‘नाशिकचा‌’ बीड होतोय का?

Total Views |

स्व. गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा, अशी ओळख असलेल्या बीडमध्ये गेल्या काही वर्षांत संपूर्ण राज्यातील जनतेच्या अंगावर शहारे आणणाऱ्या कित्येक घटना घडल्या. बीडमधील या घटना संपूर्ण राज्यासाठी चिंतेचा विषय ठरल्या. खून, मारामाऱ्या, लूटमार, बनावट औषधांचे रॅकेट अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांनी तिथल्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. काही ठिकाणी तर पोलीस ठाण्याजवळच प्राणघातक हल्ले झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत; यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती कमी झाल्याचा संदेश नागरिकांमध्ये जात आहे. तसेच अत्याचार, अपहरण आणि अमानुष मारहाणीच्या घटनांनी नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली. दुसरीकडे शांत, संयमी आणि धार्मिक ओळख असलेले नाशिकही बीडच्या मार्गानेच आता चालले आहे की काय, असा प्रश्न जिल्ह्यातील एकामागून एक घटना घडणाऱ्या घटना पाहिल्या की उद्भवल्याशिवाय राहत नाही. या घटनांनी नाशिकमधील सामाजिक सुरक्षिततेवर भलेमोठे प्रश्न निर्माण झाले आहे.

भोंदू अशोक खरातने केलेल्या कारनाम्यांनी भाविकांच्या श्रद्धेवरच ओरखडे ओढले गेले. त्यानंतर पत्रकार रवींद्र एरंडे यानेही महिलांचे लैंगिक शोषण करत, आर्थिक फसवणूक केली. या गुन्ह्यांची राळ खाली बसत नाही, तोच ‌‘आयटी‌’ क्षेत्राला काळिमा फासणारा ‌‘कॉर्पोरेट जिहाद‌’सारख्या घृणास्पद प्रकाराने धार्मिक नाशिकची मान शरमेने खाली गेली. या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मुस्लीम युवकांकडून सलग चार वर्षे महिलांवर लैंगिक छळ होत असल्याचे पोलीस तपासातून उघड झाले. बदलती सामाजिक परिस्थिती, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी आणि काही प्रमाणात प्रशासनातील त्रुटी, यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याचे चित्र आहे. गुन्हेगारांचे जाळे अधिक संघटित होत असल्याने पोलिसांसमोरही मोठे आव्हान आहे. बीडप्रमाणे नाशिकमध्येही गुन्हेगारी वाढू लागल्याची ही धोक्याची घंटा. यावर नियंत्रणासाठी पोलिसांची कडक कारवाई, प्रशासनाची जबाबदारी आणि नागरिकांची जागरूकता या तिन्ही गोष्टी अत्यावश्यक, अन्यथा नाशिकसारख्या शांत शहराची ओळख बदलण्याची भीती नाकारता येणार नाही.

महिलांच्या धाडसाचे कौतुक

नाशिकमध्ये घडलेल्या अशा काही घटनांमुळे शांत नाशिकच्या नावाला काळिमा फासला गेला असला, तरी भोंदू अशोक खरात, पत्रकार रवींद्र एरंडे आणि बहुराष्ट्रीय ‌‘आयटी‌’ कंपनीत घडलेल्या घटनांमध्ये एक साधर्म्य आहे. या तिन्ही प्रकरणांत महिलांनी पुढे येत गुन्हेगारांविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचे धाडस दाखविले. त्यामुळे पोलीस प्रशासनालाही तपासात वेग घेऊन गुन्हेगारांच्या वेळीच मुसक्या आवळता आल्या. या काही घटनांनी महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असले, तरी त्याचबरोबर एक सकारात्मक बदलही अधोरेखित केला आहे; तो म्हणजे महिलांनी पुढे येत अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा. अशोक खरात, रवींद्र एरंडे आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीतील प्रकरणांमध्ये महिलांनी धैर्य दाखवत तक्रारी नोंदवल्या, ही बाब भविष्यात समाजासाठी आशादायी ठरणार आहे. पूव अशाप्रकारच्या घटनांमध्ये भीती, सामाजिक दबाव आणि आपलीच बदनामी होईल, या भीतीमुळे अनेक महिलांनी ‌‘अळीमिळी गुपचिळी‌’ हे धोरण स्वीकारले. मात्र, आता परिस्थितीत हळूहळू बदल होताना दिसत आहे. नाशिकमधील या प्रकरणांमध्ये पीडित महिलांनी पोलिसांत तक्रार दाखल करून न्याय मिळवण्याचा मार्ग निवडला. यामुळे केवळ संबंधित आरोपींवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली नाही, तर यातून इतर महिलांनाही नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. या घटनांमुळे समाजातील मानसिकतेत होणारा बदलही अधोरेखित करणारा आहे.

महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव होत असून, अन्याय सहन करण्याऐवजी एकप्रकारे त्याविरोधात लढण्याची जिद्द निर्माण होत आहे. विशेषतः कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये महिलांनी पुढे येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे केल्याने लैंगिक शोषणासारख्या गैरप्रकारांना आळा बसू शकेल. परिणामी, केवळ तक्रार दाखल करणे एवढेच पुरेसे नाही, तर या प्रकरणांची निष्पक्ष आणि जलद चौकशी होणे, दोषींना कठोर शिक्षा मिळणे आणि पीडित महिलांना योग्य संरक्षण व मानसिक आधार मिळणेही तितकेच गरजेचे आहे. प्रशासन आणि पोलीस यंत्रणांनी या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहून महिलांचा विश्वास कायम ठेवणे आवश्यक आहे.


विराम विलास गांगुर्डे

दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये नाशिक विभागीय कार्यालयात उपसंपादक या पदावर कार्यरत. द्राक्षपंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे जन्म आणि तेथेच बी. कॉम. ही पदवी, तर वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातून प्राप्त. ग्रामीण जीवन आणि अर्थकारण, राजकीय आणि सामाजिक या विषयावरील वृत्तांकनामध्ये विशेष रस.