चुकीची माहिती आणि मुद्दाम पेरलेली चुकीची बातमी, यात काय फरक आहे? चुकीची माहिती म्हणजे ‘मिसइन्फर्मेशन’ ही बरेचदा उत्साहाच्या भरात खात्री करून न घेता गाफिलपणे, ढिसाळपणे दिलेली माहिती असते. आपण सगळेच समाजमाध्यमांवर आपल्याकडे येणारे संदेश, कसलीही शहानिशा न करता पुढे ढकलत असतो. तो ‘मिसइन्फर्मेशन’चा उत्तम नमुना. यात कोणाचे तरी नुकसान व्हावे, कोणाबद्दल गैरसमज व्हावेत असा वाईट, दुष्ट हेतू नसतो. पण, मुद्दाम पेरलेली चुकीची बातमी ही काहीतरी मतलब साधण्यासाठीच पसरवली जाते. तिला म्हणतात ‘डिसइन्फर्मेशन’.
’डिसइन्फर्मेशन’ला अलीकडे ‘फेक न्यूज’ किंवा ‘फेक नॅरेटिव्ह’ असेही म्हणतात. मार्च 1971 मध्ये भारतात लोकसभा निवडणुका झाल्या. ‘गरिबी हटाव’ अशी घोषणा देऊन आणि नानाप्रकारचे गैरव्यवहार करून काँग्रेस पक्षाने आणि इंदिरा गांधींनी ही निवडणूक जिंकली. त्यावषच्या डिसेंबरमध्ये भारत-पाक युद्ध, ज्याला ‘बांगलादेश युद्ध’ म्हटले जाते, ते झाले आणि भारतीय सैन्याच्या अतुल पराक्रमाने भारत विजयी झाला. नंतरच्या काळात विविध प्रकारच्या खोट्या बातम्या पेरून इंदिरा गांधी आणि त्यांच्या चमच्यांनी असे वातावरण निर्माण केले की, युद्धातील इंदिरा गांधींच्या खंबीर नेतृत्वामुळे भारत जिंकला आणि मग त्याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांनी काँग्रेसला भरभरून मतदान केले. हा गैरसमज आज 50 वर्षांनंतरही टिकून आहे. अनेक धूर्त लोकांनी तर भारतीय जनमानस कसे परिपक्व आहे, याबद्दल वर्णन करताना म्हटले की, दुसऱ्या महायुद्धात ज्या चर्चिलने ब्रिटनला एवढा भव्यदिव्य विजय मिळवून दिला, त्याला ब्रिटिश जनतेने बहुमताचा कौल दिला नाही. उलट, भारतीय जनतेने मात्र लोकशाही मूल्यांबाबत परिपक्वता दाखवत युद्ध जिंकलेल्या इंदिराजींना निवडणुकीतही विजयी केले. हा चक्क खोटारडेपणा होता. पण, इंदिरा गांधींची सत्ता भक्कम रहावी म्हणून तो मुद्दाम करण्यात आला.
मराठी साहित्यात एक अत्यंत लोकप्रिय कथालेखक होते. उत्तरायुष्यात त्यांनी एका प्रख्यात इंग्रजी मासिकातल्या वन्यप्राण्यांबद्दलच्या प्रदीर्घ संशोधन लेखावर डल्ला मारून, तो लेख कादंबरीत रूपांतर करून मराठीत आणला. मूळ लेखातली सुंदर छायाचित्रे त्यांनी स्वतःची पेन्सिल रेखाटने आहेत, असे दाखवले. कादंबरी भरपूर गाजली आणि अर्थातच, भरपूर खपलीसुद्धा. पण, काही काळाने वाङ्मयचौर्य उघडकीला आले. परंतु, संबंधित प्रकाशक अजिबात डगमगला नाही. त्याने वेगवेगळ्या मान्यवर समीक्षकांचे अतिशय उत्कृष्टपणे बचावात्मक भूमिका मांडणारे लेख वेगवेगळ्या तालेवार वृत्तपत्रांत छापून आणले. त्यांनी मांडलेली भूमिका काय; तर एकच कल्पना वेगवेगळ्या देशांतल्या विद्वानांना, कलावंतांना एकाच वेळी सुचू शकते. त्याला तुम्ही ‘वाङ्मयचौर्य’ म्हणू शकत नाही, इत्यादी. सर्वसामान्य वाचक संभ्रमात पडले. बस्. संबंधिकांचे काम झाले.
सर विल्यम जोन्स हा अत्यंत बुद्धिमान इंग्रज ‘ईस्ट इंडिया कंपनी’चा दुय्यम न्यायाधीश म्हणून बंगालमध्ये आला. त्याला असंख्य भाषा येत होत्या. सन 1786 साली त्याने एक ‘डिसइन्फर्मेशन’ सोडून दिली. ती अशी की, ‘प्रोटो इंडो-युरोपियन भाषा समूह’ असा एक समूह सुमारे सहा हजार वर्षांपूव अस्तित्वात होता. त्यातूनच ‘इंडो-इरानियन भाषा समूह’ निर्माण झाला आणि पुढे या ‘इंडो-इरानियन भाषा समूहा’तून ‘संस्कृत’ भाषा निर्माण झाली. हा पूर्णपणे खोटा सिद्धांत आमचेच विद्वान उराशी कवटाळून बसलेत. विल्यम जोन्स कोलकात्याच्या ‘साऊथ पार्क स्ट्रीट’वरच्या कब्रस्थानात पडल्या-पडल्या आम्हाला हसत असेल. अशा असंख्य ‘डिसइन्फर्मेशन्स’, असंख्य ‘फेक नॅरेटिव्ह’ इंग्रजांनी अक्षरशः पावलापावलांवर पेरून ठेवलीत. रणांगणावर भू-सुरुंग पेरतात तसे. जरा पाय पडला की, उडाला धडाका. भारताच्या दुर्गम जंगल प्रदेशात राहणारे लोक हेच खरे भारत देशातले ‘आदिवासी’ आहेत. गावांत आणि शहरांत राहणारे लोक नंतर बाहेरून आलेले आक्रमक आहेत, हा असाच एक मुद्दाम पेरलेला खोटा सिद्धांत. भारतातल्या बहुसंख्य असणाऱ्या बहुजन समाजाची अवनती झाली, याला कारण अल्पसंख्य असणारा ब्राह्मण समाज होय, हाही असाच एक सिद्धांत. इंग्रजांनी हा सिद्धांत भारतात सर्वच प्रातांमध्ये पसरवला. पण, त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला तो तत्कालीन मुंबई आणि मद्रास प्रांतात. म्हणजेच, आजच्या महाराष्ट्र आणि तामिळनाडू या प्रांतांमध्ये.
येत्या दि. 23 एप्रिल 2026 रोजी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. रामस्वामी पेरियार यांच्या टोकाच्या ब्राह्मणविरोधी भूमिकेमुळे 1950 आणि 60च्या दशकात असंख्य ब्राह्मण लोक तामिळनाडू सोडून कायमचे मुंबई किंवा दिल्लीला स्थलांतरित झाले. त्यानंतर ‘द्रविड मुनेत्र कळघम’ (डीएमके) या पक्षाने किंवा त्याच्यातूनच फुटून निघालेल्या ‘एआयडीएमके’ या पक्षांनी आलटून-पालटून तामिळनाडूवर सत्ता गाजवली. 2026च्या निवडणुकीत ‘डीएमके’, ‘एआयडीएमके’ आणि काँग्रेस या पक्षांनी एकाही ब्राह्मण उमेदवाराला तिकीट दिलेले नाही, यात आश्चर्य नाही. पण, भाजपच्या यादीतसुद्धा एकही ब्राह्मण नाही. इंग्रजांनी योजनाबद्ध रीतीने तामिळी बहुजन समाजाच्या मनात एका विशिष्ट समाजाबद्दल पेरलेला द्वेष आजही किती तीव्र आहे पाहा.
पश्चिम महाराष्ट्रातल्या एका लोकप्रिय नेत्याबद्दल असे सांगतात की, ते जर मुंबईत किंवा अन्यत्र प्रवासात नसले आणि गावी स्वतःच्या बंगल्यात असले, तर संध्याकाळी त्यांचा दरबार भरायचा. नाना घटना आणि उचापती त्यांच्या कानावर घातल्या जायच्या. मतदारसंघातले अडलेले-नडलेले लोक त्यांना भेटायला यायचे. ते शक्य तितके प्रश्न खरोखरच माग लावायचे. पण, अशा त्या कामाच्या आणि गावगप्पांच्या रगाड्यात मधेच त्यांना करमणूक करून घ्यायची सुरसुरी यायची. मग काहीही आगापिछा नसताना ते जवळच्या कुणाकडे तरी बघत एक फुसकुली सोडून द्यायचे, “तुम्ही काही म्हणा अण्णा; पण अलीकडे साली भटं लई माजल्यात!” बस्, एवढी बत्ती लागली की, सगळा दरबार ब्राह्मणांच्या खऱ्या-खोट्या कुचाळक्या करण्यात एकदम रंगूनच जायचा. इंग्रजांनी ब्राह्मण-ब्राह्मणेतर द्वेषाचे जे विष बहुजन समाजाच्या मनात पेरले, ते आजही असे उसळून येत असते.
सध्या ज्या इराण-अमेरिका युद्धाच्या आगीत पश्चिम आशिया होरपळतो आहे, त्याच्या मुळाशी मुख्यतः ब्रिटिश आणि त्यांच्यासोबत अमेरिकेच्या हेरखात्याने पेरलेल्या खोट्या बातम्या आहेत. 2026 मध्ये चालू असलेल्या या युद्धाची मूळ कारणे 1953 मध्ये आहेत. 1953 साली इराणचा पंतप्रधान मोहम्मद मोसादेघ याने इराणी तेल उत्पादन क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण केले. आतापर्यंत ब्रिटिश आणि अमेरिकन तेल कंपन्या इराणी तेल स्वस्तात लुटत होत्या. त्यांचे ते धंदे या राष्ट्रीयीकरणामुळे वांध्यात आले. तेव्हा ब्रिटिश आणि अमेरिकन हेरखात्यांनी निर्णय घेतला की, मोसादेघला हटवायचे. मग त्यांनी मोसादेघविरुद्ध अपप्रचाराची जोरदार मोहीमच उघडली. मोसादेघ हा अत्यंत भ्रष्ट आहे. तो इराणची अर्थव्यवस्था रसातळाला नेणार आहे, तो इराणला सोव्हिएत रशियाच्या साम्यवादी साम्राज्यात दाखल करणार आहे. असे नानाप्रकारचे लेख, बातम्या, अहवाल, वार्तापत्रे खुद्द इराणमधल्या आणि जगभरच्या वृत्तपत्रांमध्ये छापून येऊ लागली. ब्रिटन आणि अमेरिकेने इराणमधल्या अनेक राजकारणी, लेखक, पत्रकार यांना मोठमोठ्या रकमा देऊन आपल्याला हवे तसे लेख, बातम्या छापून आणल्या. हे सगळे लोक साधारणतः सगळीकडेच विकाऊ असतात. पण, ब्रिटन-अमेरिकेने अनेक उच्चपदस्थ इराणी सैनिकी अधिकाऱ्यांना वश करून घेऊन आपल्याला हवे ते बोलायला लावले. यामुळे स्वतः इराणीजनताही संभ्रमित झाली. अखेर दि. 13 ऑगस्ट 1953 रोजी राजधानीत प्रचंड दंगल घडूवन आणण्यात आली. मोसादेघ सरकार गडगडले. अमेरिकेचा जवळपास हस्तकच असणारा शाह रेझा पेहलवी याला इराणचा शहा म्हणून घोषित करण्यात आले. या सर्व घटनाक्रमामुळे सर्वसामान्य इराणी माणसाच्या मनात आजही अमेरिकेबद्दल राग आहे.
या आणि अशाच सगळ्या कारणांमुळे ‘सीआयए’ जगभर प्रसिद्धही झाली आणि बदनामही. याचा फायदा खुद्द इंदिरा गांधींनीही उचलला. काँग्रेस सरकारच्या भानगडी वृत्तपत्रांमधून बाहेर पडू लागल्या, संसदेत प्रश्न विचारले जाऊ लागले की, इंदिराजी ठरावीक उत्तर बाहेर काढायच्या, “या सगळ्यामागे ‘सीआयए’चा हात आहे. अमेरिकेला आमचे सरकार अस्थिर करायचे आहे.”
प्रत्यक्षात ‘सीआयए’पेक्षा रशियाच्या ‘केजीबी’ने या ‘डिसइन्फर्मेशन’ तंत्राचा फार प्रभावी वापर खुद्द रशियात, पूर्व युरोपातल्या सोव्हिएत साम्राज्यात आणि आशियातल्या अमेरिकन प्रभावाखालच्या देशांमध्येसुद्धा केला. हे करताना त्यांनी कुणाच्याही जीवाची वगैरे पर्वा केली नाही. रुस्तम अलेक्झांडर या ऑस्ट्रेलियन संशोधकाने नुकतेच यावर पुस्तक लिहिले आहे. त्याचे नाव आहे ‘एड्स इन सोव्हिएत रशिया ः ए स्टोरी ऑफ डिसेप्शन, डिस्पेअर ॲण्ड होप.’ 1980च्या दशकात जगभर सर्वत्र ‘एड्स’ या नव्या प्राणघातक रोगाची लागण आणि चर्चा होऊ लागली. संशोधक जारीने त्यावर प्रतिबंधक उपाय शोध लागले. ‘एड्स’ची भयानकता लक्षात येऊन धाबे दणाणलेल्या जगभरच्या शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे संशोधन गट स्थापन केले. माहितीची देवाणघेवाण सुरू केली. पण, सोव्हिएत रशियन राज्यकर्त्यांनी या सर्व धडपडीकडे अमेरिकेला बदनाम करण्याची एक संधी म्हणूनच पाहिले. सोव्हिएत आणि मित्रदेशांमधल्या वृत्तपत्रांमधून मोठमोठ्या रशियन शास्त्रज्ञांच्या नावाने असे लेख यायला सुरुवात झाली की, ‘एड्स’चे विषाणू अमेरिकन युद्धखाते ‘पेंटेगॉन’च्या जैवरासायनिक प्रयोगशाळेतच निर्माण केले गेलेले असून, तिथूनच ते जगभर फैलावले जात आहेत. तसेच या विषाणूंपासून वेश्या, समलिंगी पुरुष आणि इंजेक्शनद्वारे अमली पदार्थ सेवन करणारे लोक यांनाच धोका आहे. बाकीच्यांनी काळजी करण्याचे कारण नाही.
गंमत म्हणजे, या ‘फेक नॅरेटिव्ह’वर विश्वास ठेवून सोव्हिएत जनतेनेच नव्हे, तर सोव्हिएत नेत्यांनीही ‘एड्स’च्या भयानकतेकडे दुर्लक्ष केले, असे लेखक म्हणतो. तसेच लेखकाच्या मते, आताच्या रशियन नेतृत्वालाही या समस्येचे गांभीर्य लक्षात घ्यावेसे वाटत नाही. त्यामुळे युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून रशियात ‘एड्स’चा प्रसार वाढतो आहे.
आपण नेहमी अशी आवाहने ऐकत अगर पाहत असतो की, समाजविद्यातक तत्त्वे अफवा पसरवून सामाजिक शांतता, ऐक्य, सामंजस्य धोक्यात आणू पाहत आहेत. तेव्हा अफवांवर विश्वास ठेवू नका. पण, कोणती बातमी खरी आहे आणि कोणती ‘डिसइन्फार्मेशन’ किंवा ‘फेक नॅरेटिव्ह’ आहे, हे सर्वसामान्य माणसाने समजायचे कसे? ती विवेकबुद्धी त्याला कोण शिकवणार? इथेच सुसंस्कार, सुयोग्य शिक्षण हे विषय सुरू होता आणि लक्षात येते की, बलशाली समाजनिर्मिती हे सोपे काम नाही.