गुरुवार, दि. 16 एप्रिल रोजी भारताच्या संसदेचे खास अधिवेशन बोलावण्यात आलेले आहे. हा लेख तुमच्या वाचनात येईल, तोवर त्या खास अधिवेशनाचे फलितही समजलेले असेल. मुळात भारताच्या संसदेची वर्षभरात तीन अधिवेशने होतात. पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन, दुसरे पावसाळी अधिवेशन आणि तिसरे हिवाळी अधिवेशन. विशेष अधिवेशन हे मुद्दाम बोलावले जाते. चिनी संसदेचे मात्र वर्षभरात, एकदाच मार्च महिन्यात अधिवेशन होत असते. नुकतेच हे वार्षिक अधिवेशन पार पडले. त्यानिमित्ताने...
चिनी संसदेत एकूण दोन हजार, 977 खासदार आहेत. चीन हा भारताच्या साधारण दुपटीने मोठा देश आहे. चिनी समाजात एकंदर 56 वंशांचे लोक आहेत. यातला ‘हान’ हा वंश संख्येने सर्वात मोठा आहे. साहजिकच, चीनचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, भाषा, संस्कृती अशा जीवनाच्या सर्वच प्रमुख क्षेत्रांवर हानवंशीय लोकांचा वरचष्मा आहे. डॉ. सन यत सेन, ज्याने चीनला मध्ययुगातल्या राजेशाहीतून आधुनिक लोकशाहीयुगात आणले, तो वंशाने हान होता. ‘जनरॅलिसिमो (म्हणजे युरोपीय भाषेत सेनापती-जनरल) चँग कै शेक ज्याच्या राजवटीविरुद्ध बंड पुकारून, साम्यवादी माओ-त्से-तुंग (माओ झेडाँग) याने 1949 साली सत्ता हडपली, तोही वंशाने हान होता, आणि स्वतः माओसुद्धा वंशाने हानच होता. आजही सत्ताधारी ‘नॅशनल कम्युनिस्ट पाट’चे बहुसंख्य नेते, मंत्री, खुद्द राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे सगळे हानवंशीयच आहेत. हे सगळे सत्ताधारी हानवंशीय खासदार संसद अधिवेशनात कायम काळ्या किंवा करड्या रंगाच्या पोशाखात, ज्याला ‘बिझनेस सूट’ असे म्हटले जाते, तशा पोशाखात वावरतात. अन्य पंचावन्न वंशांच्या प्रतिनिधींनी मात्र त्यांच्या पारंपरिक वेशांमध्ये वावरावे, अशी अपेक्षा असते.
त्यामुळे चिनी संसद अधिवेशनात बिगर हानवंशीय खासदार लगेच वेगळे ओळखू येतात. यंदाच्या अधिवेशनातही या खासदारांनी आपले पारंपरिक पोशाख आणि चित्रविचित्र शिरस्त्राणे परिधान करून, मोठीच गंमत आणली होती. पूव महिलांनाच नाना तऱ्हेचे रंगीत पोशाख करायला आवडत असे. पण, आता पुरुषांनाही वेगवेगळे रेशमी, झुळझुळीत, लक्षवेधक पोशाख परिधान करणे आवडते. गडद लाल, चमकदार गुलाबी, गडद निळा हे रंग आणि त्यांवर नाना तऱ्हेचे भरतकाम, प्राण्यांच्या चितारलेल्या आकृती यांनी चिनी संसदेच्या ‘द ग्रेट हॉल ऑफ पीपल’ या प्रख्यात सभागृहात मोठीच गंमत उसळून दिली होती. एका महिला खासदाराने एक भलामोठा पारंपरिक मुकुट घातला होता. त्यात अनेक छोट्या घंटा बसवलेल्या होत्या. तिने जरा डोके हलवले की, त्या घटांचा मधुर ध्वनी सर्वत्र पसरत होता.
1949 साली माओच्या साम्यवादी पक्षाने सत्ता हडपली आणि 1950 पासून त्याने, चीनच्या अवाढव्य प्रदेशात सर्वत्र रेटून अंमल बसवायला सुरुवात केली. चीनमध्ये हानवंशीयांनंतर ‘माँचू’ आणि ‘मंगोलियन’ वंशांचे लोक संख्येने जास्त आहेत. माओने सगळ्यांवरच दडपशाहीचा वरवंटा फिरवला. एकदा आपला अंमल पक्का बसल्यावर त्याने, वांशिक अल्पसंख्याकांना बऱ्यापैकी सुविधा दिल्या. म्हणजे कुठेही प्रवास करण्याची मुभा दिली. त्यांच्या मुलांना ‘मांदारिन’ या सरकारच्या अधिकृत भाषेबरोबरच त्यांची पारंपरिक भाषा, संस्कृती शिकवण्याची मुभा दिली. पण, एवढेच स्वातंत्र्य! आपण चीनपेक्षा वेगळे आहोत; चीनने आम्हाला जबरदस्तीने त्यांच्या देशात सामील करून घेतले आहे आणि साम्यवादी तत्त्वज्ञान आम्हाला मान्य नाही, इत्यादी गोष्टी मुलांना शिकवाल, तर खबरदार! तरीही, झिनजियांग प्रांतातले उघूर मुसलमान, तिबेटमध्ये बौद्ध लामा आणि इतर मंगोलिया प्रांतातले मंगोल यांनी गडबड केल्यावर, त्यांना साफ चेपून टाकण्यात आले. त्या प्रांतांमध्ये हानवंशीय चिन्यांच्या नवनवीन वसाहती मुद्दाम उभारण्यात आल्या. त्या प्रांतांमधल्या वांशिक अल्पसंख्याक मुलींची लग्ने हानवंशीय पुरुषांशी लावून, लोकसंख्येचे समीकरण बदलण्याचा पद्धतशीर प्रयत्न करण्यात आला, आजही चालूच आहे. साम्यवाद हा इस्लामप्रमाणेच एक विस्तारवादी धर्म आहे, असे म्हटले गेले आहे. ते कसे खरे आहे पहा. जगभर ज्या युक्तीने मुसलमान आपली लोकसंख्या वाढवत नेत असतात, तीच युक्ती चिनी साम्यवादी वापरत आहेत.
तर, 1950 ते 2000 अशी चांगली 50 वर्षे माओ, डेंग झियाओ पिंग, जियांग झेमिन, हू जियांतो वगैरे चिनी नेत्यांनी वांशिक अल्पसंख्याकांना तसे बरे वागवले. ‘आमच्या देशातले छप्पन वंश म्हणजे छप्पन रंगीबेरंगी फुलेच आहेत’ वगैरे काव्यात्म वर्णने करण्यात आली. पण, 2013 साली शी जिनपिंग राष्ट्राध्यक्ष बनले आणि परिस्थिती झपाट्याने बदलली. भाषा, संस्कृती आणि मिश्रवंशीय विवाह याबाबत आता कोणतीही सवलत दिली जाणार नाही. म्हणजे उघूर, तिबेटी आणि मंगोल या वांशिक अल्पसंख्याकांना, ज्याप्रमाणे मिश्र विवाहांच्या माध्यमातून अधिक अल्पसंख्याक करण्यात आले किंवा त्यांची वेगळी वांशिक ‘ओळख’ पुसून टाकून त्यांना हानवंशीय लोकांमध्ये मिसळून टाकण्यात आले, तेच धोरण आता इतर सर्व वांशिक अल्पसंख्याकांनाही लागू होणार आहे किंवा झालेच आहे. मार्च 2026च्या वार्षिक संसद अधिवेशनात चीनने पारित केलेल्या या विषयीच्या नव्या कायद्याचे नाव आहे- ‘वांशिक एकता आणि प्रगती यांचा पुरस्कर्ता कायदा’. चीनच्या सत्ताधाऱ्यांना वांशिक अल्पसंख्याकांचे नृत्य चालणार आहे, संगीत चालणार आहे, रंगीबेरंगी वस्त्रभूषणे चालणार आहेत. मात्र, याव्यतिरिक्त आपली वेगळी वांशिक ‘ओळख’ म्हणजे चिनी हानवंशीयांपेक्षा वेगळी ओळख दाखवलेली चालणार नाही, अजिबात चालणार नाही.
मार्च 2026 मधले हे वार्षिक अधिवेशन ‘कव्हर’ करण्यासाठी गेलेल्या एका पाश्चिमात्य वार्ताहराने, इतर मंगोलिया प्रांतातल्या एका मंगोलवंशीय महिला खासदार बाईला गाठले. तिच्या झुळझुळीत, रेशमी, सुंदर भरतकाम केलेल्या पारंपरिक पोशाखाची खूप तारीफ वगैरे करून हा वार्ताहर तिला म्हणाला, “नव्या कायद्याच्या बाजूने तुम्ही मतदान केलेत खरे पण, या कायद्याने तुम्हा इतर मंगोलियन वांशिक अल्पसंख्याकांना ठोस असा काय फायदा झाला?” ती खासदार महिला नुसतीच रंगीबेरंगी कपडे ल्यालेली शोभेची बाहुली नसावी. तिने या वार्ताहराच्या प्रश्नातली मेख ओळखून त्याला म्हटले तर हवी ती बातमी दिली, म्हटले तर दिली नाही. म्हणजे काय? ती म्हणाली, “फक्त मंगोल या वांशिक गटासाठी उपयुक्त असे या नव्या धोरणात काही नाही. पण, चीन हे एक एकात्म राष्ट्र आहे, ही भावना निर्माण होण्यासाठी हे धोरण नक्कीच मार्गदर्शक आणि म्हणूनच योग्य आहे.”
आता, चीन सरकार हे अत्यंत निर्घृण, निर्दय असे साम्यवादी शासन आहे आणि त्यांना त्यांच्या देशातले सगळे वांशिक अल्पसंख्याक गट संपवायचे आहेत, म्हणून आपण त्यांच्या या उद्योगाकडे प्रतिकूल नजरेने पहातो. पण, स्वतःला सुधारलेले, लोकशाहीवादी वगैरे म्हणवून घेणाऱ्या पाश्चिमात्यांना म्हणजे युरोपीय देश किंवा अमेरिका यांना, चीनला नावे ठेवण्याचा काहीही अधिकार नाही. कारण, त्यांनी शतकानुशतके तेच उद्योग केलेले आहेत. पोर्तुगीजांनी भारतात गोवा, केरळ या ठिकाणी भीषण अत्याचार करून, बेछूट बाटवाबाटवी करून, हिंदूंना संपवण्याचा प्रयत्न केला. आजही सेवा, शिक्षण, रुग्णसेवा अशा छुप्या नावाखाली त्यांचे तेच उद्योग चालू आहेत. अमेरिका खंडात तर त्यांनी स्थानिक वंशांच्या सरळ कत्तलीच केल्या. खुद्द युरोप खंडातील ख्रिश्चन पाद्य्रांनी, स्थानिक लोकांचे मूळ उपासना संप्रदाय ‘पेगन’, ‘हीदन’ म्हणजे रानटी ठरवून कायमचे संपवले. सगळे एकदाचे ख्रिश्चनधमय झाले तरी त्यांना चैन पडेना. मग त्यांनी अँग्लो-सॅक्सन वंश विरुद्ध नॉर्मन वंश; गॉल वंश विरुद्ध जमैनिक वंश; स्लाव्ह वंश विरुद्ध रोमन वंश अशा लढाया करून, भरपूर कत्तली केल्या. हिटलरने म्हणे चर्चिलला अशी ऑफर दिली होती की, “मला म्हणजे आम्हा जर्मन आर्यनवंशीयांना यहुदी (म्हणजे ज्यू), पूर्व युरोपातले स्लाव्हवंशीय आणि फ्रान्समधले गॉलवंशीय यांचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे. तुम्ही इंग्रज म्हणजे अँग्लो-सॅक्सनवंशीय लोक तसे आम्हा आर्यनवंशीयांना जवळचे आहात. म्हणून ब्रिटनला तुम्ही युद्धातून अलिप्त ठेवा.” म्हणून म्हणे, हिटलरने अगदी पक्की तावडीत सापडलेली सुमारे साडेतीन लाख ब्रिटिश सेना, डंकर्क या ठिकाणाहून सुखरूप माघारी जाऊ दिली. मग चर्चिलने ही ऑफर का नाकारली? तो फ्रान्स आणि रशिया यांच्या लोकशाही राजवटींचा पाठीराखा होता किंवा एकंदरीत लोकशाही मूल्यांचा समर्थक होता म्हणून? छेः छे! तसे काहीच नव्हते. एकतर चर्चिलला हे पक्के माहीत होते की, काही काळ कदाचित हिटलर आपल्याशी मित्रत्वाने वागेल पण, नंतर तो आपला नंबर लावणारच. म्हणजे आज फ्रान्स आणि रशिया जात्यात असले, तरी आपण सुपात आहोतच आणि दुसरे म्हणजे, हिटलरच्या कथित आर्यन वंशापेक्षा, आम्हा ब्रिटिशांचा अँग्लो-सॅक्सन वंशच जास्त श्रेष्ठ आहे. किंबहुना, आमचाच वंश जगात सर्वश्रेष्ठ आहे, हा अहंकार चर्चिलपाशीही होताच.
असो. तर मुद्दा काय की, वांशिक अल्पसंख्याकांच्या कत्तली सगळ्याच कथित पुढारलेल्या पाश्चिमात्यांनी अगदी भरघोस प्रमाणात केलेल्या असल्यामुळे, त्यांनी चिन्यांना नावे ठेवण्याचे कारण नाही.
हां! आता वांशिक अल्पसंख्याक तरी काय कमी आहेत का? अरब वंशाचे लोक मुसलमान बनल्यावर त्यांनी युरोपवर स्वारी करून, ख्रिश्चनांच्या मनसोक्त कत्तली केल्या आणि भरपूर बाटवाबाटवी केली. स्पॅनिश ख्रिश्चन बायका आणि अरब मुसलमान पुरुष यांच्या मिश्र विवाहांतून, ‘मूर’ नावाचा एक युरोपीय मुसलमान वंशच निर्माण झाला. अखेर स्पेनचा राजा फर्डिनंड दुसरा याने सन 1492 साली मूरवंशीय राजा बोआबदिल याचा निर्णायक पराभव केला. त्याने मूरवंशीय लोकांपुढे तीन पर्याय ठेवले- एक म्हणजे युरोप सोडून चालते व्हा, दुसरे म्हणजे ख्रिश्चानिटी स्वीकारा आणि तिसरे म्हणजे आमच्या तलवारींखाली कटून मरा. जवळपास सगळ्या मूरवंशीयांनी दुसरा पर्याय स्वीकारला. बहुसंख्येने असणारे स्पॅनिश ख्रिश्चन आणि अल्पसंख्याक मूर मुसलमान यांच्यातला हा वांशिक-धार्मिक लढा एकंदर 800 वर्षे चालू होता. मुजोर अल्पसंख्याक नरम व्हायला आठ शतके लागली.