क्रेडिट कार्डचा वाढता वापर : फायदे आणि खबरदारी

    10-Apr-2026   
Total Views |
Credit Card
 
नोकरदार व्यक्तींपासून ते अगदी विद्यार्थ्यांपर्यंत हल्ली ‘स्टेटस सिम्बॉल’ ठरलेली क्रेडिट काडर्स हमखास दिसून येतात. पण, ही क्रेडिट काडर्स वापरतानाही तितकीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. तेव्हा, नुकत्याच सुरु झालेल्या नवीन आर्थिक वर्षानिमित्ताने, क्रेडिट कार्ड वापराचे लाभ आणि घ्यावयाची खबरदारी याबद्दल मार्गदर्शन करणारा आजचा लेख...
 
आजकाल खिशात रोकड ठेवणार्‍यांची संख्या फारच कमी झाली आहे. कारण, हल्ली बहुतांश नागरिक ‘यूपीआय’च्या माध्यमातून खर्च भागवितात किंवा क्रेडिट कार्डने ‘पेमेंट’ करतात. क्रेडिट कार्डवर मिळणार्‍या विविध सेवा, आकर्षक सवलती, खर्च करण्याची वाढती क्षमता, वापरातील सुलभता अशा विविध कारणांमुळे क्रेडिट कार्ड वापर भारतातही दिवसेंदिवस वाढत आहे. बँकांसाठीही हा एक चांगला व्यवसाय विभाग ठरत आहे.
 
आपल्याकडे क्रेडिट कार्डावरील वाढणारी थकबाकी हा चिंतेचा विषय असला, तरीही यातील वाढीची संधी लक्षात घेऊन बँका नियम-पालनावर भर देऊन के्रडिट कार्ड वापर वाढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गेल्या दशकात क्रेडिट कार्ड उद्योग केवळ वाढला नाही, तर तो रचनात्मकदृष्ट्यासुद्धा बदलत आहे. दहा वर्षांपूर्वी क्रेडिट कार्ड वापरणारे केवळ शहरी भागात वास्तव्य करणारे असत. आज देशभरात क्रेडिट कार्ड हा एक आर्थिक सवयीचा भाग झाला आहे. निमशहरी किंवा ग्रामीण भागातदेखील क्रेडिट कार्ड वापरले जाते. तिथे व्यापारीदेखील क्रेडिट कार्ड स्वीकारत आहेत. जीवनावश्यक गोष्टी, बिल पेमेंट, प्रवास, शैक्षणिक खर्च आणि दैनंदिन खर्च करण्याच्या पद्धतीत बदल झाले आहेत. परिणामी, क्रेडिट कार्डचा वापर व्यापक झाला आहे.
 
‘फिनटेक’मुळे व्यवसायांची वाढ वेगाने होत आहे. विक्रीपूर्व प्रक्रिया ‘डिजिटल’ झाल्याने व्यवसायात वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. पूर्वीपेक्षा ‘डिजिटल ऑनबोर्डिंग’ मुळे कमी वेळ लागतो, हे ‘फिनटेक’चे सामर्थ्य. ‘फिनटेक’मुळे क्रेडिट कार्ड सेवा देणार्‍यांना व्यवसायाचे आधुनिकीकरण करण्यास मदत झाली आहे. त्यांनी ग्राहकांना समोर ठेवून अनेक सुधारणा केल्या असून, नवी मानके आणली आहेत. ‘फिनटेक’ भागीदार, क्रेडिट कार्ड सेवा देणार्‍यांना व्यवसायातील जोखीम व्यवस्थापित करण्यास मदत करतात. विशेषतः त्वरित क्रेडिट मूल्यांकन, हा या व्यवसायाचा महत्त्वाचा घटक आहे.‘फिनटेक’च्या मदतीमुळे चांगले अंदाज आणि लवकर धोयाचे संकेत, क्रेडिट वापरकर्त्यांवर देखरेख करण्यास मदत होते. ‘फिनटेक’ने क्रेडिट कार्ड व्यवसायात अनेक मोठे बदल आणले आहेत.
 
ज्यांनी आजपर्यंत क्रेडिट कार्ड वापरले नाही, अशा संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचणे, यासाठी क्रेडिट कार्ड कंपन्या प्रयत्नशील आहेत. सार्वजनिक उद्योगातील मोठ्या शाखा-विस्तारामुळे जे ग्राहक आधीपासून तंत्रस्नेही आहेत; जे अ‍ॅप, ऑफलाईन स्टोअर, ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म आणि ‘ई-कॉमर्स’ यांसारख्या मंचांवर व्यवहार करतात, अशांना क्रेडिट कार्डांचे वितरण करण्यासाठी बँका प्रयत्नशील असतात. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात, ‘एआय’च्या मदतीने क्रेडिट अंडररायटिंग, डेटा सिग्नलसह कार्ड वितरण करणार्‍या कंपन्या तरुणांना, महानगराबाहेरील पगारदार व्यक्तींना आणि स्वयंरोजगार व्यावसायिकांना सेवा देतात. आकर्षक आणि परवडणारे ‘ईएमआय’ पर्याय, गरजेनुसार संबंधित खर्चावर जास्त रिवॉर्ड (जसे- तेल वितरण कंपन्यांचे को-ब्रॅण्डेड कार्ड, पेट्रोल पंपांवर पेट्रोल वा इंधन भरण्यासाठी हे कार्ड वापरल्यास सर्वांत जास्त रिवॉड्र्स मिळतात) यासारख्या वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांना
आत्मविश्वासाने क्रेडिट कार्ड वापरण्यास प्रोत्साहन मिळते. ही साधने खर्चासाठी लवचीकता हवी असलेल्या मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी उपयुक्त आहेत.
 
क्रेडिट कार्ड ही ग्राहकांच्या गरजेनुसार क्रेडिट कार्ड कंपन्या तयार करतात. क्रेडिट कार्डचा वापर वाढविण्यासाठी क्रेडिट कार्ड कंपनी एकाच कार्डात सुविधा देण्याऐवजी वास्तविक गरजा पूर्ण करणारी कार्ड तयार करून ग्राहकांना विकतात. काही कार्ड ही आजच्या महिलांची विकसित होत असलेली आधुनिक जीवनशैली, खर्चाच्या पद्धती आणि आर्थिक प्राधान्यांशी जुळण्यानुसार तयार केलेली आहेत. ही कार्ड म्हणजे वेगवेगळ्या जीवनाचे टप्पे, गरजा आणि इच्छा-आकांक्षा प्रतिबिंबित करतात.
 
भारताचा क्रेडिट कार्ड व्यवसाय अशा टप्प्यात प्रवेश करत आहे, जिथे सर्वाधिक संधी आहे. एक प्रमुख संधी म्हणजे ‘यूपीआय’ स्वीकृती. सध्या ‘यूपीआय’द्वारे २.५ कोटींहून अधिक व्यवहार होत आहेत. हे व्यवहार वाढतील, तसतसे क्रेडिट कार्ड व्यवहारसुद्धा वाढतील. वाढत्या प्रमाणात ‘यूआर कोड’, दैनंदिन व्यवहार, गरजेच्या वेळी वितरित केलेल्या ‘ई-कॉमर्स’ आदींसाठी क्रेडिट कार्डचा वापर केला जाईल. डेटा वापरातून आणखी एक संधी येते. ‘एआय’मुळे जोखमीचे अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येते, क्रेडिट मर्यादा वैयक्तिक करता येते. तसेच हव्या त्या व्यवहारांवर ‘रिवॉर्ड पॉईंट’ मिळतात. क्रेडिट कार्डचा वापर ग्राहक आता फक्त उच्च-मूल्य असलेल्या व्यवहारांपुरताच करीत नाहीत, तर शैक्षणिक खर्च, विविध नियतकालिक वर्गणी, मोबाईल बिल किंवा रिचार्ज, इंटरनेट सेवा, रोजची खरेदी आणि दैनंदिन आवश्यक वस्तूंसाठी क्रेडिट कार्ड वापरत आहेत. दैनंदिन क्रेडिट कार्ड वापराचा दीर्घकालीन अनुभव त्यांना अधिकाधिक व्यवहारांसाठी, क्रेडिट कार्ड वापरासाठी प्रोत्साहन मिळते. आपल्या देशातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये ‘इंटरऑपरेबिलिटी’, अधिक सुरक्षा आणि ‘डेटा शेअरिंग’ आदींची संधी आहे.
 
क्रेडिट कार्ड वापरून ‘एटीएम’मधून पैसे काढून नये. क्रेडिट कार्ड वापरून जर पैसे काढले, तर तो कर्ज व्यवहार मानला जातो आणि त्यावर प्रचंड दराने व्याज आकारले जाते. परदेशात क्रेडिट कार्ड वापरतानाही फारच दक्षता बाळगावी. कारण, माझ्याच बाबतीत मी भारतातून लंडनला जाताना दाढी करण्याचे ब्लेड घेऊन जाण्यास विसरलो. त्यामुळे मी लंडनमधल्या एका ठिकाणी क्रेडिट कार्ड वापरून ब्लेडचे पाकीट विकत घेतले. मुंबईत परत आल्यावर या दाढीच्या ब्लेडच्या पाकिटासाठी मला ७०० रूपये भरावे लागले होते. त्यामुळे परदेशात क्रेडिट कार्ड वापरून काहीही खरेदी करताना दक्षता बाळगावी. क्रेडिट कार्ड खिशात आहे म्हणून अनावश्यक खरेदी करू नये. बरेच लोक अशी खरेदी करतात आणि मग आर्थिक संकटात सापडतात. आता जर क्रेडिट कार्ड वापरून परदेशात खरेदी कराल, तर भारतात आल्यावर तुमचे डोळे पांढरे होतील. क्रेडिट कार्डचे बिल आल्यावर त्यावर बिल भरण्याची तारीख दिलेली असते. त्या तारखेपूर्वी संपूर्ण बिल भरावे. असे केल्यास क्रेडिट कार्डधारक क्रेडिट कार्डचा योग्य वापर करीत आहे, असे होते. जर बिल भरायच्या तारखेपूर्वी बिल भरले नाही, तर तो व्यवहार कर्जाचा व्यवहार समजला जाऊन कार्डधारकाला त्यावर व्याज द्यावे लागेल.
 
कार्डधारकांसाठी आणखी एक सुविधा असते. बिलाच्या रकमेच्या काही टक्के रक्कम बिल करण्याच्या तारखेपूर्वी भरायची सोय असते व राहिलेली रक्कम व्याजासहीत पुढच्या महिन्याच्या बिलात समाविष्ट होते. त्यामुळे शयतो बिलाची पूर्ण रक्कम भरावी. जोपर्यंत कार्डधारक शिस्तीत व्यवहार करतो, तोपर्यंत क्रेडिट कार्डचा वापर अतिशय चांगला; पण क्रेडिट कार्डबाबत आर्थिक बेशिस्त बाळगल्यास मात्र खिशाला चांगलीच फोडणी पडते, हे लक्षात ठेवावे. काहीकाही लोक ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून बर्‍याच बँकांची कार्ड ठेवतात. हेदेखील तितकेसे बरोबर नाही. जास्तीत-जास्त दोन क्रेडिट कार्ड वापरावीत. काही कार्डधारक एका कार्डाचे बिल भरायला दुसरे कार्ड वापरतात; पण हे करताना दोन्ही कार्डांच्या बिल भरण्याच्या तारखांकडे दुर्लक्ष करू नये. कार्डधारकाच्या आर्थिक स्थितीचा विचार करून कार्ड दिले जाते. जर ‘क्रेडिट’चा खरंच फायदा उठवायचा असेल, तर कार्डांबाबतचे पेमेंटचे नियम पाहायला आणि पाळायला हवे. शयतो, कार्डधारकाला कार्ड वापरल्यापासून किंवा खरेदी केल्यापासून २१ दिवसांचे ‘क्रेडिट’ मिळते, त्याचा फायदा घ्यावा.
 
क्रेडिट कार्ड बर्‍याच प्रकारची आहेत; पण त्यातले ‘रूपे’ कार्ड हे पूर्णतः भारतीय बनावटीचे आहे. भारत सरकारही ‘रूपे’ कार्ड प्रमोट करीत आहे. इतर जी कार्ड आहेत, त्यांच्या मूळ कंपन्या परदेशात आहेत; पण आपण भारतीय असल्यामुळे आपण ‘रूपे’ कार्ड वापरण्यासाठीच आग्रही हवे. ‘रूपे’चे जसे क्रेडिट कार्ड आहे, तसेच डेबिट कार्डही आहे. बहुतेक बँका बचत खातेधारकांना हल्ली ‘रूपे’चेच डेबिट कार्ड देतात. ज्यांची बचत खात्यात चांगली शिल्लक असते, अशांना बँका ‘रूपे’चे ‘प्लॅटिनम’ डेबिट कार्ड देतात. यावरही वापरणार्‍यांना बर्‍याच सुविधा मिळतात. सार्वजनिक उद्योगातील ‘युनियन बँक ऑफ इंडिया’चे एक ‘एमबीएचएनआय’ या नावाचे एक बचत खाते आहे. हे खाते उघडणार्‍यांना किमान एक लाख रुपये खात्यात शिल्लक ठेवावे लागतात. पण, या खातेधारकांना बँक ‘रूपे’चे ‘प्लॅटिनम’ कार्ड देते. या कार्डवर कार्डधारकाला तीन महिन्यांतून एकदा ‘हेल्थ चेकअप’ मोफत करून मिळते. ‘झी ५’चे सबस्क्रिप्शन मोफत मिळते व अन्यही फायदे मिळतात. त्यामुळे प्रत्येक डेबिट किंवा क्रेडिट कार्डधारकांनी त्यांच्या कार्डवर त्यांना काय-काय फायदे मिळणार आहेत, याची माहिती करून द्यावी.
 
जर कार्डधारकाचा अपघाती मृत्यू झाला किंवा विमान कोसळण्यामुळे मृत्यू झाला, तर प्रत्येक कार्डवर वारसाला विशिष्ट रक्कम देण्याची तरतूद आहे. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड हे आर्थिक व्यवहारांचे उत्कृष्ट साधन आहे. पण, त्याचा सदुपयोग कसा करायचा, हे कार्डधारकाच्या हातात आहे. क्रेडिट कार्डमुळे कर्जबाजारी झालेल्यांची उदाहरणेही समाजात फार मोठ्या प्रमाणावर आहेत, हे कदापि विसरु नये.
 

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.