भोंदुबाबा अशोक खरातला मदत करणाऱ्या सर्वांचीच चौकशी करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सविस्तर निवेदन करत सांगितला अटकेचा घटनाक्रम...

    24-Mar-2026   
Total Views |
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) नाशिक येथील भोंदुबाबा अशोक खरात जादुटोणा व भोंदुगिरी प्रकरणात शासकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे का, याचा तपास सुरु आहे. खरातला मदत करणाऱ्या सर्वांचीच चौकशी करण्यात येणार असून ज्या-ज्या व्यक्तीविरुद्ध पुरावा मिळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
 
अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सविस्तर निवेदन केले. ते म्हणाले की, “दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी अशोककुमार एकनाथ खरातच्या नावाने वावी (जि. नाशिक) पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. आरोपी दिनेश परब याने त्याच्या मोबाईलवरून व्हॉट्सअॅपद्वारे एका महिलेचे चार फोटो प्रसारित करून ते व्हायरल करण्याची धमकी देत ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पण प्राथमिक तपासात कोणताही पुरावा आढळला नाही.”
 
“त्यानतंर दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी शिर्डी येथे एका महिलेने एआयने तयार केलेला अश्लील फोटो पाठवून तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची तक्रार केली. त्यावरून नीरज जाधवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अशोक खरातशी संबंधित साक्षीदाराने तपास अधिकाऱ्यांना काही व्हिडीओ दाखवले. त्यात एकूण ८ महिलांचे ३५ व्हिडीओ होते. या व्हिडीमध्ये अशोक खरातने भोंदुगिरी, जादुटोणा आणि तंत्रमंत्र वापरून अनेक महिलांशी बलात्कार आणि अश्लील चाळे केल्याचे दिसले. हे व्हिडीओ पोलिसांना दाखवणाऱ्या साक्षीदारास जीविताची धमकी होती. पण पोलिसांनी सुरक्षेची हमी देत त्याच्याकडून व्हिडीओ जप्त केले,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
हे वाचलत का? - Tejaswi Satpute: खरात प्रकरणाची ‘लेडी सिंघम’ कोण? तेजस्वी सातपुते यांचा आतापर्यंतचा प्रवास...
 
अशोक खरात पळून जाण्याच्या तयारीत
 
“अशोक खरात हा देश सोडून पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी १० मार्च रोजी लुकआऊट नोटीस जारी केली. त्यानंतर विमानतळ प्राधिकरणाने तात्काळ खरातला परदेशात जाण्यास बंदी घातली. १३ मार्च रोजी वावी आणि शिर्डी या दोन्ही पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक (एसआयटी) ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दि. १७ मार्च रोजी रात्री एका महिलेने सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. अशोक खरातने स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून धार्मिक विधीच्या नावाखाली महिलेला कॅनडा कॉर्नर येथील 'ओकस प्रॉपर्टीज' या ऑफिसमध्ये बोलवले. तिला गुंगीकारक पदार्थ देत वारंवार बलात्कार केला, अशी ही तक्रार होती. यानुसार, आरोपी अशोक खरातविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
 
दरम्यान, ओकस प्रॉपर्टीज या घटनास्थळावरून ६ लाख ५३ हजार ७११ रुपये रोख सापडली. आरोपीच्या घरातून दोन लॅपटॉप, डीव्हीआर, पिस्तुल, २१ जिवंत आणि ५ वापरलेली काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपी अशोक खरातचा मोबाईल डेटा सायबर पोलिस स्टेशनकडे पाठवण्यात आला आहे. तसेच पीडित महिलांची ओळख पटवून त्यांचे समुपदेशन करत त्यांना तक्रार देण्यास तयार करण्यात येत आहे. पीडित महिलांची ओळख उघड होऊ नये यासाठी सोशल मीडियावरून त्यांच्या फोटो आणि व्हिडीओंचे निर्मूलन करण्यात येत आहे. तसेच पीडितेची ओळख होईल असे वृत्तांकन करणाऱ्या न्युज चॅनेल्सच्या संपादकांना कारवाई करण्याची नोटीस देण्यात आली आहे.
 
हेही वाचा : Ashok Kharat police custody: “खरात प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! ५ जणांचा ‘नरबळी’? कोर्टात नेमकं काय घडलं?
 
भोंदुबाबाची संपत्ती किती?
 
मिरगाव येथे ३३ एकर जमीन, फार्महाऊस, पाथर्डीत १० एकर, सिन्नर ६ एकर, शिर्डी साडेचार एकर, काकडी येथे ५.५ एकर जमीन, पाथर्डी तालुक्यात फ्लॅट, ओझर येथे ३ प्लॉट, पनवेलमध्ये ४० गुंठे प्लॉट, कॅनडा कॉर्नर येथे ऑफीस, संगमनेर आणि पुणे येथे मुलीच्या नावावर ८० गुंठे प्लॉट, कर्मयोगी नगर नाशिक येथे बंगला, शिर्डी येथे भागीदारीत मंगल कार्यालय आहे. याव्यतिरिक्त सिन्नरमध्ये पाच जणांमध्ये सहा एकर जमीन, स्वत:कडे १२ तोळे सोने, पत्नीकडे २० तोळे सोने, पत्नीच्या नावे डीमॅट अकाऊंटवर एक ते दोन लाख गुंतवणूक, पाच बँक खात्यांमधील रक्कम मिळून ४० कोटी ८७ लाखांची संपत्ती असून यात आणखी वाढ होऊ शकते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
यासोबतच खरातने अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, युएई, दक्षिण आफ्रिया, टांझानिया, इंडोनेशिया अशा अनेक देशांमध्ये प्रवास केला. त्याने काही आर्थिक गैरव्यवहार केलेत का, याबाबत सखोल चौकशी सुरु आहे. आरोपीने कर चुकवेगिरी केली असेल, तर आयकर विभाग कारवाईसाठी पत्रव्यवहार करणार आहे.
 
शिवनिका संस्थानचीही चौकशी होणार
 
अशोक खरातच्या शिवनीका संस्थानच्या कार्यकारी संचालक मंडळाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. तसेच इतर संस्थाने आणि कार्यकारी मंडळातील सदस्यांचीही सखोल चौकशी सुरु आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....