Mithi River : मिठी नदी स्वच्छतेसाठी ३०.८४ कोटींचे प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी

    22-Apr-2026
Total Views |
mithi river
 
मुंबई : (Mithi River) शहरातील पूरस्थिती टाळण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मिठी नदीचा गाळ काढणे आणि स्वच्छतेसाठी यंदाही कोट्यवधींचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. एकूण ३० कोटी ८४ लाख रुपयांचे तीन वेगवेगळे प्रस्ताव बुधवारी (ता. २२) स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी मांडले जाणार आहेत.
 
पालिकेच्या प्रशासनाने मांडलेल्या प्रस्तावानुसार, मिठी नदीच्या (Mithi River) विविध टप्प्यांमध्ये गाळ काढणे व साफसफाईची कामे हाती घेतली जाणार आहेत. यामध्ये पवई येथील फिल्टरपाडा ते कुर्ला येथील शिक्षक कॉलनीपर्यंतच्या कामासाठी ९ कोटी ७५ लाख रुपयांचे कंत्राट लघुत्तम निविदाकार प्रशांत प्रकाश बाळ यांना देण्याचा प्रस्ताव आहे.
 
कुर्ला शिक्षक कॉलनी ते बीकेसी कनेक्टर ब्रिजपर्यंत गाळ काढण्याचे १० कोटी ४६ लाख रुपयांचे काम तुळजा भवानी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात येणार आहे.
 
हेही वाचा :  Modern Maritime Technology : महाराष्ट्रात आधुनिक सागरी तंत्रज्ञानाचा वापर वाढणार
 
बीकेसी कनेक्टर ब्रिज ते माहिम आऊटफॉल व टेल चॅनेलपर्यंतच्या कामासाठी ९ कोटी ८९ लाख रुपयांचे कंत्राटही तुळजा भवानी कन्स्ट्रक्शन कंपनीलाच देण्याचा प्रस्ताव आहे.(Mithi River)
 
ही तिन्ही कामे लघुत्तम निविदाकारांच्या आधारे देण्यात येत असून, सर्व प्रस्तावांना स्थायी समितीची अंतिम मंजुरी अपेक्षित आहे.
दरम्यान, नालेसफाईच्या कामात दिरंगाई व निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर पालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. यापूर्वी दोन कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले असून, यापुढेही कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांना थेट काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे. त्यामुळे कंत्राटदारांवर अधिक जबाबदारी येणार असून, कामात कसूर केल्यास कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.(Mithi River)