सिंधुदुर्गातील पक्षीजगतात रमत, तिथल्या गुजगोष्टी उलगडणार्या आणि आता जिल्ह्याच्या‘मानद वन्यजीव रक्षक’पदी नियुक्त झालेल्या भाग्यश्री कृष्णा परब हिच्याविषयी...
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असे म्हणतात. मात्र, या मुलीचे पाय पाळण्यात दिसलेच नाहीत. तरुणपणात ते पाय पक्ष्यांच्या शोधात सिंधुदुर्गातील जंगलातील लाल मातीने माखले. या माखलेल्या पायांनी सिंधुदुर्गातील ३७८ पक्ष्यांची नोंद केली. त्यावर अभ्यास केला. लाल मातीने माखलेले हे पाय आहेत, सिंधुदुर्गची ‘पक्षीकन्या’ भाग्यश्री कृष्णा परब हिचे!
भाग्यश्रीचा जन्म दि. १० सप्टेंबर १९९६ रोजी सिंधुदुर्गात झाला. बालपण ओरोसजवळच्या रानबांबुळी गावात गेले. तिचे आजोबा आणि वडील शासकीय कर्मचारी. या दोघांचीही कामाची सुरुवात वन विभागाच्या कामापासूनच झाली होती. घराच्या आसपास अनेक पक्ष्यांचा घरोबा असूनही भाग्यश्रीला त्याची जाणीव नव्हती. मात्र, विज्ञानाची तिला ओढ होती. त्यामुळे पणदूरच्या शिवाजी इंग्रजी स्कूलमधून तिने विज्ञान शाखेतून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर विज्ञानातून पदवीच्या शिक्षणाकरिता तिने कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात प्रवेश मिळवला. ‘प्राणिशास्त्र’ विषयातून प्रथम वर्षाचे शिक्षण सुरू झाले. याकाळात ती कोल्हापूरमधील ‘कोनॅक’ या ग्रुपतर्फे आयोजित केलेल्या ‘निसर्ग कॅम्प’मध्ये सहभागी झाली. या कॅम्पनेच तिच्या आयुष्याला निसर्गमय कलाटणी दिली. या कॅम्पमुळे तिला निसर्गाची आणि खासकरून पक्ष्यांची प्राथमिक ओळख झाली.
पक्ष्यांविषयी कुतूहल निर्माण झाल्याने कुडाळमध्ये परतल्यानंतर तिने हातात कॅमेरा घेण्याचे निश्चित केले. यासाठी तिला मदत केली, तिचे प्राध्यापक डॉ. योगेश कोळी यांनी. कोळींनी आपला कॅमेरा भाग्यश्रीला देऊ केला. पक्ष्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी आणि पक्षी व निसर्ग निरीक्षणाबाबत प्रत्यक्ष जंगलात फिरणे होऊ लागले. प्राध्यापक डॉ. मंगेश जांभळे यांनी तिला पक्ष्यांविषयीची पुस्तके दिली. पक्ष्यांना कसे ओळखावे, त्यांचे वर्तन यांविषयीचे मार्गदर्शन केले. त्यामुळे तिला पक्षीनिरीक्षणाची वाट गवसली. मात्र, त्या वाटेवर तिलाच मार्गक्रमण करायचे होते. त्यासाठी तिने महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच, सिंधुदुर्गातील अनेक जंगलांना भेट देण्यास सुरुवात केली. त्यातून पक्ष्यांचे बारकावे टिपण्यास सुरुवात झाली. निरीक्षणापुरतेच मर्यादित न राहता, तिने पक्ष्यांच्या शास्त्रीय नोंदी टिपल्या. पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिने हे काम आपला सहकारी प्रवीण सावंत याच्यासोबत, प्रा. कोळी यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत चिकाटीने केले.
पदवीच्या शिक्षणाअंती भाग्यश्रीने तीन वर्षांत सिंधुदुर्गातील २४७ पक्ष्यांची नोंद केली होती. केवळ नोंद न करता, पक्ष्यांची इत्यंभूत माहिती आणि त्यांची छायाचित्रेदेखील तिच्याकडे उपलब्ध होती. भाग्यश्रीचे घर जंगलाच्या भागाला लागून असल्याने घराच्या आसपास मोठ्या संख्येने विविध प्रजातींच्या पक्ष्यांची रेलचेल असे. असेच एकदा भरदुपारी भाग्यश्री घरात बसली असताना तिने पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला. नेमका काय प्रकार आहे, हे बघण्यासाठी ती बाहेर आली असता, काही पक्षी नळाच्या तोटीतून पडणारे थेंबथेंब पाणी आपल्या चोचीमध्ये टिपण्यासाठी खटाटोप करीत होते. तिने अंगणातला नळ चालू केला. या नळातून पडणार्या पाण्याने त्या पक्ष्यांनी तहान भागवली व मनसोक्त पाण्यामध्ये डुबयाही मारल्या. हे पाहून या पक्ष्यांची तहान कायमची कशी भागवता येईल, याविषयी ती विचार करू लागली. तिने बाजारात जाऊन सहा खोलगट मातीची भांडी विकत आणली. पक्ष्यांनी पाण्याच्या भांड्यांमध्ये मनसोक्त डुबया मारण्यास सुरुवात केली. तिची आई बालवर्ग चालवत असल्याने तिथल्या मुलांनादेखील पक्ष्यांना पाणी ठेवण्यास तिने उद्युक्त केले. पक्षी दारात येऊ लागल्यानंतर तिने त्यांचा अधिवास, त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीबद्दल निरीक्षण करण्यास सुरुवात केली. ही माहिती गोळा करत असताना वैशिष्ट्यपूर्ण नोंदीही केल्या. या सर्व नोंदी सिंधुदुर्गवासीयांसमोर जाण्यासाठी प्रा. कोळी यांनी ही माहिती पुस्तकरूपाने आणण्याचा विचार मांडला. अखेरीस जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून भाग्यश्री, प्रवीण सावंत आणि प्रा. कोळी यांचे ‘बर्डलाईफ ऑफ सिंधुदुर्ग’ नावाचे पुस्तकही प्रकाशित झाले.
सध्या डॉ. मंगेश जांभळे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत भाग्यश्री पक्ष्यांच्या वर्तनाविषयी ‘पीएचडी’चे संशोधन पूर्ण करत आहे. हे सर्व करताना तिने सिंधुदुर्गात आढळणार्या ४२८ पक्ष्यांपैकी ३७८ पक्ष्यांची नोंददेखील केली. नुकतीच वन विभागाने तिची नियुक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्याची ‘मानद वन्यजीव रक्षक’ या पदावर केली आहे. या नियुक्तीचा उपयोग जिल्ह्याची जैवविविधता लोकांसमोर उलगडून दाखवण्यासाठी भाग्यश्रीला करून घ्यायचा आहे. तसेच सिंधुदुर्गात आढळणार्या ४२८ पक्ष्यांची माहिती देणारे मराठी भाषेतील पुस्तक तिला प्रकाशित करायचे आहे. सोबतच लहान मुलांना तिला पक्षीसंवर्धनाचे धडे द्यायचे आहेत. भाग्यश्रीच्या आजवरच्या या प्रवासात तिच्या आई-वडिलांनी आणि भावाने मोलाची साथ दिली. पक्षीनिरीक्षण ते आता ‘पीएचडी’च्या माध्यमातून शास्त्रीय संशोधन, असा भाग्यश्रीचा प्रवास सिंधुदुर्गातील अनेक तरुणींसमोर आदर्श ठेवणारा आहे. तिला पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा!
अक्षय मांडवकर
९७६८६८४०३१