सोलापूरच्या माळरानांचा सुरक्षारक्षक

    26-Mar-2026   
Total Views |
 Pankaj Chindarkar
 
सोलापुरातील वेगवेगळ्या पर्यावरणीय समस्यांचा पाठपुरावा करीत, जिल्ह्याची जैवविविधता आणि माळरानांच्या संरक्षणाचे पाईक म्हणून काम करणारे पंकज प्रकाश चिंदरकर यांच्याविषयी...
 
पंकज यांचा जन्म दि. १६ सप्टेंबर १९८४ रोजी सोलापूरमध्ये झाला. पुढे सोलापूर शहरातील घर सोडून ग्रामीण भागाच्या दिशेने चिंदरकर कुटुंबीय स्थलांतरित झाले. पंकज यांची शाळा बदलली. नव्या शाळेत मन रमेना, म्हणून शाळेभोवती असणार्‍या मोकळ्या माळावर फिरण्यास सुरुवात झाली. तिथे वनविभागाची रोपवाटिका होती. त्या रोपवाटिकेत जाणे, माळावरचे पक्षी पाहणे असा शाळेला बुट्टी मारून दिवसक्रम सुरू झाला.
 
पंकज यांचा आतेभाऊ आणि त्याचे मित्र हे सोलापुरातील ‘नेचर कॉन्झर्वेशन सर्कल’मध्ये वन्यजीव बचाव कार्यकर्ता म्हणून काम करीत असे. त्यांनी पकडून आणलेले साप हे ते एका खोलीत ठेवत असत. ही खोली पंकज यांच्यासाठी एक खजिनाच ठरली. या खोलीतून वन्यजीवांना पाहण्याचा प्रवास सुरू झाला. सातवी-आठवीपासून ‘नेचर कॉन्झर्वेशन सर्कल’सोबत त्यांनी वन्यजीव बचाव कामाला सुरुवात केली. पुढे महाविद्यालयीन शिक्षण दौंड तालुक्यातील आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स महाविद्यालयामधून वाणिज्य विषयातून झाले. मात्र, आयुष्य वन्यजीवांसाठी वेचायचे, हे पंकज यांनी मनोमन पक्के केले होते.
 
२००१-०२ साली ‘डब्ल्यूआयआय’ या संस्थेचे वन्यजीव संशोधक बिलाल हबीब हे सोलापुरातील माळरानांवर लांडग्यांवर अभ्यास करण्यासाठी आले होते. त्यांना स्थानिक साहाय्य देणार्‍या सारंग आणि शिवकुमार या साहाय्यकांसोबत पंकज यांनी निसर्गवाचन केले. त्यातून वन्यजीव संशोधनाचीदेखील दृष्टी मिळाली. २००३ साली ‘विज्ञान बोध वाहिनी’द्वारे लातूर जिल्ह्यात जाऊन ‘सर्पविज्ञान’ या विषयात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. साधारण २००९-१० साली शंकर नामक एका मित्रामुळे पंकज यांचे पक्षीनिरीक्षण सुरू झाले. त्यासाठी पैसे जमवून दुर्बीण घेतली आणि पक्षीनिरीक्षणाला सुरुवात झाली. नान्नज येथे माळढोक नावाचा राजबिंडा पक्षी पाहिला. आपला पक्षी पुढे जाऊन जगातील दुर्मीळ पक्ष्यांच्या यादीत समाविष्ट होईल, याची पुसटशीही कल्पना त्यांना त्यावेळी नव्हती. पुढे जाऊन मंगळवेढा परिसरातून त्यांनी माळढोक पक्ष्यांची नोंद केली. वनविभागाने या नोंदीची दखल घेऊन अगदी वनमंत्र्यांच्या हस्ते पंकज यांचा सत्कार केला. त्यातून काम करण्याची नवीन उमेद मिळाली.
 
२०१२ साली त्यांनी माळढोक पक्षी अभयारण्य परिसराबाहेरील माळढोक आणि त्याच्यासाठी अनुकूल अधिवासाबाबत अहवाल वन्यजीव विभागास सादर केला. त्यांचे ‘माळढोक अभयारण्यातील विजेच्या तारांचा माळढोक पक्ष्यांना धोका’, ‘भटक्या कुत्र्यांचा वन्यजीवांना उपद्रव’ या विषयाचे लेख ‘ब्युसेरस’ आणि ‘मिसनेट’सारख्या जगप्रसिद्ध मासिकात प्रसिद्ध झाले. २०१३ -२०१५ साली ‘बीएनएचएस’सोबत काम केले. सोलापुरात येणार्‍या ‘एनटीपीसी थर्मल पावर प्लांट’साठी पर्यावरणीय परिणाम अहवालाचे काम ‘बीएनएचएस’ करत होते. त्यावेळी सुजित नरवडे यांनी पंकज यांना या प्रकल्पामध्ये जैवविविधतेची नोंदणी करण्याची संधी दिली. पंकज यांनी दोन वर्षे या प्रकल्पात काम करून जैवविविधता नोंदणीच्या शास्त्रीय कामाचा अनुभव घेतला. २०२१ साली त्यांनी ‘ग्रेट इंडियन बायोडार्व्हसिटी फाऊंडेशन’ नावाने जरी संस्थेची नोंदणी केली असली, तरी २०१० पासूनच त्यांनी या संस्थेच्या नावाने कामाला सुरुवात केली होती.
 
सोलापूरमध्ये पंकज प्रामुख्याने ओळखले जातात, ते त्यांच्या फिरत्या पक्षी छायाचित्रांच्या प्रदर्शनासाठी. २०१३ साली ‘नेचर वॉक’ संस्थेकडून त्यांना हे प्रदर्शन भेट म्हणून मिळाले होते. याच छायाचित्र प्रदर्शनामुळे २०२० साली अरण्यऋषी मारुती चितमपल्ली या त्यांच्या गुरूंसोबत त्यांची पहिली भेट घडली. फिरत्या पक्षीप्रदर्शनाचे उद्घाटन अरण्यऋषींनी केल्यामुळे सात दिवसांत १२ ते १५ हजार लोकांनी हे अनोखे पक्ष्यांच्या छायाचित्रांचे फिरते प्रदर्शन पाहिले. सध्या पंकज सोलापूर शहरातील विविध पर्यावरणीय समस्या हाताळण्याचे, त्यासाठी पाठपुराव्याचे आणि समस्यांचे निवारण करून योजना अमलात आणण्याचे काम करतात. सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोक जैवविविधता नोंदवही तयार करण्यासाठी ते पाठपुरावा करत आहेत. तसेच महानगरपालिकामध्ये वृक्ष आणि जैवविविधता समिती तयार करण्याच्या उद्देशानेदेखील ते प्रयत्नशील आहेत. बंद अवस्थेत असलेल्या सोलापूर प्राणिसंग्रहालयाला नवसंजीवनी देऊन त्या ठिकाणी माळढोक संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी ते प्रशासनासोबत पाठपुरावा करत आहेत.
 
बोरमणी गवताळ सफारीसाठी स्थापनेसाठी पाठपुरावा करून त्याठिकाणी सध्या व्यवस्थापक म्हणून पंकज सध्या कार्यरत आहेत. नान्नज माळढोक पक्षी अभयारण्यामध्ये येत्या काळात माळढोक स्थानांतरण प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पाविषयी पाठपुरावा करून त्यासाठीच्या अधिवास व्यवस्थापनाच्या कामामध्ये पंकज हिरिरीने सहभागी आहेत. माळढोक पक्षी अभयारण्यातील गवताळ अधिवासाच्या सद्यस्थितीचा अभ्यास, अधिवासामध्ये झालेल्या बदलांचा माळढोक पक्ष्यांच्या नियमित विणीच्या हंगामातील भेटीवर झालेला परिणाम, नियमित निरीक्षण आणि शास्त्रीय संशोधन या कामांची गरजच माळढोकला सोलापुरात टिकवून ठेवेल, असे पंकज सांगतात. त्यांच्या पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.