NEET Paper Leak 2026: नीट पेपरफूटी प्रकरणात महाराष्ट्रात कुठे कुठे जाळे? कुणाला अटक? सविस्तर वाचा
17-May-2026
Total Views |
देशाला हदरवणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता सीबीआयच्या तपासाला जोर आलाय आणि या प्रकरणातील नवनविन खुलासे देशभरातील तपमान वाढवताना दिसत आहेत. मनीषा वाघमारे हिला मध्यस्थीच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने आणखी एका आरोपीला ताब्यात घेतलंय. पुण्याच्या मॅाडर्न कॅालेजमधील बायोलॉजी विषयाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांनाही दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. मांढरे यांना NTA ने NEET-UG 2026 प्रक्रियेत एक्झ्पर्ट म्हणून नियुक्त केले होते आणि त्यांना बॉटनी व झूलॉजी या प्रश्नपत्रिकांचा पूर्ण अॅक्सेस होता, असं माध्यमांकडून समजत आहे. मांढरे यांनी एप्रिल 2026 मध्ये पुण्यातील वाघमारेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संपर्क केला. पुण्यातील स्वतःच्या घरी विशेष कोचिंग क्लासेस घेत, बॉटनी आणि झूलॉजीमधील संभाव्य प्रश्न विद्यार्थ्यांना लिहून घेण्यास सांगितले. ज्यातील बरेच प्रश्न ३ मे रोजी झालेल्या परिक्षेतील प्रश्नांशी जुळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. CBIने गेल्या २४ तासांत देशभरात सहा ठिकाणी छापेमारी करून महत्त्वाचे कागदपत्रे, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट्स आणि मोबाईल जप्त केले आहेत. या पुराव्यांमध्ये नेमकं काय आहे? मनीषा मांढरे कोण आहेत? महाराष्ट्रात कुठे कुठे हे जाळे पसरलेय? आणि कुणाला अटक करण्यात आलेय? सविस्तर जाणून घेऊयात... (NEET Paper Leak 2026)
NEET पेपर लीक प्रकरणात CBIच्या तपासाला मोठी गती मिळाली आहे. पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेच्या अटकेनंतर, आता बायोलॉजीच्या प्राध्यापिका मनीषा मांढरेला देखील केंद्रीय तपास यंत्रणा CBIने अटक केली आहे. (NEET Paper Leak 2026)
मनिषा मांढरे मुळच्या पुण्याच्या असल्याची माहिती आहे. त्या पुण्याच्या मॅाडर्न कॅालेजमध्ये गेले १८ वर्ष शिक्षिका आहेत. येत्या सहा महिन्यात निवृत्त देखील होणार होत्या. मात्र त्याआधी NTA कडून NEET-UG 2026 प्रक्रियेत त्यांची एक्स्पर्ट म्हणून नियुक्त करण्यात आली. ज्यामुळे त्यांना बॉटनी आणि झूलॉजी प्रश्नपत्रिकांचा पूर्ण अॅक्सेस होता. एप्रिल २०२६ मध्ये पुण्यातील वाघमारेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना संपर्क केला. पुण्यातील स्वतःच्या राहत्या घरी विशेष कोचिंग क्लासेस सुरू केले. क्लासदरम्यान बॉटनी आणि झूलॉजीमधील संभाव्य प्रश्न विद्यार्थ्यांना लिहून घेण्यास सांगितले. त्याशिवाय पुस्तकांमध्ये प्रश्न मार्क करण्यासही सांगितले. ज्यातील बरेच प्रश्न ३ मे रोजी झालेल्या परिक्षेतील प्रश्नांशी जुळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. (NEET Paper Leak 2026)
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी पुण्यातील मनीषा वाघमारे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि आता CBIच्या चौकशीतून तिने दिलेल्या माहितीच्या आधारावर, धनंजय लोखंडे आणि इतर एजंटपर्यंत पोहचण्याचा मार्ग मोकळा झाला. तपासात समोर आले आहे की वाघमारे ही फक्त एक मध्यस्थ नव्हती, तर संपूर्ण जाळ्यातील महत्त्वाची कडी होती. मनीषा वाघमारे नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना धनंजय लोखंडे याच्याशी जोडून देत असे. आणि त्यातूनच कमिशन मिळवायची. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून वाघमारे नीट पेपरफुटी रॅकेटमध्ये मध्यस्थ म्हणून काम करत होती. आपल्या मुलीला पास करण्यासाठी देखील अशाच प्रकारची मदत तिने घेतल्याच तपासात उघड झालं आहे. (NEET Paper Leak 2026)
या जाळ्यातील आणखी एक महत्त्वाचा धागा म्हणजे धनंजय लोखंडे. नाशिकमधून शुभम खैरनारच्या अटकेनंतर तपासाची सुई त्याच्यापर्यंत पोहोचली. लोखंडे हा BA MS शिक्षण पूर्ण करून, मेडिकल अॅडमिशन कन्सल्टंट म्हणून काम करत होता, आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय प्रॅक्टिसचा वापर करत होता. अशा प्रकारच्या मिश्र भूमिकांमुळे त्याचे नेटवर्क विस्तृत आणि गुंतागुंतीचे असल्याचे तपासकांच्या अहवालातून समोर आले आहे. CBIच्या अहवालानुसार मनीषा वाघमारे व धनंजय यांच्यातील व्हॉट्सॲप संभाषणांमध्ये पेपर, पैसे व वितरणाच्या बाबत संवाद आढळले असून, आता तेही पुराव्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. या पुराव्यांच्या आधारे तपास पुढे जात असून या रॅकेटमध्ये आणखी किती डॉक्टर, शिक्षक आणि एजंट सामील आहेत हे शोधण्याचे काम सुरू आहे. (NEET Paper Leak 2026)
या प्रकरणात बीड कनेक्शन देखील समोर आले आहे; लातूरमधून अटक करण्यात आलेल्या निवृत्त रसायनशास्त्र प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हे मूळचे बीडचे असल्याची माहिती आहे. NEET पेपर सेटिंग समितीशी संबधित संशयास्पद व्यक्तींबाबत बीडमधील छाननीमुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिकच रुंदावली आहे. पेपर छपाई, सेटिंग आणि वितरण या साखळीत तज्ज्ञ व प्रशासकीय स्तरावरही किती खोलवर घुसखोरी झाली आहे , हे यातून लक्षात येते. (NEET Paper Leak 2026)
आता या सर्व परिस्थितीत विद्यार्थ्यांवर होणाऱ्या मानसिक परिणामांकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही. ३ मे २०२६ रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्यानंतर देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसला असून, अनेक तणावविषयक आणि दु:खद घटना समोर आल्या आहेत. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील काही तरुणांच्या आत्महत्त्यांच्या बातम्यांनी या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढवली आहे. आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी कोण घेणार असे प्रश्न आता विचारले जाते आहेत. अशा कठीण आणि संवेदनशील काळात NTA, केंद्र सरकार व तपास यंत्रणांनी विद्यार्थ्यांना भावनिक आणि व्यावहारिक पाठबळ देण्याचे आश्वासन दिले असून, पुनर्परीक्षेच्या वेळापत्रक व प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याचा शब्द दिला आहे. (NEET Paper Leak 2026)
या तपास आणि घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने निश्चय केला आहे की NEET-UG 2026 ची पुनर्परीक्षा २१ जून २०२६ रोजी घेतली जाईल. तसेच पुढील वर्षापासून NEET OMR ऐवजी परिक्षा संगणक-आधारित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. (NEET Paper Leak 2026)
सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की विद्यार्थ्यांचे भविष्य हे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि “शिक्षण माफिया” विरोधात कठोर कारवाई केली जाईल; परंतु या घोषणांमागे प्रत्यक्षात किती परिणामकारक बदल होतील हे पुढील तपास आणि अंमलबजावणीच ठरवेल. (NEET Paper Leak 2026)
या प्रकरणानंतर आता परिक्षेची पारदर्शकता व सुरक्षितता राखण्यासाठी संस्थात्मक दुरुस्ती, तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग, छपाई-वाहतूक साखळींच्या सर्व स्तरांवर कडक तपासणी आणि शिस्तबद्ध जवाबदारीची गरज अनिवार्य आहे. NEET सारख्या स्पर्धापरीक्षा एकूण सामाजिक विश्वासाने चालतात; या विश्वासाला तोडणाऱ्या प्रत्येक घटनेमुळे संपूर्ण प्रवेशप्रणालीवरच प्रश्न उठतो. म्हणूनच CBIच्या पुढील कारवाईची, जप्त झालेले डिजिटल पुरावे व बँक व्यवहारावरून काय उघड होणार. या सगळ्या घडामोडींमध्ये विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, त्यांच्या भवितव्याची सुरक्षा आणि न्यायव्यवस्थेचा जलद व निष्पक्ष निर्णय हेच सर्वांत महत्त्वाचे ठरेल. आजच्या परिस्थितीत देशभरातील लक्ष २१ जूनच्या री-नीटवर व तपासाच्या पुढील टप्यावर आहे. यात पुढे काय निष्पन्न होणार हे पाहण्यासारखे असले, तर NEET पेपरफुटीचे रॅकेट चालवणाऱ्या डॉक्टर आणि शिक्षकांबद्दल तुमचं काय मत आहे? हे गैरप्रकार कसे थांबवता येतील? (NEET Paper Leak 2026)