मलाही खरातकडे हात दाखवून अंकशास्त्र बघण्याबाबत सांगितले होते; मंत्री छगन भुजबळ

चाकणकरांनी चुकीचे केले असल्यास पोलीस बघतील...

    21-Mar-2026   
Total Views |
Chhagan Bhujbal
 
मुंबई : (Chhagan Bhujbal) कॅप्टन अशोक खरातबद्दल मला फारसे माहिती नाही. पण त्यांच्याकडे जाऊन हात दाखवून निवडणूकीचे अंकशास्त्र बघावे असे काही लोक आपल्याला सांगत असल्याचे माझे लोक सांगतात. पण मी गेलो नाही. अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे असे माझे मत आहे," अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना दिली.
 
भोंदुबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, "मंदिरात तुम्ही ध्यानधारणा, योगा करा, दर्शन घ्या. काही चांगले काम करणारेसुद्धा गुरुजी आहे, जे समाजाची सेवा करतात. पण अशा काही लोकांमुळे सगळेच बदनाम होतात. अशोक खरातकडेसुद्धा बरीच मोठमोठी मंडळी येत होती. रुपाली चाकणकर या पुण्याच्या आहेत. त्यांनासुद्धा कुणीतरी खरातकडे नेले असेल. पण राजकारण किंवा समाजकारणात असलेल्या लोकांनी या सगळ्या बाबतीत काही सीमा आखून ठेवल्या पाहिजेत. कारण आपण जे काही करतो त्याचा परिणाम सामान्य जनतेवर होतो. मंत्री जातात मग आपण जाण्यास काय हरकत आहे, असा प्रभाव पाडण्याचे प्रकार होतात. पोलीस चौकशी करत असून त्यात सत्य बाहेर येईल आणि ते कारवाई करतील. या प्रकरणात चाकणकर यांनी काही चुकीचे केले असल्यास पोलीस बघून घेतील."
 
हेही वाचा : रुपाली चाकणकरांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माहिती
 
महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेणार?
 
"आपण सतत जात असू आणि एखाद्याला मदत करत असू तर कुणीतरी एखाद्या संस्थेवर घेत असतात. तसे रुपाली चाकणकर यांनाही घेतले असेल. महिला आयोगाचा शासकीय निर्णय शासन घेतात. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निर्णय घेतील. एखादा आरोप झाल्यानंतर त्यात किती तथ्य आहे हे समजून घेतले पाहिजे. सत्यता तपासल्याशिवाय राजीनामा घेणे योग्य ठरत नाही. त्यांनी माहिती घेतली असेल. चर्चा झाली असेल. हे महत्वाचे पद असल्याने सगळ्यांशी चर्चा करणे आवश्यक होते. पक्षाच्या महिला अध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार पक्षाला आहे. त्यात शासन येत नाही. याबाबतीत काय करायचं? हे पक्षश्रेष्ठी आणि सर्व मंडळी बसून ठरवतील," असेही ते म्हणाले.
 
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर बोलताना ते म्हणाले की, "त्यांच्या विधानावर मी वक्तव्य करू इच्छित नाही. अशा तंत्र मंत्राने शासन उलथवून टाकता येत असते तर, देशातील अनेक शासनांच्या रोज उलथापालथी झाल्या असत्या," असेही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....