नागपूर : (Devendra Fadnavis) काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय नाजूक आहे. तो त्यांचा पक्ष असून त्यावर काय कारवाई करायची, हे त्यांनी ठरवायला हवे. परंतू, एक बाहेरचा पक्ष म्हणून पाहताना इतक्या जुन्या पक्षाची अवस्था पाहता त्यांच्या कार्यकर्त्यांची कीव करावी अशी अवस्था आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नागपूर वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर क्रीडा संकुल, जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त संकुल या सगळ्या बांधकामांना मी आज भेटी देऊन कामाची प्रगती बघणार आहे. यात आढळलेल्या त्रुटींची नोंद घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देतो आहे. सरकारी काम त्रुटीपूर्ण राहू नये, असा आमचा प्रयत्न आहे. महात्मा फुले योजना सरकारी रुग्णालयांना लागू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांना दोन पैसे मिळत असून त्यांचा दैनंदिन खर्च चालवण्यास त्याचा फायदा होतो. त्यामुळे रुग्णालयांची संख्याही वाढली आहे. नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाने यात उत्तम काम केले आहे."
२०२९ मध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळी लढू शकते, असे वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केले. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "शिवसेनेत केवळ एकनाथ शिंदे यांनाच बोलण्याचा अधिकार आहे. त्यांनी एखादे वक्तव्य केल्यास त्याबद्दल मला विचारले पाहिजे. परंतू, यासंदर्भात विचारायचे असल्यास प्रवक्त्यांना विचारा."
अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबद्दल बोलताना ते म्हणाले की, "उपवर्गीकरणासंदर्भात सर्वांना शंका घेण्यास वेळ दिला आहे. हे वर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये होत आहे. त्यावर उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने त्यांचा प्रस्ताव दिला आहे. आता पुन्हा नव्याने लोकांच्या सूचना आणि आक्षेप आम्ही ऐकून घेऊ. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, त्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल."
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....