ठरेल.
या तिघांमध्ये एक समान गुण आहे, तो म्हणजे सामान्य लोकांना झुलवत ठेवणार्या वक्तृत्व-शैलीचा. केजरीवालांनी त्यासाठी आपली प्रतिमा स्वच्छ, हाफ शर्ट घालणारा साधा माणूस अशी प्रयत्नपूर्वक केली. ममता बॅनर्जी नेहमी साध्या पांढर्या साडीत हवाई चप्पल घालून वावरल्या. उद्धव ठाकरे नेहमी कुर्ता-पायजम्यात दिसले.
उद्धव ठाकरे यांची भाषण-शैली म्हणजे, दोन हात आजूबाजूला पसरवायचे आणि भाषण करायचे. सुचतील तेवढे टोमणे मारायचे. ममता बॅनर्जींचे भाषण म्हणजे, हातात माईक आणि पूर्ण स्टेजभर एकपात्री प्रयोग करत फिरत भाषण करणे आणि केजरीवालांचे भाषण म्हणजे धूर्त नजर आणि लोकांना निष्क्रिय करणार्या योजनांची माहिती देणे.
या तिघांतील दुसरे साधर्म्य म्हणजे, पराकोटीचा मोदीविरोध. अरविंद केजरीवाल हे या तिघातील सर्वाधिक धूर्त. दिल्लीच्या राजकारणातील एक सत्य त्यांनी जाणले. ते म्हणजे, जर मला अखिल भारतीय प्रतिमा करायची असेल, तर नरेंद्र मोदी जे काय बोलतील आणि जे काय करतील, याचा मी सतत विरोध केला पाहिजे. मग लगेच बातमी तयार होते. माध्यमांत फोटो झळकतात. टीव्हीवर ‘लाईव्ह’ वक्तव्य दाखविले जाते. मोदींशी झुंज करणारा मीच आहे, अशी प्रतिमा ते रंगवीत राहिले. मद्य घोटाळ्यात ते तुरुंगातही गेले. पण, जाताना म्हणाले की, "मी मोदींच्या हुकूमशाहीविरुद्ध लढत असल्याने मला तुरुंगात पाठविले आहे, मद्य घोटाळ्यामुळे नव्हे,” हे केजरीवाल आहेत.
केजरीवालांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मोदींविषयी त्यांनी भविष्यवाणी केली- "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह २०२६चा अंत पाहू शकणार नाहीत. त्यांचे सरकार जाईल, असे माझे अंतर्मन मला सांगते.” वाचकांनी असा प्रश्न करू नये की, मोदी आणि शाहंचे काय होणार आहे? हे परमेश्वर ठरवेल. परंतु, उच्च न्यायालयात तुमच्या घोटाळ्याची केस चालू आहे, त्याचा निकाल लागून काय होईल? तेव्हा केजरीवाल कुठे असेल? याचा केजरीवालांनी विचार करावा.
ममता बॅनर्जी वारंवार म्हणत राहिल्या की, "आता शेवटची लढाई दिल्लीत लढायची आहे. मोदी आणि शाह यांना त्यांच्या पदावरून खाली खेचायचे आहे.” त्यांच्याच भाषेत सांगायचे तर, ‘आता दिल्लीत खेला होईल.’ केजरीवाल आणि ममता यांच्यात आणखी एक विलक्षण साम्य. अरविंद केजरीवाल म्हणत की, "दिल्लीत मला हरविण्यासाठी नरेंद्र मोदी यांना १०० जन्म घ्यावे लागतील” आणि ममताही म्हणत होत्या की, "बंगालमध्ये मला हरविणे शय नाही. परप्रांतीय नरेंद्र मोदी आणि शाह यांची जादू बंगालमध्ये चालणार नाही. आमी बेंगॉली छो.”
जवळजवळ हीच भाषा उद्धव ठाकरे यांची आहे - "महाराष्ट्रात ‘शाहगिरी’ चालणार नाही, ‘मोदीगिरी’ चालणार नाही.” त्यांना हेच सुचवायचे आहे की, "ते गुजराती आहेत. महाराष्ट्रात लुडबुड करणारे ते कोण?” असा याचा भाव आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे म्हणाले की, "या निवडणुकीत भाजप जिंकून येत नाही. त्यांचे शासनही येणार नाही, ही माझी गॅरंटी आहे.” मोदी तेव्हा ‘गॅरंटी’ हा शब्दप्रयोग करीत असत. मोदींना मारलेला हा टोमणा आहे. केजरीवालांपूर्वी उद्धव ठाकरेंनी केलेली भविष्यवाणी खरी झाली नाही. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत, महानगरपालिकांच्या निवडणुकीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धवसेनेचा पालापाचोळा झाला. बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जींना तीन आकडी संख्याही गाठता आली नाही.
या तिघांतील आणखीन एक साधर्म्य असे की, या तिघांचे एकेक राजकीय पक्ष आहेत. ते प्रादेशिक अस्मितेवर उभे आहेत. ममता बॅनर्जींची ‘बंगाली अस्मिता’, उद्धव ठाकरेंची ‘मराठी अस्मिता’ आणि दिल्लीची ‘हिंदी अस्मिता’ यावर हे पक्ष उभे आहेत. या तिन्ही पक्षांकडे शून्य राजकीय विचारसरणी आहे. जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे हयात होते, तोपर्यंत शिवसेनेकडे हिंदुत्वाची विचारधारा होती. उद्धव ठाकरे आणि त्यांचे दोन प्रवक्ते एक संजय राऊत आणि दुसर्या सुषमा अंधारे यांना हिंदुत्व म्हणजे काय? आणि ते राजकीय क्षेत्रात कसे अभिव्यक्त करायचे असते, हे काहीही समजत नाही. ‘हिंदुत्व’ शब्दाचा घोष करून आम्ही हिंदुत्ववादी आहोत, हे सिद्ध होत नाही. राजकारणात विचारसरणीवर आधारित कार्यक्रम द्यावा लागतो. सत्ता हातात आली, तर सत्तेच्या माध्यमातून विचारांची अंमलबजावणी करावी लागते. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जो काही वैचारिक पराक्रम केलेला आहे, त्याची सुज्ञ वाचकांना आठवण करून देणे त्यांना आवडणार नाही.
केजरीवालांच्या ‘आम आदमी पार्टी’चा विचार कोणता? तो जर ‘राष्ट्रवाद’ असेल, तर त्या राष्ट्रवादाची परिभाषा कोणती? भ्रष्टाचारमुक्त न्याय देणारे, सर्वांचे हित साधणारे शासन आणायचे असेल, तर त्यामागे खंबीर वैचारिक पाठबळ लागते. वैचारिक बांधिलकी असणारे कार्यकर्ते लागतात. त्यांचे प्रशिक्षण करावे लागते. केवळ संघटनेचाच विचार करील, असे नेते असावे लागतात. केजरीवाल याबाबतीत शून्य आहेत.
ममतांच्या तृणमूल काँग्रेसचा विचार कोणता? कम्युनिस्टांना हरवून त्या सत्तेवर आल्या. एक पर्यायी विचारसरणी घेऊन पक्ष बांधण्याची गरज होती. त्याऐवजी त्यांनी कम्युनिस्ट पक्षाची ‘गुंडसेना’ जवळ केली, तिला ‘तृणमूल’ आश्रय दिला आणि त्यांच्या भरणपोषणाची समांतर रचना उभी केली. जे केजरीवालांना दिल्लीत जमले नाही, ते ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये करून दाखविले. राज्य दहशत काय असते, याचा अनुभव १५ वर्षे बंगालच्या जनतेने घेतला.
उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. या काळात सचिन वाझे प्रकरण घडले. कंगना राणावतच्या घरावर बुलडोझर फिरवला गेला, अर्णब गोस्वामींना तुरुंगात टाकले गेले आणि पालघरला चार साधूंच्या हत्या झाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटे आरोप करून अटक करण्याचा कटही रचला गेला. सत्तेत राहून माज येतो. तो किती पराकोटीचा असतो, याची तीन जिवंत उदाहरणे म्हणजे केजरीवाल, उद्धव आणि ममता बॅनरर्जी आहेत. माज उतरविण्याची शक्ती जनतेत असते आणि जनता जेव्हा पेकाटात लाथ मारते; तेव्हा त्यांचा केजरीवाल, उद्धव आणि ममता होते.
हे तिन्ही नेते एका सुरात म्हणतात की, "नरेंद्र मोदी आणि शाह हे हुकूमशहा आहेत.” यातील विडंबना अशी की, या तिन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्ते म्हणतात की, "आमच्या पक्षात शून्य लोकशाही आहे.” केजरीवाल हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवितो. म्हणून त्यांना योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण सोडून गेले. बंगालमध्ये ‘ममता एके ममता’ होती. पक्षाची प्रवक्ता ममता, पक्षाची धोरणे ठरविणार ममता. पक्षाचा प्रचार करणार ममता, पक्षाचे सर्व निर्णय घेणार ममता. असे ‘सबकुछ ममता’ म्हणजे तृणमूल काँग्रेस होती. उद्धवसेना म्हणजे उद्धव आणि त्यांचे कुटुंबीय, जे ठरवतील ते पक्षाचे धोरण, पक्षाची भूमिका आणि पक्षाचे नेते. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड केले. ४५च्या आसपास आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले. हा प्रचंड राजकीय भूकंप होता. उद्धव ठाकरे यांच्या मनमानी, एककल्ली, घमेंडी नेतृत्वाविरुद्ध हा उठाव होता. राज्यसभेतील केजरीवाल यांचे सात खासदार केजरीवाल यांना सोडून भाजपत प्रवेशकर्ते झाले. एक-दोन महिन्यांत तृणमूल काँग्रेसचे किती खासदार आणि किती आमदार पक्ष सोडून जातील, हे आपल्याला दिसेल. हुकूमशाही प्रवृत्ती असणार्या सर्वांच्या नशिबी हे भोग येतात. जागतिक हुकूमशहांच्या उत्थान आणि पतनाचा थोडा अभ्यास या नेत्यांनी केला पाहिजे.
या लेखात फक्त तीन मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केलेला आहे. या यादीत अखिलेश, तेजस्वी यादव, स्टॅलिन यांचादेखील समावेश करायला पाहिजे. पुढे पुन्हा कधीतरी करू. या तिघांचे पूर्वीचे स्थान त्यांना नजीकच्या भविष्यकाळात मिळणे सहजसोपे नाही. या तिघांमध्ये चांगल्या राजकीय क्षमता आहेत. त्यांनी स्वत:मध्ये जर सुधारणा केल्या, कठोर आत्मचिंतन केले आणि विचारधारेशी कोणतीही तडजोड करायची नाही, असे ठरविले; तर पारखून त्यांना पुन्हा जनता जवळ करू शकते. ते असे करतील का? हा लाख मोलाचा प्रश्न!
रमेश पतंगे
९८६९२०६१०१