वाढती महागाई, घटते रोजगार, जनतेमध्ये राष्ट्रप्रमुखांविषयी खदखदणारा असंतोष, बाललैंगिक शोषणाचे जगाला लाज आणणारे कलंकित प्रकरण आणि आता खुद्द राष्ट्राध्यक्षांवरील हल्ल्याचा प्रयत्न... ही कुठल्या ‘थर्ड वर्ल्ड’मधील देशाची नव्हे, तर स्वत:ला‘महासत्ता’ म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेची सद्यस्थिती. हे पाहता, तुम्हीच सांगा मग नेमके ‘नरकाचे द्वार’ कोणते?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा तिसरा प्रयत्न अयशस्वी ठरला. दि. २५ एप्रिलला वॉशिंग्टन येथील ‘हिल्टन हॉटेल’मध्ये ‘व्हाईट हाऊस’मधून वार्तांकन करणाऱ्या विविध माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी एका वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रम्प यांनी पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाचे आयोजन केले असल्यामुळे, तसेच सध्याच्या अमेरिका आणि इराणमधील वाटाघाटींच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलतात, याची उत्सुकता होती. कार्यक्रमाला सुमारे २ हजार, ५०० लोक उपस्थित होते. डोनाल्ड ट्रम्प, उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी मंचावर असताना गोळ्या झाडल्याचा आवाज झाला आणि सुरक्षारक्षकांनी सगळ्या अभ्यागतांना सुरक्षित जागी हलवले. नंतर लक्षात आले की, कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या ३१ वर्षीय कोल थॉमस ॲलन या अभियंत्याने शस्त्रास्त्रांसह घुसण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प यांच्या सुरक्षारक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने गोळीबार केला. हल्लेखोराने हल्याच्या दहा मिनिटांपूर्वी आपण हल्ला कशासाठी करत होता, याचा जाहीरनामा आपल्या कुटुंबीयांना पाठवला होता. तो हिल्टन हॉटेलमध्येच मुक्कामाला होता. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या कार्यक्रमामधील ढिसाळ सुरक्षा व्यवस्था पाहून अनेकांना आश्चर्य वाटते.
दि. १३ जुलै २०२४ रोजी पेन्सिल्विनियातील बटलर येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सभेतील भाषणादरम्यान गोळ्या चालवण्यात आल्या. एक गोळी कानाला चाटून गेल्यानंतर ज्या त्वरेने ट्रम्प खाली वाकले आणि तेथील सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला मारल्यानंतर ज्या निग्रहाने त्यांनी रक्तबंबाळ चेहऱ्यासह हाताची मूठ आवळून उपस्थित जनसमूहाला आपला लढा चालू ठेवण्याचा आदेश दिला, त्यामुळे अमेरिकेच्या निवडणुकीचे पारडे फिरले. त्यानंतर फ्लोरिडा येथे ट्रम्प यांच्या गोल्फ कोर्सवरही त्यांच्या हत्येचा प्रयत्न अयशस्वी झाला. अमेरिकेत राजकीय हिंसाचार जुना नाही. आतापर्यंत अमेरिकेच्या चार अध्यक्षांच्या हत्या झाल्या असल्या, तरी १९८१ साली अध्यक्ष रेनॉल्ड रिगन यांच्या हत्येच्या अयशस्वी प्रयत्नानंतर अध्यक्षांना लक्ष्य करण्यात हल्लेखोरांना यश आले नव्हते. त्यामुळे जगातील सगळ्यात जुनी लोकशाही व्यवस्था म्हणून ओळख असणाऱ्या अमेरिकेत पुन्हा एकदा राजकीय हिंसाचाराचे पर्व सुरू झाले का, अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे.
गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी उजव्या विचारसरणीचे मायकल सॅवेज यांच्या पॉडकास्टमधील संवादाची चार पानी पोस्ट समाजमाध्यमांत शेअर केली. त्यात एकूणच स्थलांतरितांबद्दल आणि विशेषतः भारतीय स्थलांतरितांबद्दल अनेक अपमानास्पद दावे केले होते. “अमेरिकेतील भारतीय वंशाचे उद्योजक अमेरिकन तरुणांऐवजी भारतातून आलेल्या लोकांना नोकऱ्या देतात. त्यांना धड इंग्रजीही बोलता येत नाही. अमेरिकेत मूल जन्माला आले की, त्याला तत्काळ नागरिकत्व मिळते आणि मग हे लोक भारत, चीन किंवा जगातील अन्य कुठल्यातरी ‘नरकमय’ भागातून आपले संपूर्ण कुटुंब अमेरिकेत आणतात.” हे मत स्वतः ट्रम्प यांचे नसले, तरी त्यांनी ते समाजमाध्यमांवर प्रसारित करून एका प्रकारे त्याला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
लवकरच अमेरिकेच्या संसदेमध्ये ‘एचबी व्हिसा’ कार्यक्रम पुढील काही वर्षे गोठवून त्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याबाबतचे विधेयक सादर करण्यात आले आहे. त्यात ‘एच१बी व्हिसा’ची लॉटरी पद्धत बंद करणे, वार्षिक मर्यादा ६५ हजारांहून २५ हजारांवर आणणे, तसेच वर्षाला किमान दोन लाख डॉलर पगार असणाऱ्यांनाच या व्हिसासाठी पात्र ठरवण्याच्या अटी टाकण्यात आल्या आहेत. या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या दिसत असल्या, तरी त्या एकाच श्रृंखलेचा भाग आहेत.
अमेरिका पूर्णपणे दुभंगलेली आहे. अमेरिकेतील मूठभर लोक उच्च तंत्रज्ञान क्षेत्राद्वारे संपूर्ण जगावर राज्य करत आहेत, पण दुसरीकडे तेथील कोट्यवधी श्वेतवणय लोकांना आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करण्यासाठी दोन किंवा तीन नोकऱ्या कराव्या लागत आहेत. अमेरिकेत पैसे वाचवायची पद्धत नसल्यामुळे अनेक तरुणांना उच्च शिक्षण परवडत नाही. कर्ज काढून उच्च शिक्षण घेतले, तर ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या मिळत नाहीत. आपल्या समस्यांना जगातील इतर भागांतून आलेले लोक कारणीभूत आहेत, असा त्यांचा विश्वास. गंमत म्हणजे, पारंपरिकरित्या डाव्या डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करणाऱ्या भारतीय लोकांनी २०२४ सालच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या अति-डाव्या, तसेच मुस्लीमधार्जिण्या धोरणांना कंटाळून मोठ्या संख्येने ट्रम्प यांच्यासाठी निधी संकलन आणि मतदानही केले. तेव्हा अशी अपेक्षा होती की, ट्रम्प यांच्या विजयामुळे वर्षानुवर्षे रिपब्लिकन पक्षावरील श्वेतवणय वंशवादी लोकांचा प्रभाव कमी होईल आणि अमेरिकेतील भारतीयांना त्यात योग्य ते स्थान मिळेल. ट्रम्प यांच्या विजयामध्ये अमेरिकेच्या औद्योगिक पट्ट्यातील श्वेतवणय श्रमिकांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचा भारतीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन धार्मिक किंवा वंशवादी नसला, तरी तो स्वच्छ नाही. बाहेरून आलेल्या लोकांमुळे अमेरिकेतील श्वेतवणय लोकांना रोजगार मिळत नाहीत, अशी त्यांची धारणा. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आणि देशाच्या अन्य भागांत भूमिपुत्रांचे राजकारण करणारे पक्ष परप्रांतीयांकडे पाहतात, त्याचप्रमाणे हे लोक अमेरिकेत येऊन स्थायिक झालेल्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व मिळवलेल्या भारतीयांकडे पाहतात.
सध्याच्या इराण युद्धाला या वर्गाचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. अमेरिकेने जगाचे प्रश्न न सोडवता, अंतर्गत विषयांत लक्ष घालावे, असे त्यांचे मत. इराणमधील युद्ध एक-दोन आठवड्यांत संपेल, अशी ट्रम्प यांची धारणा असल्यामुळे त्यांनी या पाठीराख्यांचे मत विचारात न घेता, युद्धामध्ये उडी घेतली. इराणमधील युद्धाला दोन महिने पूर्ण होत असताना, त्याचा अंत दृष्टिपथात नाही. या युद्धामुळे अमेरिकेत महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली असून, गॅसोलिनच्या किमती ५० टक्के वाढून एक गॅलनला चार डॉलरच्या वरती पोहोचल्या आहेत. पुढच्या महिन्यात त्या पाच डॉलरचा आकडा पार करतील, असा अंदाज आहे. परिस्थिती अशीच राहिली, तर नोव्हेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला सिनेट, तसेच प्रतिनिधीगृहातील आपले बहुमत गमवावे लागेल. युद्ध अर्ध्यावर सोडले, तर इराण होर्मुझच्या आखातातून करवसुली करून युद्धात झालेले नुकसान भरून काढण्यासोबतच अण्वस्त्र बनवण्याच्या प्रयत्नांना वेग देईल.
या परिस्थितीत ट्रम्प आपल्या युद्धविरोधी मतदारांचे लक्ष इतरत्र वळवण्याचे प्रयत्न करत आहेत. अमेरिकेतील भारतीयांना त्याची किंमत चुकवावी लागत आहे. ट्रम्प यांची खेळी निवडणुकांकडे लक्ष ठेवून केली असली, तरी त्यातून समाजमन कलुषित होत आहे.
‘झोहो’ या जगप्रसिद्ध भारतीय कंपनीचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी एका ‘ट्विट’द्वारे अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांना साद घातली आहे. ते म्हणतात, “जसे मी ३७ वर्षांपूर्वी केले होते, तसेच तुम्हीही अमेरिकेत पैशांशिवाय, पण उत्तम शिक्षण आणि भारताचा सांस्कृतिक वारसा घेऊन आलात. तुम्ही उल्लेखनीय यश मिळवले. अमेरिका आपल्यासाठी अनुकूल ठरली; त्याबद्दल आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. कृतज्ञता हा आपल्या भारतीय स्वभावाचा अविभाज्य भाग आहे. तुम्हाला वाटत असेल की पुढील निवडणूक हे चित्र बदलेल; पण प्रत्यक्षात तुमची निवड अशी असेल; एकीकडे भारतीय संस्कृतीबद्दल द्वेष बाळगणारे आणि दुसरीकडे स्वतः संस्कृतीचाच तिरस्कार करणारे. हीच ‘कट्टर उजवे’ विरुद्ध ‘जागरूक डावे’ अशी लढाई आहे आणि तुम्ही त्या संघर्षाचे केवळ प्रेक्षक आहात.” आपल्या पोस्टचा समारोप करताना ते म्हणतात, “कृपया मायदेशी परत या. भारतमातेला तुमच्या प्रतिभेची गरज आहे. आपल्या विशाल तरुण पिढीला समृद्धीकडे नेण्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे मिळवलेले तंत्रज्ञान नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे आहे. चला, हे काम आपण एका ध्येयभावनेने आणि उत्साहाने करूया.” ही पोस्ट वाचून अमेरिकेतील किती भारतीय वंशाचे लोक भारतात परत येतील, हे सांगणे अवघड असले, तरी त्यांच्यापैकी अनेकांच्या मनात अशी भावना निर्माण झाली आहे. इतर देशांची ‘नरकाशी’ तुलना करणाऱ्या अमेरिकन नेत्यांना अमेरिकेतील परिस्थिती हाताळणे अवघड झाले आहे, हेच खरे!