कॅप्टन खरातसोबतच्या फोटोमुळे लोकांना यात गुंतवणे चुकीचे; माजी मंत्री दीपक केसरकर

खरात एकदाही माझ्या कार्यालयात आले नाहीत...

    22-Mar-2026   
Total Views |
Deepak Kesarkar
 
मुंबई : (Deepak Kesarkar) कॅप्टन खरातला घृणास्पद आरोपाखाली अटक झाली असून त्याचा मी निषेध करतो. यासंदर्भात न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. परंतू, कॅप्टन खरातच्या ओळखीच्या लोकांना यात गुंतवणे, त्यांचे फोटो प्रसिद्ध करणे ही अतिशय चुकीची बाब आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री दीपक केसरकर यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत दिली.
 
दीपक केसरकर म्हणाले की, "एका फोटोमध्ये तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि मी आहे. हा फोटो ईशान्येश्वर मंदिरासाठी रस्त्याची मागणी करण्यासाठी कॅप्टन खरात मुंबईला आले असतानाचा आहे. आता हा रस्ता तयार झाला आहे. ईशान्येश्वर मंदिरामुळे माझी आणि कॅप्टन खरातची ओळख झाली. कॅप्टन खरात यांचा खगोलशास्त्रामध्ये चांगला अभ्यास असल्याने माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांची ओळख आहे. परंतू, यामुळे करण्यात येणारे काही राजकीय आरोप चुकीचे आहे."
 
हेही वाचा : मलाही खरातकडे हात दाखवून अंकशास्त्र बघण्याबाबत सांगितले होते; मंत्री छगन भुजबळ
 
संजय राऊतांचा आरोप चुकीचा
 
केसरकर शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्यातील सर्व बदल्या आणि बढत्या खरातच्या शिफारशीने होत असत, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, "कॅप्टन खरात माझे खाते चालवतात, असे राऊत म्हणतात. पण, ते एकदाही माझ्या कार्यालयात आलेले नाहीत, त्यामुळे ते माझे विभाग चालवत होते असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. माझ्या कार्यकाळात शिक्षण आणि मराठी भाषा विभागात निर्णय झाले, ते क्वचितच एखाद्या मंत्र्यांच्या कालावधीत झाले असतील. त्यामुळे त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध जोडणे चुकीचे आहे. खरात यांच्या मुलीच्या लग्नातील एक फोटो आहे. ज्यांच्याशी आपली ओळख आहे त्यांच्या लग्नाला आपण जातो आणि शुभेच्छा देतो. त्यांच्याशी झालेल्या भेटीत आमच्यात कधीही त्यांच्या व्यक्तिगत जीवनाची चर्चा झाली नाही. माझ्यासारख्या अनेक राजकीय नेत्यांची केवळ ओळख आहे म्हणून फोटो प्रसिद्ध करून त्याबद्दल काहीतरी मजकूर छापणे अत्यंत चुकीचे आहे," असेही ते म्हणाले.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....