होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदीमुळे अनेकांच्या कल्पनाशक्तीला भलतेच धुमारे फुटायला लागले आहेत. दि. २८ ऑक्टोबर १९४३ या दिवशी ‘यू. एस. एस. एल्डरिज’ ही अमेरिकन नौदलाची विनाशिका ‘फिलाडेल्फिया’ नाविक तळावरून एकाएकी गायब झाली आणि ३२० किमी दूरच्या नॉर्फोक बंदरात प्रकट झाली. याला एखादी वस्तू ‘टेलिपोर्ट होणे’ असे म्हणतात. पर्शियन आखातातून येणारे तेलाचे टँकर्स अशा रितीने ‘टेलिपोर्ट’ करता येतील का, याबद्दल लोक चर्चा करीत आहेत. असे अर्थातच करता येणार नाही. पण, यानिमित्ताने अमेरिकन समाजमानसात कोणकोणत्या ‘कॉन्स्पिरसी थिअरीज’ धुमाकूळ घालत असतात, त्याकडे एक दृष्टिक्षेप टाकूया.
भारताचा संपूर्ण आर्थिक व्यवहार रिझर्व्ह बँक संचालित करते; पण खुद्द रिझर्व्ह बँक भारत सरकारच्या अर्थमंत्रालयाद्वारे संचालित केली जाते. अमेरिकेत असे नाही. फेडरल रिझर्व्ह बँक ही सगळे आर्थिक व्यवहार संचालित करते, पण ती फेडरल गव्हर्नमेंटच्या म्हणजे अमेरिकन केंद्र सरकारच्या अधीन नाही. असे कसे घडू शकते, या तांत्रिक तपशीलात आता न जाणे योग्य. परंतु मुद्दा असा की, त्यामुळे अनेकांचे असे म्हणणे आहे की, ‘इल्युमिनाटी’, ‘फ्री मेसन्स’, ‘बिल्डरबर्ग’, ‘कमिटी ऑफ थ्री हंट्रेड’ इत्यादी गुप्त पंथ अमेरिकेचा संपूर्ण अर्थ व्यवहार आपल्या ताब्यात ठेवून आहेत.
अमेरिकेत जगातल्या प्रचलित शब्दांपेक्षा वेगळे शब्द वापरण्याची फॅशन आहे. त्यामुळे ते करन्सी नोटेला ‘नोट’ न म्हणता ‘बिल’ असे म्हणतात. अमेरिकन चलनामध्ये सात प्रकारच्या ‘नोटा’ किंवा ‘बिल्स’ प्रचारात आहेत. सगळ्यात लहान नोट एक डॉलरची आहे. तिच्या पुढच्या म्हणजे दर्शनी भागावर अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिग्ंटन याचे चित्र आहे. पाठच्या बाजूला एका कोपर्यात ‘गरुड’ हे अमेरिकेचे राष्ट्रीय चिन्ह आणि दुसर्या कोपर्यात एक पिरॅमिड आणि त्याच्यावर एक डोळा असे चिन्ह आहे. अनेक अभ्यासकांच्या म्हणण्याप्रमाणे हे चिन्ह ‘इल्युमिनाटी’ या गुप्त पंथाचे बोधचिन्ह आहे. त्यानंतर दोन डॉलरच्या नोटेवर एका बाजूला टॉमस जेफर्सन या माजी राष्ट्राध्यक्षाचे चित्र आणि पाठच्या बाजूला अमेरिकेच्या स्वातंत्र्याची घोषणा, या प्रसंगाचे चित्र आहे. पाच डॉलरच्या नोटेवर एका बाजूला अब्राहम लिंकनचे चित्र, तर पाठच्या बाजूला ‘लिंकन मेमोरियल’ या वास्तूचे चित्र आहे. नंतर दहा डॉलरच्या नोटेवर पुढच्या बाजूला अलेक्झांडर हॅमिल्टन हा राष्ट्राध्यक्ष, तर पाठीमागे अमेरिकन ट्रेझरीचे चित्र आहे. २० डॉलरच्या नोटेवर पुढे अॅन्ड्रयू जॅकसन हा राष्ट्राध्यक्ष, तर पाठी ‘व्हाईट हाऊस’चे चित्र आहे. ५० डॉलरच्या नोटेवर पुढे युलिसिस ग्रँट हा राष्ट्राध्यक्ष, तर पाठी ‘कॅपिटॉल’ या अमेरिकन संसदेच्या इमारतीचे चित्र आहे आणि १०० डॉलरच्या नोटेवर पुढे बेंजामिन फ्रॅन्कलिन हा राष्ट्राध्यक्ष, तर पाठी ‘इंडिपेन्डन्स हॉल’ म्हणजे ज्या इमारतीत अमेरिकेच्या स्वातंत्र्याची उद्घोषणा करण्यात आली, तिचे चित्र आहे.
एक ते १०० डॉलरपर्यंतच्या या प्रत्येक नोटेवर अन्य आवश्यक नोंदींबरोबरच एक वाक्य आवर्जून लिहिलेले असते. ते म्हणजे, ‘इन गॉड वुई ट्रस्ट.’ ‘आम्ही देवावर विश्वास ठेवतो.’ जगातली सर्वशक्तिमान अमेरिका आपल्या चलनी नोटांवर हे वाक्य आवर्जून छापते. शासन हे निधर्मी असले पाहिजे, ‘सेक्युलर’ असले पाहिजे वगैरे उपदेश फक्त हिंदू समाजालाच करणार्या आपल्याकडच्या कथित निधर्मी विचारवंतांनी हे आवर्जून लक्षात घ्यावे. असल्या निधर्मी मुखंडांची पोरं बहुधा कायमची अमेरिकेत निघून गेलेली असतात! त्यांच्याकडे गेल्यावर, पोरांनी नोटा हातात दिल्या, तर नीट पाहा, अमेरिकन शासन निधर्मी नाही, हे ते शासनकर्ते, सध्याच्या पृथ्वीवरचा जो परमेश्वर म्हणजे ‘डॉलर,’ त्या नोटेवरच ठासून सांगतायत! ‘इन गॉड वुई ट्रस्ट!’ असो. तर या नोटांचे हे वर्णन एवढ्याचसाठी दिले की, अमेरिकेत नव्यानेच प्रकट झालेल्या एका ‘कॉन्स्पिरसी थिअरी’प्रमाणे या विविध नोटा एका विशिष्ट प्रकारे दुमडल्या की, प्रथम दिसते की ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’चे दोन टॉवर्स व्यवस्थित उभे आहेत; मग दिसते की त्यांच्या शिखरांमधून धूर येत आहे; मग दिसते की ते भुईसपाट होऊन तिथे फक्त एक धुराचा ढग उरला आहे. हे अविश्वसनीय आहे, पण असे दिसते, हे तर कुणी नाकारू शकत नाही.
युरोपात गेली कित्येक शतके अशा समजुती रूढ आहेत की, ज्यांना अतींद्रिय शक्ती अवगत आहेत. असे काही लोक एकत्र येऊन संपूर्ण जगावर राज्य करू पाहात आहेत. या लोकांच्या गुप्त संघटना असून, विविध सैतानी अघोरी देवतांची उपासना करून ते अतींद्रिय शक्ती मिळवत असतात. ‘इल्युमिनाटी’, ‘फ्री मेसन्स’, ‘बिल्डरबर्ग’, ‘कमिटी ऑफ थ्री हंट्रेड’ ही या गुप्त संघटनांपैकी काहींची नावे आहेत. युरोपात चर्चमुळे या सगळ्या अघोर पंथीयांना बराच पायबंद बसला. (म्हणजे, असे युरोपीय अभ्यासकांना वाटते.) मग १५व्या शतकात युरोपीय लोकांना स्थलांतर करण्यासाठी अमेरिका हा एक नवाच भूप्रदेश मिळाला. युरोपमध्ये ज्यांना काही उपजीविकेचे साधन नव्हते, ते लोक भराभर अमेरिकेत गेले. तसेच हे गुप्त पंथाचे लोकपण गेले. नव्या अमेरिकन राष्ट्राचे ‘फाऊंडिंग फादर्स’ किंवा ‘उद्गाते’ असे ज्यांना म्हटले जाते, ते सगळेच लोक म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन, टॉमस जेफर्सन, बेंजामिन फ्रॅन्कलिन, अलेक्झांडर हॅमिल्टन, अॅन्ड्रयू जॅकसन हे सगळेजण ‘इल्युमिनाटी’ किंवा ‘फ्री मेसन्स’ पंथांचे अनुयायी होते. म्हणून तर एक डॉलरच्या नोटेवर पिरॅमिड आणि डोळा हे चिन्ह आले.
याला म्हणतात, ‘कॉन्स्पिरसी थिअरी’ किंवा ‘कारस्थान सिद्धांत.’ असे अनेक सिद्धांत पश्चिमी देशांमध्ये रूढ आहेत. हे सिद्धांत मांडणार्या अभ्यासकांचे असे म्हणणे आहे की, अशा अनेक गुप्त संघटना आजही अस्तित्वात असून, त्यांना संपूर्ण जगावर स्वामित्व मिळवायचे आहे. किमान संपूर्ण जगाच्या आर्थिक व्यवहारांवर त्यांना नियंत्रण मिळवायचे आहे; नव्हे, त्यांनी मिळवलेच आहे! कारण, डॉलर हेच आज जगातले सर्वांत मजबूत चलन आहे आणि तो डॉलर तर त्या गुप्त संघटनांच्या ताब्यात आहेच.
असेच इतरही अनेक ‘कारस्थान सिद्घांत’ वेगवेगळ्या क्षेत्रांत असून, त्यावर नियमितपणे लेखन करणारे अनेक पत्रकार आहेत, लेखक आहेत. त्यांच्यातले सगळचेजण काही छा-छू गिरी करणारे नसून, विद्वान आणि गांभीर्याने अभ्यास करणारे आहेत. आपल्याकडे जसा आपण ब्रिटिशांनी आपला इतिहास विकृत केल्याचा सिद्घांत मांडतो, तसा युरोपातले विद्वान त्यांच्या इतिहासाच्या उलट्या विकृतीकरणाचा सिद्घांत मांडतात. उदा. आपण असे म्हणतो की, भगवान गौतम बुद्ध इसवी सन पूर्व काळात होऊन गेला, पण ब्रिटिशांनी मुद्दाम त्याचा काळ इसवी सनानंतरचा दाखवला. म्हणजे, ‘आमचा येशू अगोदर; तुमचा बुद्ध नंतर,’ असे त्यांना दाखवायचे होते. युरोपीय विद्वान म्हणतात की, चर्च अधिकार्यांना येशू किंवा त्याचे धर्मप्रसारक किती महान होते, हे लोकांना दाखवायचे होते. पण, तशा फारशा गोष्टी उपलब्धच नव्हत्या. मग त्यांनी नंतरच्या काळातले राजे, संत किंवा तत्सम मोठ्या लोकांच्या जीवनातल्या गोष्टी उचलल्या आणि त्या अगोदरच्या काळातल्या येशू आणि त्याच्या शिष्यांच्या चरित्रांमध्ये घुसडल्या. यंव रे गब्रू!
खरे म्हणजे आपल्याला हा नमुना माहीत आहेच. विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय आणि त्याच्या दरबारातला चतुर तेनालीराम यांचे मजेदार किस्से आपल्याकडे अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी म्हणून खपवल्या जातात. असो. तर यातला महत्त्वाचा मुद्दा असा की, वर दिलेल्या ‘रिव्हर्स हिस्ट्री’ सिद्घांतावर खुद्द सर आयझॅक न्यूटनचा विश्वास होता. आता सर आयझॅक न्यूटनला तरी आपल्याकडचे, देवाला ‘रिटायर’ करायला निघालेले कथित विचारवंत आणि त्यांचे सहप्रवासी ‘अंधश्रद्धाळू’ म्हणणार नाहीत, अशी आशा करूया. अशा अनेक ‘कारस्थान सिद्घांतां’मधला एक मोठाच चमत्कारिक भासावा असा किस्सा म्हणजे, ‘यू. एस. एस. एल्डरिज’ या अमेरिकन नौदलातल्या युद्घनौकेचा. दि. २८ ऑक्टोबर १९४३ या दिवशी ‘एल्डरिज’ ही विनाशिका नौदलाच्या ‘फिलाडोल्फिया’ येथील तळावरून एकाएकी अदृश्य झाली. एक निळा झगझगीत प्रकाशझोत कुठून तरी आला आणि ३०० फूट लांबीची, १ हजार, ६०० टन वजनाची ‘एल्डरिज’ एकदम आपली दिसेनाशीच झाली. बघणार्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. ही काय भुताटकी!
पण, ही भुताटकी एवढ्यावर थांबली नाही. ‘फिलाडेल्फिया’ नाविक अड्ड्यापासून ३२० किमी दूर व्हर्जीनिया प्रांतातल्या नॉर्फोक बंदरात ’एस. एस. अॅन्ड्रयू फुरुसेथ’ नावाचे एक मालवाहू जहाज उभे होते. याच्या जवळ ही ‘एल्डरिज’ विनाशिका एकदम प्रकट झाली. फुरुसेथवरचे खलाशीपण चकित होऊन बघत राहिले. एकदम हवेतून प्रकट व्हावी, तशी ही ‘एल्डरिज’ आली तरी कुठून? पुन्हा थोड्या वेळाने ‘एल्डरिज’ तिथून गायब झाली आणि ‘फिलाडेल्फिया’तल्या मूळ जागी प्रकट झाली. नंतर असे आढळले की, ‘एल्डरिज’वरचे अनेक नौसैनिक गायब झाले आहेत. अनेकजण ‘एल्डरिज’च्या फळ्यांवर डिंकाने चिकटवावेत तसे चिकटून, जखडून पडले आहेत आणि अनेकजण कसल्यातरी जबरदस्त मानसिक धक्क्याने वेड लागण्यासारखे करताहेत.
‘कारस्थान सिद्धांत’वाल्यांचे मत असे की, अमेरिकन नौदल किंवा ‘सी.आय.ए.’ किंवा युद्धखाते अख्खी युद्धनौका अदृश्य करता येईल का, अशा प्रकारचे उच्च दर्जाचे वैज्ञानिक प्रयोग करत होते. युद्धनौका अदृश्य झाली; कालदृष्ट्यासुद्धा ती ‘टेलिपोर्ट’ झाली. म्हणजे, त्याच काळात ती लांब अंतरावरच्या दुसर्या ठिकाणी दृश्य झाली. मात्र, परत येताना ती पृथ्वीवर आज ज्या चार मिती - डायमेन्शन्स आहेत, लांबी, रुंदी, उंची आणि काळ यांच्या पलीकडच्या पाचव्या मितीमध्ये गेली. तिथून परत येताना तिच्यावरचे काही लोक याच पाचव्या मितीत राहिले, काही जहाजाला चिकटून परतले आणि काही त्या अतर्क्य, अमानवी अनुभवामुळे वेडे झाले. प्रचलित विज्ञानाच्या कोणात्याही कसोटीवर यांपैकी कोणतीही गोष्ट हडसून-खडसून सिद्ध होऊ शकलेली नाही. यामुळे कोणतेही सरकारी खाते वा वैज्ञानिक संस्था या प्रकाराला मान्यता देत नाही. पण सर्वसामान्य अमेरिकन समाजात मात्र ही कथा ‘फिलाडेल्फिया एक्सपेरिमेंट’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यावर याच नावाने पुस्तके, चित्रपट आणि दूरदर्शन मालिकादेखील निघाल्या आहेत.