नाशिकची बदलती ‌‘डेमोग्राफी‌’

Total Views |

नाशिक शहराने धार्मिक, ऐतिहासिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. नाशिकची धार्मिक ओळख तर त्रेतायुगापासून म्हणजे थेट प्रभू श्रीराम यांच्यापासून ओळखले जाते, तर इथला इतिहासही मोठा रंजक आहे. पुढे जाऊन येथे छापखाना सुरू झाल्याने नाशिकची ओळख यानिमित्ताने थेट सातासमुद्रापार पोहोचली. परंतु, या धार्मिक, ऐतिहासिक आणि औद्योगिक शहराबरोबरच शांत आणि संयमी अशा नाशिकच्या या ओळखीला जाणूनबुजून नख लावण्याचा प्रकार सुरू झाला आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर येथे लोकसंख्येची रचना बदलताना दिसते. त्यामुळेच काही ठिकाणी मुस्लीम समाजाची लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे शहरावर नजर फिरवली तर अगदी सहज लक्षात येईल, इतकी ही लोकसंख्या फोफावली आहे. या बदलामागे अनेक सामाजिक व आर्थिक कारणे सांगितली जात असली, तरी त्यांचा हेतू मात्र वेगळाच असल्याचे येथे घडणाऱ्या अलीकडच्या कारवायांवरून लक्षात येईल. विशेषत: नाशिकमधील मालेगाव रोड परिसर, भद्रकाली, द्वारका, जुने नाशिक, तसेच सातपूर आणि अंबड औद्योगिक भागांमध्ये गेल्या काही वर्षांत लोकसंख्यावाढ अधिक ठळकपणे नजरेत भरून येते.

या भागांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने विविध जिल्ह्यांमधून स्थलांतर झाल्याचे बोलले जाते. परंतु, रोहिंग्ये आणि बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या हा खरा शहराच्या सुरक्षेचा मुद्दा. बांधकाम, लघु उद्योग, कापडउद्योग, वाहनदुरुस्ती, भंगार आणि किरकोळ व्यापार अशा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने या भागांमध्ये त्यांची वस्ती अधिक दिसते. त्यामुळे शहराला एकप्रकारचा बकालपणा आला आहे. भद्रकाली आणि द्वारका हे जुने वस्तीभाग असल्याने येथे आधीपासूनच मुस्लीम समाजाची उपस्थिती होती. कुटुंबवाढ आणि नातेवाईकांजवळ राहण्याच्या प्रवृत्तीमुळे लोकसंख्या अधिक वाढली आहे. दुसरीकडे, औद्योगिक भागांमध्ये रोजगाराच्या संधींमुळे नवीन वस्ती निर्माण झाल्या असून, स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील वाढणारी विशिष्ट गुन्हेगारी लक्षात घेऊन अधिक धर्मांधता वाढणार नाही, याचीही काळजी घेणे गरजेचे.

जागो नाशिककर जागो...

एकीकडे शांत, संयमी आणि तितकेच भावनाशील असलेल्या नाशिक शहराची ओळख आता ‌‘धर्मांध नाशिक‌’ अशी होत तर नाही ना, इतकी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांवरून सहज लक्षात येईल. इथल्या सहिष्णू हिंदू समाजाने नेहमीच मोठ्या भावाच्या नात्याने इतर धर्मांना आपले समजत आपल्या छत्रछायेखाली जागा दिली. पण, आता याच मोठ्या भावाच्या मनावर मागील काही दिवसांत कधीही भरून न येणारे ओरखडे ओढण्याचे काम काही धर्मांधांकडून केले जात आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकची ही ओळख निश्चित भूषणावह नाही.

सिंहस्थ काळात नाशिकमध्ये देश-विदेशातून येणाऱ्या भाविक आणि साधू-संतांची सुरक्षा धोक्यात येणार नाही, यादृष्टीनेही आता अधिक गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. ‌‘कॉर्पोरेट जिहाद‌’चे नाशकात घडलेले प्रकरण कमी होते की काय, म्हणून या प्रकरणाची राळ खाली बसत नाही, तोच ‌‘लव्ह जिहाद‌’ची घटना समोर आली. या घटनेतील तरुणी उच्चशिक्षण घेण्यासाठी जळगाव येथून आपल्या पालकांना सोडून नाशिकमध्ये राहत होती. तिच्यावर तंजीर इनामदार नावाच्या मुस्लीमधमय तरुणाने सलग देोन वर्षे अत्याचार करत, सतत ‌‘ब्लॅकमेल‌’ करून तिच्या असाहाय्यतेचा फायदा आपली वासना भागविण्यासाठी केला. या हिंदू तरुणीसोबत घडलेला हा प्रकार निश्चितच किळसवाणा. पण, हिंदू म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाला विचार करायला लावणारादेखील आहे. हे कट्टरता पसरवणारे जसे एकत्र येऊन ‌‘कॉर्पेोरेट जिहाद‌’ आणि ‌‘लव्ह जिहाद‌’ यांसारखे प्रकार घडवून आणतात. तसेच आता हिंदूंनीही एक होण्याची वेळ अगदीच जवळ येऊन ठेपली आहे. कारण, धोका आता आपल्या दाराशी आला आहे. त्यामुळे यांना थोपवायचे असेल, तर एकीचे बळ दाखवण्याची नितांत गरज, तर यांचे नापाक इरादे धुळीस मिसळता येतील, नाहीतर अशाच आपल्या हिंदू भगिनींना धर्मभ्रष्ट करून त्यांना बुरख्याआड लपवले जाईल. यासोबतच, ‌‘प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाशिक‌’ अशी ओळखही जपायची असेल, तर नाशिककरांनाही तितकेच सजग राहावे लागेल.


विराम विलास गांगुर्डे

दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये नाशिक विभागीय कार्यालयात उपसंपादक या पदावर कार्यरत. द्राक्षपंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे जन्म आणि तेथेच बी. कॉम. ही पदवी, तर वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातून प्राप्त. ग्रामीण जीवन आणि अर्थकारण, राजकीय आणि सामाजिक या विषयावरील वृत्तांकनामध्ये विशेष रस.