सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड पूर्णत्वाच्या दिशेने मोठी झेप

बीकेसी-वाकोला जोडमार्गाचे अंतिम काम पूर्णत्वास

Total Views |
Mumbai’s Santa Cruz–Chembur Link Road Project
 
मुंबई : (Mumbai’s Santa Cruz–Chembur Link Road Project) मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या पूर्व-पश्चिम दळणवळण मार्गांपैकी एक असलेल्या सांताक्रूझ–चेंबूर लिंक रोड टप्पा -२ प्रकल्पाच्या पूर्णत्वाच्या दिशेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महत्त्वपूर्ण टप्पा गाठत अंतिम प्रमुख संरचनात्मक काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. यामुळे संपूर्ण १०.८८ किमी लांबीचा एससीएलआर मार्गिका नेटवर्क पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
 
वाकोला नाल्यावर असलेल्या पुलावर पहिल्या आणि दुसऱ्या स्तरावर ५४ मीटर लांबीचे दुहेरी कॉम्पोझिट गर्डर्स यशस्वीरित्या उभारल्यानंतर भारत डायमंड बोर्स (बीकेसी) ते वाकोला दरम्यानचा शेवटचा महत्त्वाचा दुवा संरचनात्मकदृष्ट्या पूर्ण झाला आहे. हा भाग तुलनेने लहान असला तरी विविध उड्डाणपूल, जोडमार्ग आणि संरचनांना एकत्रित जोडण्यात त्याची निर्णायक भूमिका आहे, ज्यामुळे संपूर्ण एससीएलआर नेटवर्क कार्यान्वित होण्यास मदत होते. या भागाचे काम अत्यंत आव्हानात्मक शहरी परिसरात वाकोला नाल्यावरील विद्यमान पुलावर पूर्ण करण्यात आले, जिथे पारंपरिक आधार प्रणाली वापरणे शक्य नव्हते.
 
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, “हा टप्पा केवळ एका स्पॅनच्या पूर्णत्वाचा नाही, तर संपूर्ण दळणवळण नेटवर्कच्या पूर्णत्वाचा आहे. बीकेसी-वाकोला जोडमार्ग विविध उंचावलेल्या मार्गिकांना एकत्रित करून त्यांच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करण्यास मदत करतो. यामुळे एससीएलआर मार्गिका एक अखंड, उच्च-कार्यक्षम पूर्व-पश्चिम जोडमार्ग म्हणून कार्य करेल आणि मुंबईतील प्रवासात मोठी सुधारणा होईल.”
 
हेही वाचा : काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातील परिस्थिती नाजूक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
स्पॅनची प्रमुख वैशिष्ट्ये
 
लांबी : ५४.० मीटर
डेक रुंदी : ८.५ मीटर
अंदाजे वजन : ३५८ मेट्रिक टन
गर्डर मांडणी : तीन समांतर गर्डर्स
गर्डर खोली : प्रत्येकी ३.१३० मीटर
 
जोडणी मिळालेले प्रमुख रस्ते
 
पूर्व द्रुतगती महामार्ग
पश्चिम द्रुतगती महामार्ग
बांद्रा-कुर्ला संकुल
सांताक्रूझ, वाकोला, कलिना , कुर्ला आणि चेंबूर
 
“या अंतिम जोडमार्गाच्या पूर्णत्वामुळे सांताक्रूझ–चेंबूर लिंक रोड सुमारे ११ किमी लांबीचा एकात्मिक पूर्व–पश्चिम दळणवळण मार्ग बनत आहे. मुंबईतील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि जलद जोडणी सुनिश्चित करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. अशा प्रकल्पांमुळे शहरात कार्यक्षम, विश्वासार्ह आणि भविष्योन्मुख दळणवळण व्यवस्था निर्माण होत आहे.”
 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 
“हा मार्ग दैनंदिन प्रवाशांसाठी जीवनवाहिनी ठरणार आहे, जो शहरातील प्रमुख निवासी आणि व्यावसायिक केंद्रांना जोडतो. विविध जोडमार्गांचे अखंड नेटवर्क तयार झाल्यामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ होईल. अशा बहुस्तरीय जटिल पायाभूत सुविधा उभारण्याची एमएमआरडीएची क्षमता उल्लेखनीय आहे.”
 
- एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीए अध्यक्ष
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.