Love Jihad: राहुल गांधींसाठी ‘लव्ह जिहाद’ हा प्रपोगंड्याचा विषय!
08-Mar-2026
Total Views |
मुंबई : (Love Jihad) राहुल गांधी यांनी ‘लव्ह जिहाद’वर आधारित चित्रपटाला ‘प्रपोगंडा’ म्हटले असून, ‘केरळ स्टोरी -2’ या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. केरळमधील एका महाविद्यालयातील चर्चेदरम्यान एका विद्यार्थ्याने विचारलेल्या ‘केरळ स्टोरी-2’ चित्रपटाविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी त्या चित्रपटाला ‘प्रपोगंडा’ असल्याचे म्हटले. (Love Jihad)
देशामध्ये ‘लव्ह जिहाद’चे विष पसरत असून, त्यावर भाष्य करणारा ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट कमालीचा यशस्वी ठरला होता. त्याच मालिकेतील पुढील चित्रपट ‘द केरळ स्टोरी-2’ सध्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. याच चित्रपटावरून राहुल गांधी यांना केरळच्या महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला असता, या चित्रपटाकडे लोकांनी पाठ फिरवली असून, चित्रपटगृहे रिकामी असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, असे चित्रपट लोक पाहात नाहीत, हे चांगले असल्याचे विधानदेखील त्यांनी केले. तसेच, ‘केरळ स्टोरी’सारख्या चित्रपटांना ‘प्रपोगंडा पसरवणारे चित्रपट’ असे संबोधताना, चित्रपटांसारख्या क्षेत्राचा वापरही अशा कामांसाठी होत असल्याची टीकदेखील राहुल गांधी यांनी यावेळी केली. (Love Jihad)
दरम्यान, देशामध्ये वाढणार्या ‘लव्ह जिहाद’चा फटका केरळ राज्यालाही बसला असून, केरळमधूनही अनेक मुली ‘लव्ह जिहाद’च्या बळी ठरल्या आहेत. यामध्ये हिंदूंबरोबरच ख्रिश्चन मुलींचाही समावेश आहे. त्यामुळेच ‘केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा पहिला भाग व्यापक जनजागृतीसाठी चर्चेसमधूनही दाखवण्यात आला होता. त्यामुळे एकेकाळी केरळमधून खासदार असलेले राहुल गांधी हे केरळमधील मुलींच्या हिताबाबत असंवेदनशील असल्याची टीका त्यांच्यावर केली जात आहे. (Love Jihad)
‘केरळ स्टोरी-2’ हा चित्रपट सध्या देशभर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. ‘लव्ह जिहाद’च्या वास्तवावर भाष्य करणार्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी साधारण 30 कोटींपर्यंत खर्च आला होता. दरम्यान, गेल्या आठ दिवसांतच या चित्रपटाने 25 कोटींचा गल्ला जमवला असून, प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढत असल्याचे चित्र चित्रपटगृहात आहे. (Love Jihad)