पाकिस्तानचे सध्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इमरान खान यांनी वेळोवेळी त्यांची सत्ता उलथवण्यामागे अमेरिकेचा हात असल्याचा दावा केला. पण, आपल्याच देशातील पंतप्रधानाला सत्ताच्युत करण्यासाठी अमेरिकेच्या हातचे बाहुले असलेल्या असीम मुनीरनेही तितकीच निर्णायकभूमिका बजावली. यासंदर्भातील गुप्त पत्र अमेरिकेत नुकतेच प्रसिद्ध झाल्यामुळे पुन्हा एकदा मुनीरचा स्वार्थी आणि अमेरिकाधार्जिणा चेहरा उघडा पडला आहे.
अमेरिकेतील शोधपत्रकारिता करणार्या ‘ड्रॉप साईट’ या एका संकेतस्थळाने उघड केलेल्या गुप्त पत्राने सर्वत्र खळबळ माजवली आहे. दि. ७ मार्च २०२२ रोजी पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत असद माजिद खान यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या दक्षिण आणि मध्य आशिया विभागाचे साहाय्यक सचिव डोनाल्ड लू यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हे पत्र पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांना पाठवले होते. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असली, तरी त्यातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लू यांनी खान यांना सांगितले की, जर पाकिस्तानमध्ये इमरान खान सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणून त्यांची गच्छंती झाली, तर तुमच्या सर्व चुका माफ केल्या जातील.
दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याच्या एक दिवस आधी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी मॉस्को येथे व्लादिमिर पुतीनची भेट घेतली होती. यामुळे अमेरिका आणि युरोपमध्ये पाकिस्तानविरुद्ध संतापाची तीव्र लाट उसळली होती. आपल्या ताटाखालचे मांजर असणार्या पाकिस्तानचे पंतप्रधान पुतीन यांची भेट घेऊन एकप्रकारे युक्रेनवरील आक्रमणाचे समर्थन करतात, हे त्यांना सहन होण्यासारखे नव्हते.
प्रत्यक्षात दि. ८ मार्च २०२२ रोजी इमरान सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला. अमेरिकेकडून आपली खुर्ची हिसकावण्याचा प्रयत्न होत आहे हे लक्षात येताच, इमरान खान यांनी आपल्या भाषणांमध्ये त्या गुप्त पत्राबाबत उल्लेख करायला सुरुवात केली. या पत्रातील तपशीलही आपण उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण, पाकिस्तानच्या उच्च न्यायालयाने त्यांना तसे करण्यास मनाई केली. अवघ्या महिनाभरात म्हणजे दि. १० एप्रिल २०२२ रोजी इमरान खान यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणून तो १७४ विरुद्ध ० मतांनी पारित होऊन त्यांची गच्छंती झाली. ‘फील्ड मार्शल’ असीम मुनीर यांनी २०१६ ते २०१८ ‘मिलिटरी इंटेलिजन्स’चे संचालकपद भूषवल्यानंतर त्यांची ‘आयएसआय’ प्रमुखपदी नेमणूक झाली. २०१९ साली ते इमरान खानसोबत इराणला गेले असता, इराणच्या नेत्यांसमोर असंसदीय भाषा वापरल्याने त्यांना अवघ्या आठ महिन्यांत पदावरून काढून टाकण्यात आले. तेव्हाच त्यांचा सौदी अरब आणि अमेरिकेप्रति असलेला कल स्पष्ट झाला होता. इमरान खानने त्यांच्या जवळच्या फैझ हमीदना ‘आयएसआय’ प्रमुखपदी नेमले आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांनाच पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदावर नेमण्याची योजना होती. फैझ हमीदनी अफगाणिस्तानमध्ये ‘तालिबान’ची सत्ता आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पण, इमरान खानना पंतप्रधानपदावरून हटवल्यानंतर असीम मुनीर यांची लष्करप्रमुखपदी वर्णी लागली. पदावर विराजमान झाल्यावर त्यांनी दि. ९ मे २०२३ रोजी इमरान खान यांना ‘पाकिस्तान रेंजर्स’करवी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरात नाट्यमय पद्धतीने अटक केली. तेव्हापासून ते तुरुंगात असून, त्यांचा छळ केला जात असल्याच्या, त्यांना आपल्या कुटुंबीयांशी-कार्यकर्त्यांशी भेटू दिले जात नसल्याच्या बातम्या वेळोवेळी प्रसिद्ध होतात.
२०२४ साली फैज हमीद यांनाही अटक करण्यात आली. फेब्रुवारी २०२२ मध्ये इमरान खानच्या ‘तेहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाला निवडणूक लढायला बंदी घालून, शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली ‘मुस्लीम लीग’ आणि ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’चे सरकार आणले. त्यापूर्वी असीम मुनीर यांनी लंडनमध्ये नवाझ शरीफची भेट घेतली होती. नवाझ शरीफ यांचे सौदी राजघराण्याशी अतिशय जवळचे संबंध आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर असीम मुनीर यांनी स्वतःला ‘फील्ड मार्शल’ घोषित केले. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी पाकिस्तानच्या घटनेमध्ये ‘२७वी दुरुस्ती’ घडवली आणि स्वतःची खुर्ची भक्कम केली. या दुरुस्तीच्या अंतर्गत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाला समांतर केंद्रीय घटनापीठाची स्थापना करण्यात आली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना कात्री लावण्यात आली आहे. केंद्रीय घटनापीठाला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदल्यांचे व्यापक अधिकार देण्यात आले आहेत. या घटनापीठाचे स्थान सर्वोच्च न्यायालयाच्या वरती राहणार आहे. पूर्वी पाकिस्तानच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांचे स्थान ‘संयुक्त सैन्यदल समिती’च्या अध्यक्षांच्या बरोबरीचे होते. हे पद नोव्हेंबर २०२५ पासून काढून टाकण्यात आले असून, त्यांची जागा सैन्यदल प्रमुख असीम मुनीर यांनी घेतली. त्यांना पदावर असताना केलेल्या कोणत्याही गुन्ह्यामध्ये आजन्म शिक्षा होणार नाही, याची तरतूद करण्यात आली आहे.
दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी पाकिस्तान आणि सौदी अरबने संरक्षण करार केला. दि. १८ मे २०२६ रोजी पाकिस्तानने सौदी अरबमध्ये आठ हजार सैनिक, चिनी ‘जे-१७’ विमानांची स्क्वाड्रन, ड्रोन आणि हवाई संरक्षण यंत्रणा तैनात केल्याची बातमी प्रसिद्ध झाली. असीम मुनीर यांची सैन्यदल प्रमुखपदी नियुक्ती, तसेच पाकिस्तान आणि अमेरिकेतील वाढती जवळीक यामागे सौदी अरबचा हात स्पष्टपणे दिसून येतो. पाकिस्तान आपल्या स्वातंत्र्यापासून सौदी अरब आणि इतर आखाती देशांना भाड्याने सैन्य पुरवत आला आहे. आखाती अरब देशांना आपल्याच सैन्यापासून बंडाळीची भीती असल्यामुळे त्यांनी कायम स्वतःचे सैन्य कमकुवत ठेवून पाकिस्तानची मदत घेतली. खासकरून १९७९ साली इराणमध्ये ‘इस्लामिक क्रांती’ झाल्यानंतर आणि सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तान आणि सौदी अरब यांच्यातील संबंध आणखीन घट्ट झाले. पाकिस्तानमध्ये ‘सुन्नी- वहाबी’ विचारसरणीच्या प्रचारासाठी मोठ्या देणग्या देणे, तसेच पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देणे, हा त्याचाच भाग होता. पाकिस्तानमधील अनेक लष्करी अधिकारी निवृत्तीनंतर सौदी अरबसाठी काम करतात. ‘९/११’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि खासकरून ‘अरब राज्यक्रांती’नंतर आखाती अरब देशांचे वेगाने मनःपरिवर्तन होऊ लागले. अमेरिकेने अफगाणिस्तानमधील ‘तालिबान’ आणि इराकमधील सद्दाम हुसेनची राजवट बदलल्यानंतर इराणच्या ताकदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. पाकिस्तानच्या ‘सुन्नी’ अरब देशांना पाठिंबा देण्यामुळे इराणकडून पाकिस्तानमधील ‘शिया’ दहशतवादी संघटनांना मदत केली जाऊ लागली. अरब देशांचा पाकिस्तानच्या भारतविरोधी धोरणांना असलेला पाठिंबा कमी झाल्यामुळे, तसेच ‘सुन्नी-शिया’ आणि ‘वहाबी-सुफी’ संघर्षात पाकिस्तान होरपळू लागल्यानंतर त्यांनी सौदी अरब आणि इराणमधील शीतयुद्धापासून लांब राहायचा निर्णय घेतला. त्याचा फायदा घेत, त्याच सुमारास भारतात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या सरकारने आखाती अरब देशांशी संबंध सुधारले. याच सुमारास तुर्कीयेचे अध्यक्ष रेसेप तैय्यब एर्दोगान यांनी ‘सुफी इस्लाम’चा राजकीय प्रभावासाठी प्रारंभ केला. तुर्कीये हा त्याकाळी आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या बलाढ्य देश असल्यामुळे सौदी अरबवर नाराज असलेला पाकिस्तान तुर्कीयेच्या गळाला लागला. इमरान खानच्या पंतप्रधानपदाच्या काळात तुर्कीये, पाकिस्तान आणि मलेशियाकडून सौदी अरबला आव्हान देण्याचे प्रयत्न करण्यात येत होते, तर अफगाणिस्तानमध्ये ‘तालिबान’ची सत्ता आणण्यासाठी कतार प्रयत्नशील होते. इराण युद्ध हे जगाच्या काळजीचा विषय असला, तरी त्यासोबतच सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील शीतयुद्ध हा जगाच्या काळजीचा विषय झाला आहे. सौदी अरब हा इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील वाढत्या जवळीकीमुळे अस्वस्थ आहे, तर पाकिस्तानला भारताच्या या दोन्ही देशांसोबत असलेल्या जवळीकीची चिंता आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये हे गुप्त पत्र कोणी प्रसिद्ध केले आणि त्यामागे नेमका काय हेतू आहे, याची खमंग चर्चा रंगली आहे.