PM Narendra Modi : “हा फक्त राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान…” पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

    08-Mar-2026   
Total Views |
PM Narendra Modi
 
नवी दिल्ली: (PM Narendra Modi) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या बंगाल दौऱ्यादरम्यान प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही घटना केवळ राष्ट्रपतींचा अपमान नसून देशाच्या संविधानाचा आणि लोकशाही परंपरेचा अवमान आहे. पश्चिम बंगालमध्ये टीएमसी सरकारने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा घोर अपमान केला आहे.
 
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विकासकामांचे लोकार्पण
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रविवारी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी सुमारे 33,500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. या सोहळ्यात आयोजित जनसभेत त्यांनी पश्चिम बंगाल सरकारवर निशाणा साधला.पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज देश महिला शक्तीचा सन्मान करत असताना, टीएमसी सरकारने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा घोर अपमान केला आहे. त्या संथाल समाजाच्या मोठ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी बंगालला गेल्या होत्या. मात्र, त्यांच्या स्वागताऐवजी टीएमसीने या महत्त्वपूर्ण आयोजनावर बहिष्कार टाकून आपली संकुचित वृत्ती दाखवून दिली आहे.”
 
आदिवासी अस्मितेचा आणि राष्ट्रपतींचा अवमान
राष्ट्रपती मुर्मू स्वतः आदिवासी समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. पंतप्रधान मोदींनी नमूद केले की, राज्य सरकारने कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केले, जे संविधानाच्या भावनेच्या विरोधात आहे. “टीएमसीने हा कार्यक्रम केवळ कुप्रबंधनावर सोडला. हे वर्तन लोकशाहीच्या महान परंपरेला काळिमा फासणारे आहे,” असेही त्यांनी म्हटले.
 
अहंकाराचा नाश निश्चित; पंतप्रधानांचा इशारा
टीएमसीच्या सत्तेच्या अहंकारावरून मोदींनी इशारा दिला. “शक्ती कितीही मोठी असली तरी अहंकार शेवटी विनाशाला कारणीभूत ठरतो. एका आदिवासी महिला राष्ट्रपतींच्या गरिमेचा अपमान करणाऱ्या टीएमसीच्या गलिच्छ राजकारणाचा आणि अहंकाराचा फुगा लवकरच फुटेल,” असे त्यांनी म्हटले. बंगालची जनता, आदिवासी समाज आणि देशातील महिला टीएमसीला हा अपमान कधीही माफ करणार नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
 
नेमका वाद काय?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ९व्या आंतरराष्ट्रीय संथाल संमेलनासाठी दार्जिलिंग जिल्ह्यात गेल्या होत्या. मूळ कार्यक्रम फाशीदेवा ब्लॉक येथील बिधाननगरमध्ये होणार होता, जिथे मोठ्या प्रमाणावर आदिवासी उपस्थित राहू शकले असते. मात्र राज्य प्रशासनाने सुरक्षा आणि गर्दीचे कारण सांगून हा कार्यक्रम बागडोगरा विमानतळाजवळील गोसाईपूर येथे हलवला. राष्ट्रपतींनी या बदलावर नाराजी व्यक्त केली. नवीन ठिकाण लहान असल्यामुळे अनेक आदिवासी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होता आले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी ना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ना त्यांचा कोणताही मंत्री उपस्थित होता. राष्ट्रपतींनी “प्रोटोकॉल पाळणे हे पदाच्या गरिमेसाठी आवश्यक आहे, तुम्ही माझ्यावर नाराज आहात का?” असा प्रश्न विचारला.
ममता बॅनर्जींचे स्पष्टीकरण
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या आरोपांवर फेटाळून लावले की, संबंधित कार्यक्रमाबाबत राज्य सरकारला कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नव्हती. मात्र केंद्र आणि राज्य यांच्यातील हा प्रोटोकॉल वाद राष्ट्रीय स्तरावर तापला असून, आगामी काळात त्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.