मुंबई : (HPV Vaccination) जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आज (८ मार्च) महिला सक्षमीकरण आणि आरोग्य संरक्षणासाठी राज्यभरात विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असून राज्यव्यापी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होत आहे. तसेच यावेळी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मानही करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकाराने हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृहात रविवारी दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राष्ट्रीय ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेचा राज्यव्यापी शुभारंभ होणार आहे. १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतू, १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना ‘गार्डसिल-४’ या लसीचा एक मोफत डोस देण्यात येणार आहे. राज्यातील एकूण ९ लाख ८४ हजार ४१४ मुलींना या मोहिमेचा लाभ मिळणार असून लसीकरण पूर्णपणे मोफत आणि पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात होणार आहे. ही मोहीम सलग तीन महिने विशेष अभियान म्हणून राबविण्यात येणार असून त्यानंतर ती नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग होईल. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरण केले जाईल.
जागतिक महिला दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला डॉक्टर्स, स्त्रीरोग तज्ज्ञ, स्त्री शल्यचिकित्सक, परिचारिका, आरोग्य सेविका, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....