लोकसेवा आयोगाच्या परीक्षा हा संयम आणि कष्टाचा एक मोठाच प्रवास. हा प्रवास यशस्वीपणे पार करत, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून ‘कर साहाय्यक’पदी निवड झालेल्या जयेश वारे याच्याविषयी...
जयेशचा जन्म डोंबिवलीत १९९७साली झाला. त्याचे मूळ गाव अंबरनाथ तालुयातील शेलारपाडा. त्याचे शालेय शिक्षण डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालय येथे झाले. त्यानंतर त्याने के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयातून ‘बीएस्सी’ पदवी संपादन केली. २०१८ला शिक्षण पूर्ण होताच, त्याला नोकरीची संधी चालून आली. एक ते दीड वर्षे अर्थार्जन केल्यानंतर, एका मित्राकडून त्याला ‘एमपीएससी’च्या स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली. आपणही ‘एमपीएससी’ची परीक्षा द्यावी, असेच जयेशला वाटू लागले. त्याने याच्या अभ्यासालाही सुरुवात केली.
२०२० मध्ये जयेशने ‘एमपीएससी’च्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. त्यासाठी ‘ध्रुव अॅकेडमी’मध्ये प्रशिक्षणवर्गही लावला. पण नोकरी करून प्रशिक्षणवर्गाला जाणे जयेशला शय होईना. त्यामुळे त्याने संपूर्ण लक्ष ‘एमपीएससी’कडेच केंद्रित करण्याचे ठरविले. सुरुवातीला काही वर्षे अपयशच पदरी पडत होते. पण अपयशाने खचून न जाता, पुन्हा अभ्यासाची जोमाने तयारी करण्यालाच प्राधान्य दिल्याचे जयेश सांगतो. २०२४ला ‘एमपीएससी’ संयुक्त गट ‘क’ परीक्षेची जाहिरात निघाली. त्याची परीक्षा २०२५ला झाली आणि २०२६ मध्ये त्या परीक्षेचा निकाल लागला. आता जयेशची ‘कर साहाय्यक’ या पदासाठी निवड झाली आहे. या यशाने कुटुंबीयासह शहरातील अनेक मान्यवर मंडळी आणि गावकरी त्याचे कौतुक करत आहेत.
जयेशचे सर्व बालपण डोंबिवली येथेच गेले. त्याला एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. जयेश हा भावंडांमध्ये सर्वांत लहान. त्यांचे वडील भगवान हे खासगी कंपनीत नोकरीला होते. आता ते सेवानिवृत्त झाले असून, त्याची आई करूणा या गृहिणी आहे. जयेशच्या जीवनात आई-वडिलांनी पुरवलेल्या सुविधांमुळे आर्थिक कोणताही संघर्ष नसला, तरी ‘एमपीएससी’ देताना त्याला शैक्षणिक संघर्षाला सामोरे जावे लागत होते. सुरुवातीच्या काळात एक-दोन मुख्य परीक्षा दिल्यानंतर, जयेशला या परीक्षेच्या स्वरुपाचा अनुभव आला. या परीक्षेत अपयश आले, तरी ते अगदी थोड्या थोड्या गुणांच्या फरकाने आलेले असायचे. त्यातच वडील सेवानिवृत्त होणार असल्याने, जयेशवर आणखी एक वेगळेच दडपण होते. पण कुटुंबाचा पाठिंबा होता. त्यामुळे अपयशातून पुन्हा जिद्दीने अभ्यासाला लागत असल्याचे जयेश सांगतो.
जयेशच्या वडिलांना सेवानिवृत्तीनंतरही, आणखी काही वर्षे काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्याचा फायदा कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी झाला आणि जयेशलाही आपला अभ्यास नीट करता आला. तसेच जयेश अध्यात्मिक बैठकीलाही जातो. तेथील विचारांनी जयेशच्या मनाची स्थितीही चांगली होत होती. मनाची स्थिती चांगली असल्याने, त्याचा लाभ अभ्यास करतानाही जयेश यास होई. ज्या मुलांना या क्षेत्रात यायचे आहे, त्यांनी आपले ध्येय लवकरात लवकर ठरवले पाहिजे, असे जयेश सांगतो. असे केल्याने पदवीच्या दुसर्या-तिसर्या वर्षीच अभ्यास करून, परीक्षा द्यायला सुरुवात करता येऊ शकते. तसेच, या परीक्षा देताना अपयश आले, तरी आत्मविश्वासाने पुन्हा अभ्यासाला लागा, हार मानू नका असा संदेशही जयेश देतो.
प्रत्येक विद्यार्थ्याने आपण या परीक्षेसाठी किती वर्षे देणार, हे ठरविले पाहिजे. या क्षेत्रात येताना सेवा परीक्षेत अपयश आले, तरी दुसर्या क्षेत्रात यश मिळवता येईल, असे पर्याय तयारीत ठेवावे असा मोलाचा सल्लाही जयेश आज स्पर्धा परीक्षा देणार्या मुलांना देत आहे. स्पर्धापरीक्षांच्या क्षेत्रात येऊ इच्छिणार्यांची संख्या सध्या वाढती आहे. चार ते साडे चार लाख विद्यार्थी दरवर्षी परीक्षा देतात. मात्र, नोकरीच्या संधी फारच कमी असतात. त्यामुळे प्रत्येकालाच या क्षेत्रात यश मिळेलच याची शाश्वती नसल्याने, दुसरा पर्यायही तयार ठेवा असे जयेश सांगतो.
आता सरकार जे विद्यार्थी थोड्या-फार गुणांच्या फरकाने अपयशी होतात त्यांचा डेटा बनवून, खासगी कंपनीना देण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे कौशल्य आहे, पण त्यांना सरकारी सेवेत जाता आले नाही त्यांच्यासाठी सरकारने उचलले हे पाऊल खूपच कौतुकास्पद आहे. पण या पद्धतीने विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यास अजून काही कालवधी जावा लागणार असल्याचेही जयेशने नमूद केले.
जयेशने ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षे’त यश मिळविल्याने, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे कौतुक केले आहे व त्याच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत. जयेश हा भाजपचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष व ‘उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समिती’चे संचालक राजेंद्र वारे यांचा पुतण्या आहे. राजेंद्र वारे यांनीदेखील या परीक्षेसाठी जयेशला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे अभ्यास करण्यासाठी आणखी हुरूप येत होता, असे जयेश सांगतो. तसेच लोकसेवा आयोग परीक्षेत यश मिळविल्यानंतर जयेशचा त्यांच्या गावकर्यांनीदेखील सत्कार केला. जयेशसारख्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!