मुंबई : (Hyderabad Police Expose) आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर एलपीजीची सातत्याने टंचाई निर्माण झालेल्या परिस्थितीत हैदराबाद पोलिसांनी सोमवारी एका कब्रस्तानात लपवून ठेवलेले ४१४ सिलिंडर जप्त केले. या कारवाईदरम्यान १० जणांना अटक करण्यात आली असून अवैध एलपीजी सिलिंडर साठेबाजी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. हैदराबाद कमिशनर टास्क फोर्सने बंजारा हिल्स पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बंजारा हिल्स परिसरातील एका कब्रस्तानात ४१४ एलपीजी सिलिंडर बेकायदेशीररीत्या साठवून ठेवत होते. त्यांच्या ताब्यातून ११ वाहने आणि एकूण २१.८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. आरोपींनी बंजारा हिल्समधील नागार्जुन एक्स रोडजवळील कब्रस्तानात एचपी गॅस सिलिंडर बेकायदेशीररीत्या साठवून ठेवले होते आणि गरजू ग्राहकांना ते जास्त दराने विकत होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक गॅस पुरवठादार, तीन डिलिव्हरी बॉय, दोन चालक आणि काही मजुरांचा समावेश आहे.
जप्त करण्यात आलेल्या सिलिंडरमध्ये ४७ किलोचे ३० भरलेले सिलिंडर, १९ किलोचे १४८ भरलेले आणि १९२ रिकामे सिलिंडर, तसेच ५ किलोचे ३५ भरलेले आणि ९ रिकामे सिलिंडर यांचा समावेश आहे. जप्त वाहनांमध्ये दोन डीसीएम, दोन बोलेरो, एक टाटा एसी, एक टाटा वाहन, चार पियाजियो ऑटो आणि एक टाटा मॅजिक यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद आमिर ‘मेट्रो गॅस एजन्सी’ या नावाने परवाना असलेली एचपी गॅस एजन्सी चालवत होता. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहम्मद युसुफ, मोहम्मद इस्माईल, मोहम्मद सकरुद्दीन, मोहम्मद मुंतज अन्सारी, मोहम्मद मिनाज अन्सारी यांच्यासह अन्य पाच जणांचा समावेश आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक