एमपीआयडी प्रकरणात जलद कारवाईसाठी कायद्यात बदल करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहा महिन्यांत निकाल लावणे बंधनकारक...

    24-Mar-2026   
Total Views |
 Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमधील आरोपींवर कठोर कारवाई करताना जप्त मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत मिळावे यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण कायद्यात (एमपीआयडी) महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
 
आ. हेमंत ओगले यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “सध्या एमपीआयडीअंतर्गत कारवाईची प्रक्रिया वेळखाऊ आहे. जप्त मालमत्तांच्या विक्री प्रक्रियेत होणारा विलंब टाळण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. नवीन प्रस्तावानुसार, एमपीआयडी प्रकरणांचा निकाल सहा महिन्यांत लावणे बंधनकारक राहील. तसेच, कोणत्याही परिस्थितीत दोनपेक्षा जास्त वेळा तारखा घेता येणार नाहीत. सध्या अनेक प्रकरणांमध्ये मालमत्तांचे मूल्यांकन (व्हॅल्यूएशन) प्रलंबित असल्याने विक्री प्रक्रियेत अडथळे येत असून यासाठी खासगी सल्लागारांची मदत घेण्याचाही विचार सुरू आहे. या उपाययोजनांमुळे जप्त मालमत्ता लवकर विक्रीस काढता येतील आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे अडकलेले पैसे परत देणे शक्य होईल.”
 
हेही वाचा : भोंदुबाबा अशोक खरातला मदत करणाऱ्या सर्वांचीच चौकशी करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणांना गती मिळणार
 
यावर बोलताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, “अहिल्यानगर जिल्ह्यातील सिस पे, ग्रो मोअर, ग्रो इन्व्हेस्टर या कंपन्याच्या विरोधात आर्थिक फसवणुकीबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचा तपास सुरू आहे. काही आरोपी परदेशात पळून गेले असून त्यांच्याविरोधात नियमानुसार रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या आरोपींना परत आणण्यासाठी महाराष्ट्र पोलीस यंत्रणा सक्रियपणे प्रयत्न करत आहे. एमपीआयडी अंतर्गत फसवणूक करणाऱ्या वित्तीय संस्थांविरोधात कारवाई सुरू असून जप्त मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेला गती देण्यासाठी शासन पातळीवर विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणांना गती मिळेल.”
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....