मुंबई (अक्षय मांडवकर) - कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यामधून नर वाघाची नोंद करण्यात आली आहे (sahyadri tiger). या वाघाचा सांकेतिक क्रमांक हा एसटीआर टी-०७ असा करण्यात आला असून त्याला रायबा या नावाने संबोधले जाईल (sahyadri tiger). यानिमित्ताने सह्याद्रीतील वाघांच्या संख्येत वाढ झाली असून सिंधुदुर्गातील वाघ सोडल्यास राधानगरी आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एकूण आठ वाघांचा सध्या संचार आहे. (sahyadri tiger)
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य हे ३५१.१६ चौ.किमी क्षेत्रावर विस्तारलेले आहे. हा संपूर्ण परिसर जैवविविधतेचा हाॅटस्पाॅट आहे. सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्गामध्ये व्याघ्र स्थलांतराच्या दृष्टीने राधानगरी अभयारण्य महत्त्वाची भूमिका बजावते. कारण, दक्षिणेकडून तिलारी-आंबोलीमार्गे स्थलांतर करुन येणारे वाघ हे राधानगरी अभयारण्यात स्थिरावतात आणि कालांतराने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे मार्गस्थ होतात. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात असलेला एसटीआर टी-०२ म्हणजे सुभेदार हा वाघ देखील राधानगरीत वर्षभर राहिला होता. राधानगरीमधूनच त्याची प्रथम नोंद करण्यात आली. त्यानंतर हा वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येऊन याठिकाणी स्थिरावला. सुभेदारनंतर आता पुन्हा एकदा राधानगरी वन्यजीव अभयारण्यामधून नव्या वाघाची अधिकृत नोंद करण्यात आली. साधारण चार ते पाच वर्षांच्या या नर वाघाचे छायाचित्र डिसेंबर महिन्यात राधानगरी अभयारण्यात टिपण्यात आले होते. तेव्हापासून हा वाघ अभयारण्यात ठिय्या मांडून आहे.
नोव्हेंबर २०२५ मध्ये अभयारण्यात रायबा वाघाच्या पाऊल खुणा आढळून आल्या. त्यानंतर आखिल भारतीय व्याघ्र गणना २०२५-२६ अंतर्गत क्षेत्रीय कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रात फिरत असताना ८ डिसेंबर रोजी या वाघाची विष्ठा मिळाली. यानंतर सूक्ष्म नियोजन करुन वनकर्मचाऱ्यांनी फिरती केली असता ०९ डिसेंबर रोजी पुन्हा वाघाच्या पाऊल खुणा आढळल्या, मात्र कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाचे छायाचित्र टिपले जात नव्हते. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार यांनी वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने कॅमेरा ट्रॅपची संख्या वाढवली. परिणामी १३ डिसेंबर रोजी वाघाचे छायाचित्र टिपण्यात आले. हा वाघ अजूनही राधानगरी वन्यजीव अभयारण्यात वास्तव्यास आहे. मात्र, राधानगरी अभयारण्यात वाघिण नसल्याने तो येत्या काळात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दिशेने प्रवास करणार का, हे पहावे लागेल.
राधानगरीत वास्तव्यास असणाऱ्या नर वाघाची यापूर्वी कोणत्याही प्रदेशामधून नोंद नाही. सिंधुदुर्ग तसेच कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पात अधिवास असणाऱ्या वाघांच्या छायाचित्रांची तुलना या वाघासोबत करण्यात आली. मात्र, कोणतीच छायाचित्र जुळली नाही. त्यामुळे या वाघाला एसटीआर टी-०८ असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला असून यापुढे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील एक वाघ म्हणूनच ओळखला जाईल. - तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प.