‘विलमॅन’ : अ‍ॅड. महेंद्र एकबोटे

Total Views |
Adv Mahendra Ekbote
 
विल्यम शेक्सपिअर, नेपोलियन बोनापार्ट, अ‍ॅडॉल्फ हिटलर, विन्स्टन चर्चिल यांची मृत्युपत्रे संग्रही ठेवणार्‍या अ‍ॅड. महेंद्र एकबोटे यांच्याविषयी...
 
जीवनात माणसाची खरी ओळख त्याच्या ज्ञानाने, संपत्तीने, प्रसिद्धीने नाही; तर त्याच्या वर्तनाने, विचाराने आणि कामाप्रतिच्या बांधिलकीने होते. जमीन व्यवसायात काम करताना अ‍ॅड. महेंद्र एकबोटे यांना अनेक प्रकारचे लोक, त्यांच्या समस्या आणि त्यामुळे नात्यांमध्ये निर्माण होणारा तणाव जवळून अनुभवता आला. काही लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात पण, कायदेशीर माहितीच्या अभावामुळे संकटात सापडतात. अनेकदा कुटुंबातील मालमत्तेचे वाद, मृत्युपत्र नसणे यामुळे गैरसमजातून, कुटुंबही तुटताना त्यांना दिसली.
 
जीवनात पैसा, मालमत्ता आणि यश महत्त्वाचे असते. पण, त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे असते, ते म्हणजे नातेसंबंध आणि कुटुंबातील एकोपा. अनेकदा न्यायालयातील वाद केवळ कायद्याचे प्रश्न नसतात, तर ते तुटलेल्या संवादाचे, हरवलेल्या नात्यांचे आणि अयोग्य नियोजनाचे परिणाम असतात. हेच वाद अनेकांना वर्षानुवर्षे छळतात. या सर्व विदारक अनुभवांनी एक गोष्ट अ‍ॅड. एकबोटे यांना शिकवली, ती म्हणजे मृत्युपत्र नसणे म्हणजेच आपल्या पुढील पिढीत आपणच फूट पाडणे होय!
 
याच विचारातून ‘लिगलिशिल्ड’ संकल्पनेचा जन्म झाला. ‘लिगलिशिल्ड’ हे फक्त नाव नाही, तर वारसा हक्कासाठी जागृती करणार्‍या चळवळीचे प्रतीक आहे. अ‍ॅड. एकबोटे यांच्या आयुष्यात समाजासाठी काहीतरी उपयुक्त आणि शाश्वत कार्य करणे, याचे महत्त्व सर्वाधिक राहिले आहे. रस्त्यावर चुकून पडलेला रुपया उचलण्यासाठी धावपळ करणारी माणसे, मृत्युपत्राच्याबाबतीत बेफिकीर असल्याचे त्यांना आश्चर्य वाटते. किंबहुना, मृत्युपत्र हा विषय टाळण्याकडेच अनेकांचा कल दिसतो.
 
मात्र, वकील म्हणजे फक्त कायद्याचा जाणकार नसून, समाजाला योग्य दिशा दाखवणारा मार्गदर्शक असल्याचे अ‍ॅड. एकबोटे मानतात. त्यांच्या याच विचारातून अनेक वेगवेगळे उपक्रम जन्माला आले. वयाची शंभरी पूर्ण झालेल्या आजीबाईंचे मृत्युपत्र, हा त्यांचासाठी एक वेगळाच अनुभव ठरला. मृत्युपत्र म्हणजे केवळ मालमत्तेचे वाटप नसून, आपल्या विचारांचे, संस्कारांचे आणि जबाबदारीची परंपरा जपण्याची प्रक्रिया असल्याचे आजीबाई नकळतपणे त्यांना शिकवून गेल्या.
 
आजच्या काळात नाती दूरावत असून, संवाद कमी झाले आहेत. तर, वारसा फक्त संपत्तीपुरताच उरला आहे. मात्र, अ‍ॅड. एकबोटे यांच्या मते, खरा वारसा म्हणजे मूल्ये, संस्कार, कौटुंबिक जबाबदार्‍या आणि परस्पर विश्वास.
 
‘जनरेशन विल’ ही एक अशी संकल्पना आहे, जी कुटुंबातील पिढ्यांना जोडण्याचे कार्य करत असल्याचे ते मानतात. ८६ वर्षांच्या आजी, ५८ वर्षांचा मुलगा आणि २४ वर्षांचा नातू यांचे एकाच दिवशी, एकाच ठिकाणी मृत्युपत्र नोंदवण्याचा विक्रम भलेही लौकिक अर्थाने अ‍ॅड. एकबोटे यांच्या नावावर नोंदला गेला असेल मात्र, ‘जनरेशन विल’द्वारे कुटुंबाचा केवळ आर्थिकच नव्हे, तर भावनिक आणि नैतिक वारसा जपण्याचा सोहळा साजरा करण्याचे भाग्य मिळाल्याचेही ते सांगतात.
 
‘विल स्टुडिओ’ हा त्यांच्या व्यावसायिक कार्यातील एक मैलाचा दगड. ही एक वेगळीच आणि अभिनव संकल्पना आहे. मृत्युपत्र दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवण्याच्या आधी, संपूर्ण प्रक्रियेचे छायाचित्रण करून ते पेनड्राईव्ह, तसेच सर्व्हरवर जतन केले जाते. त्यामुळे भविष्यात न्यायालयात पुरावा म्हणूनही वापरता करता यावा, हा त्यामागील उद्देश. ‘विल स्टुडिओ’ हा अशाप्रकारचा भारतातील पहिलाच आणि एकमेव उपक्रम असल्याचेही ते सांगतात. तसेच त्यांच्या कार्याचा अजून एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे, नाशिकमधील पहिले वैद्यकीय इच्छापत्र अर्थात, ‘लिव्हिंग विल’ तयार करण्याचा बहुमान. ‘लिव्हिंग विल’ ही संकल्पना त्यावेळी फारशी कोणालाच माहिती नव्हती, जी व्यक्तीच्या सन्मानपूर्ण जीवन आणि वैद्यकीय निर्णयांशी संबंधित अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर या विषयाला विविध माध्यमांतून प्रसिद्धी मिळाली व त्यांनी लिहिलेल्या अनेक लेखांमधून समाजात जागरूकताही निर्माण झाली.
 
अल्पावधीतच ७००हून अधिक ‘लिव्हिंग विल’ लोकांनी स्वेच्छेने बनवून सादर केले, हे त्यांच्यासाठी अभिमानाचे कार्य. याशिवाय, अ‍ॅड. एकबोटे यांना जुनी, ऐतिहासिक मृत्युपत्रे गोळा करण्याचीही विशेष आवड आहे. त्यांच्या संग्रहात अ‍ॅरिस्टॉटल (इ.पू. ३२२), विल्यम शेक्सपिअर (सन १६१६), नेपोलियन बोनापार्ट (सन १८२१), अ‍ॅडॉल्फ हिटलर (सन १९४५), विन्स्टन चर्चिल (सन १९६५) व इतर अनेक ऐतिहासिक व्यक्तींची मृत्युपत्रे आहेत. ‘ओल्ड विल कलेक्शन’ हा त्यांच्यासाठी केवळ संग्रहच नाही; तर समाजाच्या इतिहासाचा, विचारसरणीचा आणि त्या काळातील कौटुंबिक मूल्यांचाही अभ्यास आहे. जुनी मृत्युपत्रे वाचताना त्या काळातील माणसांची भावनिक जडणघडण, जबाबदारीची भावना आणि नात्यांबद्दलचा आदर अशा विविध पैलूंचे दर्शन घडते, असे ते सांगतात. मृत्युपत्र म्हणजे शेवट नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी जबाबदारीची सुरुवात. हाच त्यांचा विचार ‘लिगलिशिल्ड’चा आत्मा आहे. अशा या ‘विलमॅन’ला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून, पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा!




विराम विलास गांगुर्डे

दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये नाशिक विभागीय कार्यालयात उपसंपादक या पदावर कार्यरत. द्राक्षपंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे जन्म आणि तेथेच बी. कॉम. ही पदवी, तर वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातून प्राप्त. ग्रामीण जीवन आणि अर्थकारण, राजकीय आणि सामाजिक या विषयावरील वृत्तांकनामध्ये विशेष रस.