दिसपूर (आसाम) : (Devendra Fadnavis) आसाममध्ये सगळे रेकॉर्ड तोडून यावेळी भाजप जिंकेल. ज्याप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी काम केले त्यामुळे आसाममध्ये एक सकारात्मक लाट दिसते असून एक प्रचंड मोठा विजय भाजपला मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणूकांच्या प्रचारार्थ ते आसाम दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा कोणताही प्रभाव पडणार नाही. महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा यापैकी कुठेही त्यांच्या जाहीरनाम्याचा परिणाम झाला नाही. ते निवडून येणार नाहीत हे लोकांना आणि काँग्रेसलाही माहिती आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येकाला ताजमहल बांधून देऊ असेही वचन काँग्रेस देऊ शकते. परंतू, लोकांना वास्तविकता माहिती आहे. विकास कसा होतो हे त्यांना माहिती असून काँग्रेसवर कुणालाही विश्वास नाही. आपण लोकांचा विश्वास मिळवला तर ते आपल्याला पूर्ण जनादेश देतात. काँग्रेसने लोकांचा विश्वास तोडला आहे. ते लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माणच करू शकत नाही. त्यामुळे त्यांना मते मिळत नाहीत. आसाममध्ये भाजप आणि आमची आघाडी विजयाकडे जात आहे."
"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमीत शाह यांचे मी आभार मानतो. त्यांनी नक्षलवादाविरोधात दृढतेने लढा दिला. महाराष्ट्रसुद्धा एक सर्वात मोठे नक्षलग्रस्त राज्य होते. पण मोदी आणि शाह यांच्या नेतृत्वात आम्ही तिथून नक्षलवाद साफ केला आहे. ज्या गडचिरोलीमध्ये पायही ठेवला जात नव्हता ते गडचिरोली शहर आता देशाचे स्टील सिटी बनते आहे. मोदीजींच्या मनात नेहमी समाजातील गरीब, बेघर आणि ज्यांना काहीही मिळाले नाही असे लोक राहतात. त्यांनी कायमच अशा लोकांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. ज्याप्रमाणे आसाम बदलले, त्यामुळे इथले लोक मोदीजी आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासोबत आहेत," असेही ते म्हणाले.
युद्धाच्या परिस्थितीतही काँग्रेसचे राजकारण
"आपल्या आजूबाजूच्या आशियाई आणि युरोपीय देशांमध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. काही देशांनी चार दिवसांचा तर, काहींनी तीन दिवसांचा आठवडा केला आहे. परंतू, भारत हा असा देश आहे जिथे जनजीवनावर कोणताही परिणाम झाला नाही. पंतप्रधानांनी एकही दिवस पेट्रोल-डिझेलचा तुटवडा पडू दिला नाही. घरगुती गॅसचाही तुटवडा नसून व्यावसायिक गॅसला ७० टक्के पुनर्स्थापित करण्याचे काम त्यांनी केले आहे. परंतू, या युद्धाच्या परिस्थितीतही काँग्रेसने राजकारण करण्याचा प्रयत्न केला, ही दु:खद बाब आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल असूनही लोकांना रांगेत उभे करून त्यांच्यात भीती निर्माण करण्याचे काम काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी केले," अशी टीकाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....