मुंबई : (JNU) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) जेएनयू युनिटने नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या राष्ट्रीय संकल्पानिमित्त पुतळा दहन आणि प्रतीकात्मक शवयात्रेचे आयोजन केले. हा कार्यक्रम साबरमती लॉनपासून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत काढण्यात आला, ज्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि संशोधक सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात नक्षलवादाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या पुतळ्याच्या माध्यमातून हिंसा, अविकास आणि समाजविरोधी प्रवृत्तींचा अंत व्हावा, असा संदेश देण्यात आला. त्यानंतर काढण्यात आलेल्या शवयात्रेत विद्यार्थ्यांनी एकत्र येत नक्षलवादाविरोधात आपली एकजूट दाखवली. कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी नमूद केले की, नक्षलवादामुळे विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागांतील शिक्षण, आरोग्य आणि विकासावर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्याचे उच्चाटन हा केवळ सुरक्षेचा मुद्दा नसून सामाजिक न्याय आणि स्थैर्याशीही संबंधित आहे.
या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले की, नक्षलवादासारख्या हिंसक विचारसरणीला देशात तसेच विद्यापीठ परिसरात स्थान नाही. त्यांनी हा दिवस दिवाळी आणि दसऱ्याप्रमाणे प्रतीकात्मक पद्धतीने साजरा करत हिंसा आणि भीतीच्या अंताचे प्रतीक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी नमूद केले की, नक्षलवादामुळे देशातील आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि विकासावर विपरीत परिणाम झाला आहे. दीर्घकाळ या भागांमध्ये असुरक्षितता आणि अविकासाचे वातावरण राहिल्याने स्थानिक समाजाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
अभाविप जेएनयू अध्यक्ष मयंक पंचाल यांनी सांगितले की, हा दिवस नक्षलवादाच्या अंताच्या राष्ट्रीय संकल्पाचे प्रतीक आहे आणि विद्यार्थी हिंसक विचारसरणीविरोधात ठाम आहेत. तर मंत्री प्रवीण कुमार पियूष यांनी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असल्याचे सांगितले.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक