Tribute to Asha Bhosle : स्वरसम्राज्ञी, पद्मविभूषण आशा भोसले यांना मुंबई महापालिकेत श्रद्धांजली

    14-Apr-2026
Total Views |
asha bhosale tribute
 
मुंबई :(Tribute to Asha Bhosle) स्वरसम्राज्ञी, पद्मविभूषण, ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांचे १२ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्क स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र मुंबई महापालिका मुख्यालयातील सभागृहात महापौर रितू तावडे यांच्यासह सर्वपक्षीय गटनेते, ज्येष्ठ नगरसेवकांनी दुःख व्यक्त करीत आणि जुन्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली. त्यानंतर महापालिकेचे पुढील कोणतेही कामकाज न करता पालिका सभा तहकुब करण्यात आली.
 
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी, भारताच्या सुप्रसिद्ध गायिका, स्वरसम्राज्ञी पद्मविभूषण आशालता गणपत भोसले ह्यांच्या निधनाबाबत दुखवट्याबाबतचा विषय उपस्थित करीत दुःख व्यक्त केले. भारताच्या संगीत विश्वातील एक तेजस्वी तारा, आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर सम्राज्ञी आशाताई भोसले ह्यांचे रविवार १२ एप्रिल रोजी दुःखद निधन झाले. ह्या घटनेचा उल्लेख करताना मला अत्यंत दुःख होत आहे. आपण स्वतः आज आशा भोसले यांच्या घरी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तेथील शोकाकुल वातावरण पाहता आपल्या भावना दाटून आल्याचे सांगत महापौर रितू तावडे यांचे डोळे पाणावले. त्यांनी दिवंगत आशा भोसले यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली.
 
सभागृहनेते गणेश खणकर यांनी, दिवंगत आशा भोसले यांच्या निधनाबाबतचा(Tribute to Asha Bhosle) शोकप्रस्ताव सभागृहात मांडला.
 
अभंगांतील ओतप्रोत भक्ती, प्रेमगीतातील अनुराग, शृंगारगीतातील मादकता, विरगीतातील दुखरी वेदना, उडत्या गाण्यांतील खट्याळपणा-नि-बिनधास्तपणा ह्या समस्त भावना आपल्या आवाजातून, गाण्यातून कोट्यावधी गानरसिकांच्या हृदयापर्यंत थेट पोहोचवण्याची अद्भुत क्षमता असलेल्या ज्येष्ठ व श्रेष्ठ गायिका आशाताई भोसले ह्यांनी रविवारी दुपारी जगाचा निरोप घेतला. चैतंन्याने सळसळत्या अशा ह्या गायिकेचे देहावसान झाल्याचे वृत्त कळताच अवघ्या देशातून सप्तसुरांचे चांदणे लोपल्याची शोकभावना व्यक्त झाली, असा उल्लेख करीत सभागृहनेते गणेश खणकर यांनी शोक व्यक्त केला.
 
हेही वाचा :  आशा भोसले यांच्या जाण्याने संगीत विश्वात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
 
यावेळी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही, दिवंगत आशाताई भोसले यांना श्रद्धांजली(Tribute to Asha Bhosle) अर्पित करताना जुन्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली.
 
तसेच, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेविका विशाखा राऊत आणि श्रद्धा जाधव यांनीही जुन्या आठवणींना उजाळा देत आशा भोसले यांना भावपूर्ण श्रध्दांजली (Tribute to Asha Bhosle) अर्पित केली.
 
शिवसेनेचे (शिंदे ) गटनेते अमेय घोले यांनीही दिवंगत आशा भोसले यांच्या अजरामर कारकिर्दीचा उल्लेख करीत शिवसेना पक्षाकडून व स्वतःकडून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली. त्याचप्रमाणे, काँग्रेस पक्षाचे गटनेते अशरफ आजमी, एमआयएम गटनेते विजय उबाळे यांनीही आशा भोसले यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त करीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. त्यानंतर महापालिका सभेचे पुढील कोणतेही कामकाज न करता पालिका सभा तहकुब करण्यात आली.(Tribute to Asha Bhosle)