मुंबई : (Lockdown News) "पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पसरणाऱ्या लॉकडाऊनच्या बातम्या निव्वळ दिशाभूल करणाऱ्या आहेत. देशात इंधनाचा मुबलक साठा असून नागरिकानी घाबरून जाऊ नये," असे आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केले आहे. यासंदर्भात हरदीप सिंह पुरी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. (Lockdown News)
लॉकडाऊनच्या अफवा पूर्णपणे चुकीच्या
"लॉकडाऊनच्या अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत. भारत सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव नाही. सध्याची स्थिती अतिशय नाजूक असली तरी ऊर्जा पुरवठा साखळी, आणि जीवनावश्यक वस्तूंच्या व्यवहारांवर सरकारचे बारीक लक्ष आहे. नागरिकांना इंधन, उर्जा आणि इतर महत्त्वाच्या वस्तूंचा अखंड पुरवठा व्हावा यासाठी सरकार आवश्यक ती पावले उचलत आहे. जागतिक अस्थैर्याच्या स्थितीमध्ये भारतानं नेहमीच संयमी भूमिका घेतली आणि यापुढेही सक्रिय तसेच काळानुरुप निर्णय घेतले जातील", असं पुरी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. (Lockdown News)
आंतरराष्ट्रीय अस्थैर्यापासून भारतीयांना दूर ठेवण्याचा प्रयत्न
पुढे ते म्हणाले, "गेल्या काही वर्षांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम सामान्य ग्राहकांना सोसावा लागू नये, याच भूमिकेतून सरकारने आतापर्यंत तेल कंपन्यांचा तोटा आपल्यावर घेतला. गेल्या एकाच महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींनी ७० डॉलर प्रति बॅरलवरून १२२ डॉलर एवढी वाढ नोंदवली आहे. आग्नेय आशियाई देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ३०% ते ५०% वाढ झाली. उत्तर अमेरिकेत ३०% तर युरोप आणि आफ्रिकेत अनुक्रमे २०% आणि ५०% वाढ झाली. अशा परिस्थितीमध्ये सरकारसमोर दोनच पर्याय होते, एक तर इतर देशांप्रमाणे त्यांच्या किमतीत वाढ करणे किंवा त्याचा आर्थिक तोटा आपल्यावर घेणे, सरकारने आतापर्यंत दुसरा पर्याय निवडला असून भारतीय ग्राहकांना आंतरराष्ट्रीय अस्थैर्यापासून दूर ठेवले." (Lockdown News)
नागरिकांना आवाहन
सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि असे मेसेज फॉरवर्ड करू नका. इंधनाची 'पॅनिक खरेदी' किंवा साठवणूक करण्याची गरज नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहील याची खात्री प्रशासनाने घेतली आहे. (Lockdown News)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\