‘अरण्यऋषीं’चा लेखक

    30-Apr-2026   
Total Views |
Darshan Prashant Dudhane
 
वन्यजीव क्षेत्रामध्येच करिअर करण्याची वाट निवडून विदर्भातील निसर्गाचा खजिना उलगडून दाखवणार्‍या दर्शन प्रशांत दुधानेविषयी...
 
दर्शनचा जन्म दि. २३ ऑक्टोबर १९९९ रोजी विदर्भातील वर्ध्यामध्ये झाला. ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ असे म्हणतात. मात्र, दर्शनच्या बाबतीत तसे काहीच घडले नाही. दर्शनचे वडील प्रशांत दुधाने हे मुख्याध्यापक, तर आई ‘जीवशास्त्रा’ची शिक्षिका. दर्शन लहानपणापासून साहसी गोष्टींकडे आकर्षित होत असे. निसर्गाकडेही तो साहसाच्याच दृष्टिकोनातून पाहत होता. परंतु, दहावीनंतर त्याच्या या दृष्टिकोनाला आकलन, निरीक्षण आणि विज्ञानाची जोड मिळाली. याला कारणीभूत ठरली २०१५ साली आयोजित करण्यात आलेली ‘निसर्ग जागर सायकल यात्रा.’ त्यावेळेस वर्ध्यामध्ये ‘बहार नेचर फाऊंडेशन’ नावाच्या संस्थेचा उगम झाला होता. या संस्थेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय सायकल यात्रेत दर्शन सहभागी झाला. मात्र, या यात्रेने दर्शनसमोर निसर्गाचे अनेक पैलू उलगडले. निसर्ग कसा पाहावा, याची अनुभूती मिळाली. त्यानंतर ‘बहार नेचर फाऊंडेशन’च्या प्रत्येक उपक्रमात दर्शनने सहभागी होऊ लागला. नियमित पक्षीनिरीक्षणास, जंगले पालथी घालण्यास सुरुवात केली. त्यातून त्याच्याभोवती निसर्गाचा परिक्षेप वाढत गेला.
 
पक्ष्यांची ओळख पटवल्यावर दर्शनने पक्ष्यांसंबंधीची निरनिराळी संमेलने आणि कार्यशाळांमध्येही हजेरी लावली. २०१६ मध्ये सेवाग्राममध्ये पार पडलेले ‘विदर्भ पक्षी संमेलन’ असो वा शेतकरी अथवा विद्यार्थी पक्षी संमेलन, अशा संमेलनामध्ये त्याने आपला सहभाग नोंदवला. २०१८ मध्ये ‘बहार नेचर फाऊंडेशन’ने वर्धा शहराचा पक्षी निवडण्यासाठी एक निवडणूक घेण्याचे ठरवले. या निवडणुकीच्या आयोजनात दर्शनने हिरिरीने सहभागी होऊन महत्त्वाची भूमिका बजावली. ही निवडणूक लोकसहभागामधून पार पडली. ज्यामध्ये पक्ष्यांच्या पाच प्रजाती या ‘उमेदवार’ म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या. या निवडणुकीत वर्ध्यामधील ५५ हजार लोकांनी मतदान केले आणि त्यातून भारतीय ‘निलपंख’ या पक्ष्याची निवड वर्धा शहराचा ‘शहरपक्षी’ म्हणून करण्यात आली. निसर्गाची ही आवड जोपासली जात असताना, मुलाचे या क्षेत्राकडे वळणे घरच्यांना काही मान्य नव्हते. वन्यजीव क्षेत्रात करिअर करण्यासंदर्भात दर्शनच्या घरची परिस्थिती अनुकूल नव्हती. मात्र, तरीही तो प्रयत्नशील असला; तरी त्याचे लक्ष साहस या गोष्टीकडेही होते.
 
दर्शनला साहसाचे आकर्षण हे सैन्यदलामुळे होते. त्याला सैन्यात भरतीदेखील व्हायचे होते. त्यादृष्टीने त्याने प्रयत्नदेखील केले. भारतीय छात्रसेनेतील राखीव जागांमुळे सैन्यदलाकडून अधिकारी पदासाठी त्याला बोलावणे आले होते. मात्र, त्यादरम्यान त्याला डेंग्यूने गाठले आणि सैन्यदलात भरती होण्याची संधी हुकली. त्यावेळी ‘बजाज कॉलेज ऑफ सायन्स’मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या दर्शनने निसर्गाच्या वाटेची निवड केली. ‘प्राणिशास्त्र’ विषयातून ‘प्राण्यांचे शरीरविज्ञानशास्त्र’ यावर त्याने आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. याकाळात ‘पद्मश्री’ अरण्यऋषी मारुती चितमपल्ली नागपूरवरून वर्ध्याला स्थायिक झाले होते. तेव्हा दर्शन आणि त्यांची गाठभेट झाली. ‘महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालया’त चितमपल्ली वास्तव्यास होते. त्याठिकाणी दर्शन त्यांना भेटण्यास नियमित जाई. एकदा चितमपल्लींनीच त्याला विचारले, "माझा लेखक होशील का?” त्यावेळी चितमपल्ली ‘वृक्षकोशा’सह काही कोशांचे लेखन करत होते.
 
वयोमानानुसार, लेखन करणे जमत नसल्यामुळे दर्शन त्यांना ते लेखन करून देण्यास मदत करी. एकाअर्थी, ‘अरण्यऋषी’चा निसर्गाशीर्वादच दर्शनला मिळाला. २०१९ साली ‘महाराष्ट्र पक्षीमित्र संघटने’चे ‘पक्षीमित्र संमेलन’ अलिबागमधील रेवदंडा येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात सहभागी होण्यासाठी ‘बहार नेचर फाऊंडेशन’ने वर्ध्याहून अलिबागला सायकलने जाण्याचे ठरवले. त्यातही दर्शनने सहभाग घेतला. ही सायकल यात्रा ‘पक्षी सप्ताह’ हा सरकारी पातळीवर साजरा करण्याचा संकल्प घेऊन आयोजित करण्यात आली. मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांना सरकारी पातळीवर ‘पक्षी सप्ताह’ साजरा करण्याचे निवेदन द्यायचे आणि मग अलिबागमध्ये संमेलनाकरिता जायचे, असे ठरले. यात्रा सुरू झाली. ही यात्रा वेगवेगळ्या शहरात थांबून निवेदनावर सात हजार सह्या घेण्यात आल्या आणि अखेरीस मुंबई गाठून मुख्यमंत्र्यांना हे निवेदन देण्यात आले. याची फलश्रुती म्हणजे काही महिन्यांनंतरच सरकारी पातळीवर नोव्हेंबर महिन्यात ‘पक्षी सप्ताह’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
दर्शनची निसर्गाप्रति काम करण्याची तळमळ पाहता, अनेक संस्थांनी त्याला त्यांच्यासोबत काम करण्यासाठी विचारणा केली. मात्र, त्याला विदर्भामध्येच राहून काम करायचे होते. त्यासाठी त्याने ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालया’त काम करण्याचे ठरवले. सध्या तो याठिकाणी जीवशास्त्रज्ञ तथा शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहे. सोबत पक्षी आणि निसर्ग निरीक्षणाचे त्याचे काम सुरू आहे. या माध्यमातून त्याने नागपूरमधून प्रथमच ‘नेवर’ (Barringtonia acutangula) या प्रजातीची नोंद केली असून, अनेक दुर्मीळ पक्ष्यांच्या नोंदीही केल्या आहेत. वन्यजीव क्षेत्रामध्येच करिअर करून निसर्गाची जाण जागृत ठेवणार्‍या दर्शनला पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.