मुंबई : (Modern Maritime Technology) राज्यातील सागरी वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळचे बंदरे निरीक्षक व तत्सम अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत सध्याच्या फेरीबोट व रो-रो सेवांचा सविस्तर आढावा घेत विविध सुधारणा उपायांवर चर्चा करण्यात आली.
राज्यातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता फेरीबोट सेवांमध्ये अधिक कार्यक्षमतेची गरज असल्याचे अधोरेखित करत मंत्री राणे यांनी तिकीट प्रणाली अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी डिजिटल अॅप विकसित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यामुळे प्रवाशांना जलद, सोयीस्कर आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत ओव्हरलोडिंग रोखणे, सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळणे आणि अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देशही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिले. याशिवाय परदेशातील प्रगत सागरी वाहतूक प्रणालींचा अभ्यास करून त्यातील आधुनिक तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, तसेच त्यासाठी ठोस आणि कृतीक्षम प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील नागरिकांना अधिक सुरक्षित, दर्जेदार व आधुनिक सुविधा दिल्याने शासनाच्या महसुलात वाढ होईल यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश ही या बैठकीत देण्यात आले.(Modern Maritime Technology)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.