पुणे जिल्ह्यातील घटना निंदनीय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फास्ट ट्रॅक कोर्टात आरोपीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी करणार...

    02-May-2026   
Total Views |
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) पुणे जिल्ह्यातील घटना अतिशय निंदनीय आणि दु:खदायी असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन आरोपीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबद्दल माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "तीन-साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर ६५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला आणि तिचा खून केला. आरोपीला अटक झाली असून त्याचे जुने संदर्भ दिसत आहेत. या घटनेबाबत समाजात मोठा रोष आहे. सगळ्यांनाच त्या मुलीबद्दल आणि तिच्या कुटुंबाबद्दल हळहळ वाटते. हे संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन विशेष फास्ट ट्रॅक न्यायालय तयार करण्याबाबत उच्च न्यायालयाला विनंती करू आणि विशेष सरकारी वकील देऊन कमीत कमी वेळेत या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, अशी मागणी करू."
 
ते पुढे म्हणाले की, "या प्रकरणात राजकारण करणे असंवेदनशील आहे. प्रत्येक गोष्टी राजकारण शोधून काढणे यापेक्षा वाईट दुसरे काहीही असू शकत नाही. काही गोष्टींमध्ये संवेदना बाळगली पाहिजे. राज्य सरकार नक्की आवश्यक ती सगळी कारवाई करेल."
 
एकदा येऊन तर पाहा
 
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महालक्ष्मी सरस प्रदर्शनीचे उद्घाटन पार पडले. यावर बोलताना ते म्हणाले की, "महालक्ष्मी सरस ही महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून चालणारे उमेद अभियान आणि विविध अभियानाच्या माध्यमातून बचत गटांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने एक मोठी बाजारपेठ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हा ब्रँड स्थापन झाला आहे. कुठल्याही शहरात महालक्ष्मी सरस घेतल्यानंतर त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. राज्यभरातून तिथे बचत गट येतात आणि चांगला व्यवसाय करतात. नुकताच नवी मुंबईमध्ये जवळपास २२ ते २५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. सुशिक्षित महिलादेखील बचत गटाच्या माध्यमातून मोठा व्यवसाय उभा करतात आणि लखपती दीदी बनतात. ग्रामविकास विभागाने त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी विभागाचे अभिनंदन. मुंबईतील महालक्ष्मी सरसमध्ये लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळणार आहे. खाद्य पदार्थांपासून तर आपल्या विविध गरजांच्या दर्देदार गोष्टी आहे. मी तमाम मुंबईकरांना विनंती करतो की, एकदा येऊन तर पाहा. तुम्ही इथे आलात तर पुढच्या वर्षी महालक्ष्मी सरसची वाट पाहाल."
 
हेही वाचा : विधानपरिषद निवडणूक आणि पोटनिवडणूकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती
 
अलर्टची चाचणी पूर्णपणे यशस्वी
 
मोबाईलवर आलेल्या अलर्ट मेसेजबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "मोबाईलवर आलेल्या मेसेजसंदर्भात यापूर्वीच कल्पना देण्यात आली होती. संपूर्ण शुद्ध भारतीय पद्धतीने ही अलर्ट सिस्टिम तयार झाली आहे. युद्ध, आपत्ती आणि आणीबाणीच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलवर त्याच्या भाषेत अलर्ट देता येणार आहे. त्याची चाचणी आज करण्यात आली असून ती पूर्णपणे यशस्वी झाली आहे. भारताने युद्धजन्य परिस्थीतीत सज्जता बाळगण्यात उत्तम कामगिरी केली आहे."
 
पंतप्रधान मोदी यांचे आभार
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, "काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मला लिहिलेल्या पत्राबद्दल मी त्यांचे आभार मानतो. महाराष्ट्राची संस्कृती, मराठी भाषा आणि विकासाबद्दल त्यांना असलेली संवेदना आणि महाराष्ट्राच्या प्रति असलेला आदरभाव या पत्रातून प्रदर्शित झाला आहे. ते ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या पाठीमागे उभे आहेत तेसुद्धा यातून प्रतिपादित झाले आहे. त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो आणि लवकरच त्यांना या पत्राचे लेखी उत्तरसुद्धा मी पाठवणार आहे."
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....