मुंबई (अक्षय मांडवकर) - विदर्भातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित केलेल्या तारा या वाघिणीला (एसटीआर-टी५) या वाघिणीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जोडीदार मिळाला आहे (sahyadri tiger). चांदोली राष्ट्रीय उद्यानात नुकत्याच टिपलेल्या छबीत तारी वाघीण ही सेनापती (एसटीआर-टी१) आणि सुभेदार (एसटीआर-टी२) या वाघांसोबत दिसून आली आहे. मात्र, तिने सेनापती या वाघासोबत मिलन केल्याची शक्यता अधिक आहे (sahyadri tiger). कारण, सेनापतीने ताराच्या हद्दक्षेत्रात प्रवेश केल्यापासून सुभेदार दूर राहत असून सेनापती आणि तारा सातत्याने एकत्रित दिसून येत आहेत. (sahyadri tiger)
वाघीण माजावर साधारण ३ ते ६ दिवस असते. या काळात तिच्या हद्दक्षेत्रात ज्या वाघांच्या हद्दक्षेत्रांची सरमिसळ झालेली असते ती त्या वेगवेगळ्या वाघांना भेटू शकते. त्यामधील एकापेक्षा जास्त वाघांसोबत मिलन करु शकते. यामागे बछड्यांचे संरक्षण, अनुवांशिक विविधता, गर्भधारणेची खात्री, क्षेत्राचा विस्तार किंवा संघर्ष अशी बरीच कारणे असू शकतात. तिच्या हद्दक्षेत्रात जर दोन किंवा तीन वाघांच्या हद्दक्षेत्रांची सरमिसळ होत असेल, तर ती त्या प्रत्येकासोबत मिलन करू शकते. ज्यामुळे प्रत्येक वाघाला वाटते जन्मास आलेली पिल्ले आपली आहेत. त्यामुळे ते पिल्लांना मारत नाहीत. याला सूडो मेटिंग असे म्हणतात. ताराने देखील नेमके हेच केले आहे. चंदाच्या धाकामुळे तारा चांदोलीचे धरण पोहून धरणाच्या पलीकडे गेली होती. यादरम्यान ती पाच वेळा धरण पोहली. मात्र, तिने स्वत:चे हद्दक्षेत्र हे धरणापलीकडेच निर्माण केले. तिथे पोहोचला एसटीआर-टी९ म्हणजेच शिलेदार हा वाघ. त्यानंतर तारा ही शिलेदारसोबत दिसू लागली. तेवढ्यात राधानगरीत जाऊन पुन्हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात परतलेला एसटीआर टी२ म्हणजेच सुभेदार तिथे पोहोचला. त्यानंतर तारा सुभेदारसोबत दिसू लागल्याची माहिती ती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण यांनी दिली. मात्र, चंदाच्या हद्दक्षेत्रात असणारा सेनापती हा वाघ ज्यावेळी धरण पोहून ताराच्या हद्दक्षेत्रात आला तेव्हा चित्र बदलल्याचे त्यांनी सांगितले.
सेनापती हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बलाढ्य वाघ असल्याने त्याने सुभेदारकडून ताराचा ताबा मिळवला. चंदानंतर आता तारासोबतही त्याने मिलन केले आहे. त्यासाठी तो सातत्याने धरण पोहून चंदा आणि तारा या दोघींच्याही हद्दक्षेत्रात आपले अस्तित्व कायम ठेवतो आहे. असे करताना तो सुभेदारला देखील आपल्या हद्दक्षेत्रात फिरू देत आहे. सह्याद्री वाईल्डलाईफ फाऊंडेशनने व्याघ्र प्रकल्पाला दिलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपलेल्या छबीत सेनापती आणि सुभेदार एकाच वाटेवरुन सायंकाळी आणि रात्री वावरताना दिसतात. येत्या काळात तारा गर्भवती राहणार का, हे पहावे लागेल.