अक्षय्य सोने : गुंतवणुकीचा नवीन दृष्टिकोन...

    17-Apr-2026   
Total Views |
Gold Investment New Approach
 
अमेरिका विरुद्ध इराणच्या युद्धसंघर्षात केवळ तेल आणि रुपयाच नाही, तर सोन्याच्या किमतीतही मोठे चढ-उतार पाहायला मिळाले आणि त्यानिमित्ताने सोन्यातील गुंतवणुकीचा पर्याय पुनश्च चर्चेच्या केंद्रस्थानी आला. त्यातच आता रविवार, दि. १९ एप्रिल रोजी साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त. या मुहूर्तावर भारतीयांचा सोनेखरेदीकडेही मोठ्या प्रमाणात कल दिसून येतो. म्हणूनच प्रत्यक्ष सोनेखरेदीइतकेच फायदेशीर ठरणार्‍या सोन्यातील अक्षय्य गुंतवणुकीच्या पर्यायांविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...
 
भारत हा जगातील दुसरा सर्वांत मोठा सोने आयातदार देश. भारतीयांचे सोनेप्रेमही तसे सर्वश्रुत. त्यातच सोने हा पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. भारतीय सांस्कृतीत सोने हे शुभमुहूर्तावर खरेदी करण्याची परंपराही आहे. त्यामुळे भारतीयांकडे लाखो टन सोने साठलेले आहे. अडचणीच्या प्रसंगी सोने विकून रोख रक्कम उभी करता येते. हल्लीच्या आधुनिक युगातही सोन्याचा हा उपयोग कायम आहे. आजकाल बँका, वित्तीय संस्था सोने तारण ठेवून कर्ज देतात. त्यामुळे वेळप्रसंगी सोने नेहमीच उपयोगी पडू शकते. मात्र, बदलत्या काळानुसार या पारंपरिक संपत्तीच्या वापराकडे आता नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
आधी म्हटल्याप्रमाणे, सोने तारण ठेवून कर्ज मिळते. सोने कर्ज घेणार्‍याच्या नावेच सुरक्षित असते. फक्त त्याचा उपयोग करून पैसे उभे करता येऊ शकतात. सोने म्हणजे फक्त दागिना नाही, तर तो एक भक्कम आर्थिक आधारही असतो. एका सर्वेक्षणानुसार, भारतीय महिला एकूण अंदाजे २४ हजार टन सोने धारण करतात. हे जगातील एकूण सोन्याच्या जवळपास ११ टक्के इतके आहे. भारतीय सहसा सोने कपाटात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये साठवतात. त्यामुळे या मौल्यवान संपत्तीचा मोठा भाग तिजोरीत बंद राहून निष्क्रिय स्वरूपात पडून असतो. सोन्याचे भाव वाढले की आपण समाधानी होतो; पण हे फक्त मानसिक समाधान असतं. यातून आर्थिक फायदा काही होत नाही. त्यामुळे सोने फक्त मिरवण्यापुरते नसावे, तर सोनेधारकांना त्याचा आर्थिक फायदाही व्हायला हवा. निष्क्रिय सोने आता सक्रिय करणे शय आहे. विविध वित्तीय योजनांच्या मदतीने हे निष्क्रिय सोने तरल मालमत्तेत (लिक्वीड अ‍ॅसेट) रूपांतरित करता येते. यामुळे गरजेच्या वेळी निधीही मिळवता येतो आणि मालकी हक्कही आपल्याकडेच ठेवता येतो.
 
शिक्षण, व्यवसाय, वैद्यकीय खर्च, घरगुती गरजा, कोणतीही आकस्मिक आर्थिक गरज असो, सोने वापरून त्या गरजा पूर्ण करणे सहज शय होऊ शकते. सोन्याला उत्पन्न देणारे संपत्तीचे साधन बनवणारे आता बरेच पर्याय उपलब्ध आहेत. ते म्हणजे,
(१) गोल्ड मॉनेटायझेशन योजना - घरांमध्ये पडून असलेले सोने वापरात यावे आणि सोन्याची आयात कमी व्हावी, या उद्देशाने सरकारची ही योजना आहे. मात्र, अलीकडच्या काळात सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने आता केवळ अल्प मुदत आणि अल्प ठेव योजना सुरू ठेवण्यात आली आहे. सरकारने दि. २६ मार्च २०२५ पासून मध्यम व दीर्घकालीन ठेवी बंद केल्या आहेत. त्यामुळे आता केवळ अल्पकालीन म्हणजे एक ते तीन वर्षे मुदतीसाठी किमान दहा ग्रॅम सोने ठेवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत दागिने, बिस्किटे, नाणी आदी बँकेत जमा करून त्यावर ठेवीप्रमाणे व्याज मिळू शकते, सोनेधारकाच्याच नावे सुरक्षित राहाते आणि यातून उत्पन्नही मिळते.
 
योजना कधी काम करते?
 
यात शुद्धता तपासणीसाठी सोने वितळविले जाते. त्यामुळे दागिन्यांचे मूळ डिझाईन नष्ट होते. बँकेत ‘गोल्ड डिपॉझिट अकाऊंट’ उघडून शुद्धतेचे प्रमाण निश्चित झाल्यानंतर, सोने डिजिटल स्वरूपात बँकेत नोंदविले जाते. अल्पकालीन ठेवींवरील व्याजदर बँका ठरवितात. त्यासाठी त्या प्रचलित आंतरराष्ट्रीय दर, इतर खर्च आणि बाजारातील परिस्थिती विचारात घेतात. या योजनेअंतर्गत जमा झालेल्या सोने समान ठेवींवर वार्षिक व्याज दिले जाते. या योजनेत सहभागी बँका आणि संस्थांना रिझर्व्ह बँक व सरकारकडून मान्यता असते. जमा केलेले सोने प्रमाणित प्रयोगाशाळांद्वारे तपासले जाते. त्यामुळे व्यवहार पूर्णपणे पारदर्शक व विश्वासार्ह असतात.
  
सोने तारण कर्ज
 
याची ‘मुथुट फायनान्स’ कंपनी भरपूर जाहिरात करते. सोने विकल्यास ते कायमचे तुमच्याकडून निघून जाते. पण, ते न विकता, त्यावर कर्ज घेऊन पैसे उभे करता येतात आणि सोन्याचा मालकी हक्क राखून ठेवणेही शय होते. त्याचवेळी त्याच्या वाढलेल्या भावाचा उपयोग करून आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतात. गेल्या काही वर्षांत सोने तारण कर्जाची मागणी झपाट्याने वाढली आहे. याची प्रमुख कारणे म्हणजे, सुलभ उपलब्धता, किमान कागदपत्र प्रक्रिया, जलद मंजुरी व वितरण.
 
सोने तारण कर्ज कसे मिळते?
 
ग्राहक त्यांच्याजवळील दागिने बँक किंवा बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडे तारण ठेवतात. सोन्याच्या बाजारमूल्यानुसार, सोने तारण ठेवणार्‍या ग्राहकांना साधारण ६५ ते ७५ टक्के अशा ठरावीक टक्केवारीत कर्ज मिळते. बँक किंवा कर्ज देणार्‍या कंपनीनुसार हे बदलू शकते.साधारणपणे १८ ते २४ कॅरेटचे सोने स्वीकारले जाते. रत्ने, मोती इतर वस्तू जडवलेला भाग काढून टाकून शुद्ध सोन्याचेच वजन ग्राह्य धरले जाते. जेव्हा ग्राहक मूळ मुद्दल रक्कम आणि व्याज यांसह कर्जाची पूर्ण परतफेड करतो, तेव्हा त्याचे सोने परत दिले जाते. परतफेड झाली नाही, तर बँकेच्या नियमांनुसार सोने तारण ठेवणार्‍याच्या सोन्याचा लिलाव होऊ शकतो. त्यातून प्राप्त होणार्‍या रकमेतून तुमचे कर्ज फेडले जाते. या कर्जावरील व्याजदर साधारणतः वार्षिक नऊ ते १७ टक्के इतका असतो. प्रक्रिया शुल्क, मूल्यांकन शुल्क, आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी लागणारे शुल्क आकारले जाते. उशीर झालेल्या हप्त्यांसाठी प्रतिमहिना दोन ते तीन टक्के दंड आकारला जातो. पारदर्शकता, अचूक मूल्यांकन आणि सुरक्षित साठवण यांसाठी फक्त रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत कंपनीकडेच कर्जासाठी संपर्क साधावा.
 
सोने लीजने देणे
 
या पर्यायात व्यक्तींना त्यांच्या निष्क्रिय दागिन्यांवर नियमित परतावा मिळवण्याची संधी मिळते; तेही सोने न विकता! पारंपरिक सोन्याच्या कर्जात तुम्हाला दागिन्यांवर कर्ज घेण्यासाठी व्याज द्यावे लागते. परंतु, सोन्याच्या लीजिंगमध्ये तुम्ही तुमचे सोने ज्वेलरला कामकाजासाठी देता आणि त्याबद्दल्यात तुम्हाला उत्पन्न मिळते. यात गुंतवणूकदार वापरात नसलेले दागिने किंवा जुनी सोन्याची नाणी ‘सेफगोल’, ‘गुल्लक’, ‘ऑगमॉन्ट’, ‘एमएमटीसी’, ‘पीएएमपी’ यांसारख्या गोल्ड लीजिंग प्लॅटफॉर्मवरील भागीदार सुवर्णकारांकडे देऊ शकतात. गुंतवणूकदाराच्या संमतीनंतर ते सोने वितळवून त्याची शुद्धता तपासली जाते आणि २४ कॅरेट स्वरूपात रूपांतरित केले जाते. त्यानंतर गुंतवणूकदाराच्या नावाने डिजिटल गोल्ड खाते तयार केले जाते. ज्यात त्या शुद्ध सोन्याचे वजन दाखविले जाते. त्यानंतर गुंतवणूकदार त्या सोन्याला प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत ज्वेलरना लीजवर देऊ शकतात. प्रत्येक ज्वेलर वेगवेगळ्या वार्षिक परताव्याच्या दराने म्हणजे तीन ते सहा टक्के दराने दरवर्षी लीज देतो. जेव्हा लीज कालावधी संपतो, तेव्हा गुंतवणूकदाराने भाड्याने दिलेले मूळ सोने आणि त्यावर मिळालेला परतावा सोनेधारकाच्या खात्यात जमा केला जातो. त्यानंतर गुंतवणूकदार ते सोने विकू शकतात. प्रत्यक्ष स्वरूपात घेऊ शकतात किंवा पुन्हा भाड्याने देऊ शकतात. ज्वेलरना सेफ गोल्ड प्लॅटफॉर्मवर नोंदणी करताना बँक गॅरेंटी द्यावी लागते. यामुळे लीज घेतलेल्या सोन्याच्या किमतीपेक्षा जास्त सुरक्षितता असते. सोन्याचा भाव वाढला, तर अतिरिक्त गॅरेंटीदेखील वाढवली जाते. ‘गोल्ड लीजिंग’ हा प्रकार तुलनेत नवा असल्याने रिझर्व्ह बँक नोंदणीकृत प्लॅटफॉर्म निवडणे आणि काळजीपूर्वक व्यवहार करणे महत्त्वाचे आहे.
 
गोल्ड इटीएफ
 
हा पर्याय म्हणजे, सोने घरी न आणता करता येणारी गुंतवणूक! शेअर बाजारात शेअरप्रमाणे खरेदी-विक्री करता येणारा ‘सोन्यावर आधारित फंड.’ गेल्या एका वर्षात काही फंडांनी ३० टक्क्यांपर्यंत परतावा दिलेला आहे. भौतिक सोन्यावरील खरेदी, साठवण आणि घडणावळ हा त्रासही वाचतो. गुंतवणूक करताना फंडाचा खर्च तपासावा. सोन्याचा खरा भाव आणि ‘ईटीएफ’च्या परताव्यात किती फरक आहे, हे दाखविणारा मापदंड म्हणजे ‘ट्रॅकिंग एरर’ कमी असेल, तर असे फंड सोन्याच्या भावाजवळचा परतावा देताना, म्हणजे फंड अधिक विश्वासार्ह ठरतो. सोन्याचा भाव बदलत राहतो, त्यामुळे दीर्घकालीन विचाराने गुंतवणूक करणे लाभदायी ठरू शकते.
 
गोल्ड ‘ईटीएफ’वरील दीर्घकालीन भांडवली लाभ म्हणजे १२ महिन्यांच्या मुदतीनंतर १२.५ टक्के कराने करपात्र ठरतो, तर भौतिक सोन्यात, साठवणीचा खर्च आणि पुनर्विक्रीवरील कपात यांमुळे निव्वळ नफा कमी होतो. ‘गोल्ड ईटीएफ’ आणि ‘गोल्ड फंड’ हे मोबाईल अ‍ॅप किंवा ट्रेडिंग अकाऊंटद्वारे त्वरित विकता येतात. सोने विकल्यावर एका दिवसानंतर पैसे खात्यात जमा होतात. परंतु, भौतिक सोन्याच्या बाबतीत शुद्धतेची तपासणी किंमत ठरविते आणि पुनर्विक्रीवर साधारण दोन ते पाच टक्के सूट द्यावी लागते.
 
सोन्याचे निधीत रूपांतर
 
गुंतवणूकदाराला रोख रक्कम हवी असेल, तर तो आपले सोने विकून किंवा आपल्या डिजिटल खात्यातील सोने विकून तेवढ्या मूल्याचे पैसे घेऊ शकतो. या प्रक्रियेत गुंतवणूकदाराला तत्काळ पैसे उपलब्ध होतात. आजच्या बदलत्या आर्थिक वातावरणात, घरातील निद्रिस्त सोने कामाला लावणे, ही एक शहाणपणाची आणि सुजाण गुंतवणुकीची पद्धत ठरू शकते.

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.