भांडुप उड्डाणपुलाची आयआयटीकडून तांत्रिक तपासणी होणार...
वाहतूक अनुकरण अभ्यास करण्याचेही निर्देश; ३१ जानेवारी २०२७ पर्यंत पूल पूर्ण करण्याचे उद्दीष्ट
07-Mar-2026
Total Views |
मुंबई : (Bhandup Flyover) भांडुप रेल्वे स्थानक परिसरात बांधण्यात येत असलेल्या भांडुप पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील तीव्र वळणाबाबत भारतीय तंत्रज्ञान संस्था ( आयआयटी) कडून तांत्रिक पडताळणी करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. तसेच वाहतूक प्रवाहाचे विश्लेषण करण्यासाठी ‘ट्रॅफिक सिम्युलेशन स्टडी’ करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भांडुप रेल्वेवरील नवीन रोड ओव्हर ब्रिज हा भांडुप पूर्व आणि पश्चिम भागांना थेट जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. वीर सावरकर मार्गावर पूल उतरताना पूर्व-पश्चिम संरेखनाशी जोडणी करताना तीव्र वळण असल्याने या आराखड्याची आयआयटी -पवई येथील तज्ज्ञांकडून तांत्रिक पडताळणी करून घ्यावी, असे निर्देश बांगर यांनी दिले. तसेच पादचारी रेल्वे प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांसाठी पुलावर सुगम पदपथ तयार करण्यासही त्यांनी सांगितले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी (६ मार्च) प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते आणि सल्लागार उपस्थित होते.
महानगरपालिकेने भांडुप रेल्वे स्थानक परिसरात हा उड्डाणपूल बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. सध्या भांडुपमध्ये पूर्व-पश्चिम थेट मार्ग नसल्याने नागरिकांना सुमारे पाच किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. नवीन पुलामुळे प्रवासाचा वेळ जवळपास निम्मा होण्याची अपेक्षा असून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड आणि इतर मार्गांवरील वाहतुकीवरील ताणही कमी होणार आहे. या उड्डाणपुलाची एकूण लांबी सुमारे ५३० मीटर असून रेल्वेवरील भाग ८९ मीटर आहे. पुलात एकूण १४ स्पॅन असून पूर्वेकडे ७, पश्चिमेकडे ५ आणि रेल्वेवर २ स्पॅन आहेत. महानगरपालिका हद्दीत रस्त्याची रुंदी ११.५० मीटर तर रेल्वे भागात १५.६० मीटर आहे.
१० ऑक्टोबर २०२३ रोजी या प्रकल्पासाठी कार्यादेश देण्यात आला होता आणि प्रत्यक्ष कामाला २०२४ मध्ये सुरुवात झाली. सध्या प्रकल्पाची सुमारे ३० टक्के भौतिक प्रगती झाली आहे. पश्चिमेकडील बाजूस पाइलिंग व पाइल कॅपची कामे पूर्ण झाली असून स्पॅन १ ते ४ दरम्यान गर्डर उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. पूर्वेकडील बाजूस खांब क्रमांक ६ व ७ साठी पाइलिंगचे कामही पूर्ण झाले आहे. रेल्वे भागासाठी लागणाऱ्या पोलादी तुळ्यांचे फॅब्रिकेशन अंबाला येथील कारखान्यात सुरू आहे.
अडथळा ठरणाऱ्या जलवाहिन्या हटवणार!
पुलासाठी आवश्यक असलेली २७.४५ मीटर रस्तारेषेतील ‘सॉल्ट पॅन’ जमीन विकास नियोजन विभागामार्फत संपादित केली जाणार आहे. तसेच पूर्वेकडील बाजूस ६०० व ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिन्या अडथळा ठरत असून त्या हलविण्याचे काम सुरू असल्याचे बांगर यांनी सांगितले.
उड्डाणपुलाचे काम विहित कालमर्यादेत पूर्ण करून ३१ जानेवारी २०२७ पर्यंत तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.