सह्याद्रीच्या जंगलाचा दाता...

    16-Apr-2026   
Total Views |
 
Ashish Vikram Pilani
 
सह्याद्रीच्या जंगलाने दिलेल्या दानाची जाणीव ठेवून, त्याच्या संवर्धनासाठी काम करून ‘देणाऱ्याचे हात घ्यावे‌’ या ओळीची जाणीव ठेवणाऱ्या आशिष विक्रम पिलानी यांच्याविषयी...
 
आशिष यांचा जन्म 1983 साली इंदोरला त्यांच्या आजोळी झाला. पिलानी कुटुंबीय मूळचे कोल्हापूरचे. आशिष यांचे बालपण आणि शिक्षण कोल्हापुरातच पार पडले. दहावीपर्यंतचे शिक्षण छत्रपती शाहू विद्यालयात, तर महाविद्यालयीन शिक्षण विज्ञान शाखेतून गणित विषय घेऊन पूर्ण झाले. पुढे ‌‘एमआयटी, पुणे‌’ येथून फायनान्स/मार्केटिंग विषयातून ‌‘एमबीए‌’ पूर्ण केले. या सगळ्यात बालपणीच जंगलप्रेमाचे बीज त्यांच्या मनात रोवले गेले होते. यासाठी कारणीभूत ठरली कोल्हापूरच्या आसपास असणारी राधानगरी, आंबा यांसारखी जंगले. लहानपणी वडिलांसोबत, तर महाविद्यालयीन वयात समविचारी मित्रांसोबत जंगल पालथे घालणे सुरू होते. त्यातूनच जंगल, तिथले वन्यजीव यांविषयी ममत्व वाढत गेले. मात्र, या गोष्टीला आवडीचे आणि व्यासंगाचे स्वरूप मिळाले 2010 साली.
 
2010 साली आशिष हे मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात भटकंतीसाठी गेले होते. तिथल्या वातावरणाशी एकरूप होण्याची ऊम निर्माण झाली आणि मग प्रवास सुरू झाला, तो भारतामधील वेगवेगळी जंगले पालथी घालण्याचा. जंगलाच्या या प्रेमाने त्याचे रूप कॅमेऱ्यात टिपण्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे 2015 पासून वन्यजीव छायाचित्रणाला सुरुवात केली. भारतामधील सर्वच जंगले त्यांनी पालथी घातली. 2018 साली कोल्हापूरचे तत्कालीन मुख्य वनसंरक्षक डॉ. बेन क्लेमेंट यांची भेट घडली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या जंगलाच्या आवडीला संवर्धन कार्याचे वळण मिळाले. समविचारी वाटल्याने डॉ. बेन यांनी कोल्हापुराच्या प्रादेशिक जंगलांमध्ये आणि जंगलाला लागून असणाऱ्या गावांमधील वेगवेगळ्या समस्यांची जाणीव आशिष यांना करून दिली. ‌‘कोरोना‌’ ‌‘लॉकडाऊन‌’च्या काळात चंदगढ, तिलारी या भागातील जंगलात गस्त घालून तिथले कर्मचारी आणि गावकऱ्यांना भेटून समस्यांची जाण आशिष यांना झाली. डॉ. बेन यांनी करून दिलेल्या जाणिवेमधून वन्यजीव-संवर्धनाच्या कामात हातभार लावण्याच्या दृष्टीने आशिष यांनी समविचारी मित्रांच्या मदतीने एक संस्था स्थापना करण्याचे निश्चित केले.
 
सह्याद्री पर्वतरांगेतील लुप्त होत असलेल्या वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण, संवर्धन आणि वन कर्मचारी व गावकऱ्यांचे बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने दि. 23 एप्रिल 2021 रोजी ‌‘सह्याद्री वाईल्डलाईफ फाऊंडेशन‌’ या संस्थेची नोंदणी करण्यात आली. डॉ. बेन यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, कोल्हापूर सर्कलच्या प्रादेशिक वनविभागाअंतर्गत येणाऱ्या चंदगढ, तिलारी, दोडामार्ग या भागांत कामाला सुरुवात झाली. हा संपूर्ण परिसर महत्त्वपूर्ण वन्यजीव भ्रमणमार्गाचा मुख्य भाग असल्याने याठिकाणी मानव-वन्यजीव संघर्ष, जंगलांमधील वाढलेला मानवी हस्तक्षेप अशा अनेक समस्या होत्या. त्यामुळे वनसंरक्षण आणि गावकरी व वन कर्मचाऱ्यांचे बळकटीकरण याअनुषंगाने काम करणे आवश्यक होते. या बाबी हेरून फाऊंडेशनच्या माध्यमातून निरनिराळे प्रकल्प हाती घेण्यात आले. याची सुरुवात कठडाहीन असलेल्या विहिरींना जाळ्या बसवून झाली. कारण, या विहिरींमध्ये पडून होणाऱ्या वन्यजीवांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त होते. त्यानंतर वन्यजीवांविषयी गावागावांमध्ये जनजागृतीचे काम करण्यात आले. वन कर्मचाऱ्यांना वन्यजीव बचावासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले. शिवाय, वन कर्मचारी आणि गावकऱ्यांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. वन्यजीव बचावासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचा पुरवठा करण्यात आला. मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांवेळी कृती करण्यास आवश्यक असणारे ‌‘थर्मल ड्रोन‌’, ‌‘ट्रॅक्युलायझेशन बंदूक‌’ असे साहित्यही वन विभागाला पुरविण्यात आले. याशिवाय, जलसंधारण, गावांमध्ये ‌‘चेनलिंक बोमा‌’, ‌‘बायोफेन्सिंग‌’ उभारणी अशी कामेदेखील फाऊंडेशनने केली. संवर्धन राखीव क्षेत्रामधील शाळांच्या डागडुजींची कामे करण्यात आली. ही सर्व कामे ‌‘टाटा ग्रुप‌’च्या मदतीने पूर्ण केली.
 
सध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानातील वन कर्मचारी आणि गावकऱ्यांच्या बळकटीकरणाचे काम सुरू आहे. गव्यांमुळे शेतपिकांचे नुकसान सहन करणाऱ्या उदगिरी आणि उखळू गावातील 50 शेतकऱ्यांना शेताभोवती लावण्यासाठी ‌‘सोलार फेन्सिंग‌’चे वाटप करण्यात आले. याशिवाय, व्याघ्रसंवर्धनासाठी घनदाट जंगलात उभारण्यात आलेल्या 24 संरक्षण कुट्यांच्या बळकटीकरणाचे कामदेखील करण्यात आले. आजवर फाऊंडेशनने प्रकल्पासाठी 25 लाख रुपयांहून अधिकची आर्थिक मदत साहित्यरूपाने केली असून, येत्या काळात कोयना वन्यजीव अभयारण्यातदेखील मदतीचा ओघ सुरू होणार आहे. ‌‘सह्याद्री वाईल्डलाईफ फाऊंडेशन‌’मध्ये आशिष हे अध्यक्ष म्हणून काम करत असून, गोपाल मर्दा, आदित्य जाधव, रौनक पाटील, पृथ्वीराज जाधव, निखिल जोशी, मिलिंद घाटगे हे संचालक म्हणून कार्यरत आहेत. सह्याद्रीच्या जंगलाच्या संवर्धनाचा दाता बनलेल्या आशिष आणि ‌‘सह्याद्री वाईल्डलाईफ फाऊंडेशन‌’ला पुढील वाटचालीकरिता दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’कडून खूप शुभेच्छा!

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.