पश्चिम घाटात मत्स्य प्रजातींचा शोध घेणारा कोल्हापुरातील तरुण मत्स्यसंशोधक अभिषेक चंद्रकांत शिर्के याच्याविषयी...
अभिषेकचा जन्म दि. २२ जानेवारी १९९९ साली कोल्हापुरात झाला. लहानपणीच त्याला माशांचे आकर्षण निर्माण झाले, ते राधानगरीतल्या त्याच्या आजोळामुळे. राधानगरीमधील घनदाट जंगलात असणार्या आजोळी अभिषेक रमायचा. कारण, गावाकडून ‘हिरकणी’ पुरस्कार प्राप्त झालेली त्याची आजी जंगलामध्येच राहायची. त्यामुळे सुटी पडली की, अभिषेक कोल्हापुरातून थेट राधानगरीचे जंगल गाठायचा. या सुटीत त्याचा मामा त्याला रात्री मासे पकडण्यासाठी घेऊन जात असे. पुन्हा घरी परतल्यावर वाहिन्यांवर प्रसारित होणारे ‘रिव्हर मॉनस्टर’सारखे कार्यक्रम त्याच्या मनाचा ठाव घ्यायचे. त्यातूनच हळूहळू माशांविषयीचे त्याचे आकर्षण वाढत गेले. त्यात भर म्हणजे हिंदीच्या शिक्षिकेने त्याला एक भेट दिली. ही भेट होती, एक छोटी मत्स्यपालनाची टाकी आणि काही बहुरंगी मासे. या माशांच्या संगोपनामधूनच अभिषेकला ‘मत्स्य’ विषयाची ओढ निर्माण झाली.
शालेय शिक्षणानंतर अभिषेकने विज्ञान शाखेत प्रवेश मिळवला. मात्र, विज्ञानातून वन्यजीव संशोधनाकडे किंवा मत्स्य संशोधनाकडे कसे वळायचे, हे कळत नव्हते. यादरम्यान, वृत्तपत्रात एक बातमी छापून आली होती की, कोकणातील कोण्या एका किनार्यावर एक भला मोठा व्हेल मृतावस्थेत वाहून आला आहे आणि त्यावर ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे (बीएनएचएस) संशोधक संशोधनाचे काम करत आहेत. तोपर्यंत व्हेल किंवा तत्सम सागरी जीव हे भारतात सापडतात, याची पुसटशीही कल्पना त्याला नव्हती. या बातमीमुळे ‘बीएनएचएस’ आणि सागरी संशोधनाचे आकर्षण निर्माण झाले. त्यामुळे बारावीची परीक्षा झाल्यानंतर लागलीच अभिषेकने मुंबई गाठून ‘बीएनएचएस’च्या कार्यालयाला भेट दिली. त्याठिकाणी सागरी संशोधिका रेश्मा पितळे त्याला भेटल्या. पितळे यांनी सागरी संशोधन आणि त्यासाठी लागणारे शिक्षण, त्या शिक्षणाचे टप्पे, संशोधन कार्यातील संधी अशी माहिती अभिषेक दिली. ही सर्व माहिती मिळवून अभिषेक कोल्हापुरात परतला आणि सागरी संशोधक व्हायचे, या विचाराने पदवीचा अभ्यास सुरू झाला.
पदवीच्या शेवटच्या वर्षात त्याने झेब्रा माशाचे पुनरुज्जीवन आणि त्याच्या पारदर्शक गर्भाच्या विकासाचे टप्पे यावर संशोधन केले. पदव्युत्तर शिक्षणासाठी ‘सागरी संशोधन’ विषयासंदर्भात अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यामध्ये त्याचा कल होता. काम माशांवरच करायचे होते; मात्र समुद्रातील. त्यामुळे गोवा विद्यापीठात अर्ज केला. परंतु, काही तांत्रिक कारणामुळे अर्ज रद्द झाला. त्यामुळे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठामधूनच ‘जीवशास्त्र’ विषयातून त्याने पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. या शिक्षणादरम्यान त्याने गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजातींचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली. शेवटच्या वर्षात त्याने कोल्हापुरातील जलस्रोतांमध्ये आढळणार्या परदेशी आक्रमणकारी मत्स्य प्रजातीवर संशोधन केले. त्या माध्यमातून अशा प्रकारच्या माशांच्या सहा प्रजातींची नोंद केली. शिक्षणानंतर माशांमध्येच संशोधनाचे काम करायचे, हे पक्के झाले. मात्र, माशांच्या वर्गीकरणशास्त्राकडे म्हणजेच, ‘टॅक्सॉनॉमी’मध्ये काम करण्याकडे त्याचा कल होता. त्यासाठी त्याने चेन्नईमध्ये भारत सरकारच्या ‘प्राणिशास्त्र सर्वेक्षण’ विभागात ‘इंटर्न’ म्हणून काम केले.
यानंतर अभिषेकने ‘डब्ल्यूआयआय’ या संस्थेसाठी चंबळ नदीच्या खोर्यातील कालीसिंध नदीत काम केले. वरिष्ठ संशोधक अॅन्थनी जॉन्सन यांच्याअंतर्गत त्याने कालीसिंध नदीमधील वन्यजीव सर्वेक्षणाचे काम केले. सोबतच त्याठिकाणी होणार्या बंधार्यासाठी पर्यावरणीय अहवाल तयार करण्याच्या अनुषंगाने मत्स्य सर्वेक्षणाचेदेखील काम पाहिले. या कामानंतर तो पुन्हा कोल्हापुरात परतला. त्यावेळी ‘बर्ड्स ऑफ कोल्हापूर’ ही मोहीम शहरात राबविली जात होती. त्यामध्ये सहभागी होत, या मोहिमेच्या व्यवस्थापनाची धुरा त्याने सांभाळली. आजही या मोहिमेच्या माध्यमातून शास्त्रीय पद्धतीने कोल्हापुरातील पक्ष्यांच्या सर्वेक्षणाचे काम केले जात आहे.
या मोहिमेदरम्यान अभिषेकची ओळख ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे (टीडब्लूएफ)’ संशोधक स्वप्नील पवार यांच्यासोबत झाली. पवार यांनी त्याला ‘टीडब्लूएफ’मध्ये मत्स्य संशोधनासंबंधी काम करण्यासंदर्भात विचारले. ही संधी हेरून अभिषेकने कामाला सुरुवात केली आणि नुकतीच त्याने एक माशाची नवीन प्रजाती शोधून काढली आहे. ‘शिंगळा’ (कॅटफिशच्या) माशाच्या नव्याने शोधलेल्या या प्रजातीचा समावेश ‘अमलीसेप्स’ या कुळामध्ये होतो. पश्चिम घाटातील गोवा आणि महाराष्ट्रात अधिवास असणार्या या माशाचे नामकरण ‘अमलीसेप्स वायव्य’ असे करण्यात आले आहे. येत्या काळात त्याने शोधलेल्या अजून नव्या प्रजातीचे शोधनिबंध प्रकाशित होणार आहेत. ‘टीडब्ल्यूएफ’च्या आजवरच्या या प्रवासात त्याला अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. माशांविषयी आकर्षण ते नव्या मत्स्य प्रजातीचा शोध दर्शवणारा अभिषेकचा हा प्रवास ध्येयवादाची साक्ष देणारा आहे. त्याला पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!