मुंबई : (Ashwini Bhide)जेष्ठ सनदी अधिकारी तथा मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला.
मंगळवार, ३१ मार्च रोजी मावळते आयुक्त भुषण गगराणी यांचा कार्यकाळ संपला. या पार्श्वभूमीवर सोमवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली. त्यानंतर रात्री उशीरा अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भिडे यांनी मंगळवारी मावळते आयुक्त भुषण गगराणी यांच्याकडून पदभार स्विकारला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी लोकेश चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पुढील आदेश येईपर्यंत मुंबई मेट्रो रेल महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार अश्विनी भिडे यांच्याकडेच राहील.
अश्विनी भिडे या १९९५ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असून मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये त्यांचे मोठे योगदान असून त्या 'मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन'च्या व्यवस्थापकीय संचालकप म्हणून त्यांचा मोलाचा वाटा आहे. मेट्रो प्रकल्पांमध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना ‘मेट्रो वूमन’ म्हणून ओळखले जाते.
पालिकेत महिलाराज
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी रितू तावडे, विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर आणि आता आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची निवड झाली आहे. त्यामुळे पालिकेतील तीन महत्वाच्या पदांवर महिला असल्याने महिलाराज आले आहे.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....