मुंबई : (Kalyan Drug Dispute) कल्याण तालुक्यातील आंबिवली परिसरात अंमली पदार्थाच्या व्यवहारावरून वाद होऊन एका कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबिवली (पश्चिम) आटाळी रोड येथे राहणारे तक्रारदार हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या कुटुंबात आई, पत्नी, दोन मुलं व एक मुलगी असा समावेश आहे. १ मे रोजी रात्री उशिरा दुकान बंद करून ते घरी परतले. २ मे रोजी पहाटे सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार व त्यांचा मुलगा घरासमोर बसले असताना दोन अनोळखी इसम त्यांच्या घरी येऊन ‘एम.डी.’ या अंमली पदार्थाची मागणी करू लागले.
तक्रारदारांनी अशा प्रकारचा कोणताही व्यवसाय करत नसल्याचे सांगत नकार दिला. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली आणि किरकोळ मारहाणही झाली. या घटनेचा राग मनात धरून परिसरातील अंमली पदार्थ विक्रीत सक्रिय असल्याचा आरोप असलेले गाझी जान इराणी, सकिना जान इराणी व अली अकबर हे तिघे काही वेळातच तक्रारदाराच्या घरी जबरदस्तीने घुसले.
या तिघांनी तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत घरात जाण्यास भाग पाडले आणि अंगावर धावून आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच तक्रारदारांचे मित्र रोशन जगताप हेही मदतीसाठी तेथे पोहोचले. यानंतर तक्रारदार व त्यांच्या मित्राने खडकपाडा पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित तिघांविरुद्ध तक्रार नोंदवली तिन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये कलम ३३३, ३५२, ३५१(२), ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खडकपाडा पोलिसांकडून सध्या पुढील तपास सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मोहोने–अटाळी परिसरात ड्रग तस्करी व अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. यामुळे आपल्या तरुण-तरुणी नशेच्या आहारी जात असून त्यांचे भविष्य धोक्यात येत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध सतर्क राहावे व त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे व त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलचे कार्यकर्ते नेहमीच तरुणांच्या सोबत असून त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी कटिबद्ध आहेत. नशामुक्त परिसर हीच आपली जबाबदारी!
- अॅड. रोशन जगताप, कल्याण जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक