मुंबई (अक्षय मांडवकर) - भारतामधून पहिल्यांदाच ‘डिस्कोडोरिस सेब्युएन्सिस’ या समुद्री गोगलगायीच्या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे (Discodoris cebuensis sea slug) . ही प्रजात मुंबईतील हाजीअली किनाऱ्यावर आढळली असून यापूर्वी तिच्या नोंदी इंडो-पॅसिफिक भागामधील आहेत (Discodoris cebuensis sea slug). या नोंदीमुळे मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात नांदणाऱ्या सागरी जैवविविधेतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. (Discodoris cebuensis sea slug)
चकाकते रंग आणि शोभिंवत अशा समुद्री गोगलगायी सागरी परिसंस्थेमधील आकर्षक जीव आहेत. नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी समुद्री शैवाळ, स्पॉज, कोरल आणि हायडॉइड यांचा बहरण्याचा कालावधी असल्याने त्यावर समुद्री गोगलगाय खाद्यग्रहणासाठी येतात. त्यामुळे हा काळ त्यांच्या निरीक्षणासाठी उत्तम असतो. मुंबईच्या हाजीअली येथील खडकाळ किनाऱ्यावर मंगळवारी पार पडलेल्या एका किनारी निरीक्षण मोहिमेमध्ये डिस्कोडोरिस सेब्युएन्सिस या प्रजातीची नोंद करण्यात आली. अमेय पारकर, जाॅन्सन वर्की आणि वैभव हळदीपूर यांनी या प्रजातीची नोंद केली. फिलिपिन्समधील सेबू बेटावरुन शोधण्यात आलेल्या या प्रजातीची भारतामधील ही पहिलीच नोंद असल्याची पुष्टी समुद्री गोगलगायींचे संशोधक डाॅ. विशाल भावे यांनी केली आहे. न्यू हवाई, मार्शल आयलंड्स, फिलीपिन्स (अनिलाओ), इंडोनेशिया या इंडो-पॅसिफिक भागामध्ये या प्रजातीच्या नोंदी आहेत. या प्रजातीचा समावेश समुद्री गोगलगायींच्या डिस्कोडोरिडे कुटुंबामध्ये होत असून भारतात या कुटुंबामध्ये ५५ पेक्षा अधिक आणि महाराष्ट्रात १५ प्रजाती आढळतात.
मुंबईत आढळलेल्या डिस्कोडोरिस सेब्युएन्सिस या प्रजातीचा रंग हलका तांबूस-तपकिरी आहे. ज्यावर गडद तपकिरी रंगाचे डाग आहेत. ही समुद्री गोगलगाय ३५ ते ५० मिलीमीटरपर्यंत वाढते. ती समुद्री स्पंज यावर अन्नग्रहण करते. या गोगलगायीच्या शरीरावरील अवयवांच्या रचना वैशिष्ट्यपूर्ण दिसतात. शरीराच्या पुढच्या बाजूला दिसणाऱ्या अॅंटिनासारख्या या अवयवांना ऱ्हायनोफोर म्हणतात. सेन्सरसारखे काम करणारे हे अवयव त्यांचे घाणेंद्रियेच असतात. तर मागच्या बाजूला फुलासारख्या दिसणाऱ्या या अवयवाला गिल्स म्हणतात. जमिनीवरच्या गोगलगायी ज्याप्रमाणे हवेमधून आॅक्सिजन मिळवतात. त्याच्या विरुद्ध समुद्री गोगलगायी या पाण्यातून आॅक्सिजन शोषून घेतात. त्यासाठी या गोगलगायींमध्ये श्वास घेण्यासाठी हा फुलासारखा दिसणारा अवयवय विकसित झालाय.
आत्मसंरक्षणाची पद्धत
उत्क्रांतीच्या काळात जमिनीवरच्या गोगलगायींच्या विरुद्ध बहुतांश समुद्री गोगलगायींनी आपल्या पाठीवरच्या शंखाचा त्याग केला. शंखामुळे जमिनीवरच्या गोगलगायींचा वेग मंदावला, याउलट शंखाचा त्याग केल्यामुळे समुद्री गोगलगायींच्या हालचालींना वेग मिळाला. मात्र, त्यांना शंखामुळे मिळणाऱ्या संरक्षणाला मुकावे लागले. त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी समुद्री गोगलगायींनी वेगवेगळ्या पद्धती आत्मसात केल्यात. प्रजातींनुसार या पद्धतींमध्ये विविधता आढळते. डिस्कोडोरिडे कुटुंबामधील समुद्री गोगलगायींची देखील आत्मरक्षणाची एक पद्धत आहे. डिस्कोडोरिस कुळातील गोगलगायी धोका जाणवल्यास गिल्स आणि ऱ्हायनोफोर शरीरात खेचून घेतात आणि समुद्री स्पन्चला चिकटून अगदी स्पाॅन्चमध्ये मिसळून जातात. आत्मसंरक्षणाची आपल्या अधिवासात मिसळून जात छ्द्मावरण होण्याची हे वैशिष्ट्य त्यांनी अंगीभूत केलय.