अशोक खरात प्रकरणात बाहेर आलेली माहिती उद्विग्न करणारी; खा. सुनील तटकरे

    21-Mar-2026   
Total Views |
Ashok Kharat case
 
मुंबई : (Ashok Kharat Case) महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपात नाशिक येथील भोंदुबाबा अशोक खरातच्या अटकेनंतर रोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. दरम्यान, अशोक खरात प्रकरणात बाहेर आलेली माहिती उद्विग्न करणारी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी दिली.
 
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेत्यांचे खरातसोबतचे फोटो पुढे आल्यानंतर सर्वत्र चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. 'एक्स' अकाऊंटवरील पोस्टमध्ये सुनील तटकरे म्हणाले की, "नाशिकच्या खरात प्रकरणाच्या अनुषंगाने जी काही माहिती बाहेर येते आहे, ती उद्विग्न करणारी आहे. देवाच्या आणि श्रद्धेच्या नावाने अशा काही गोष्टी होतील अशी कल्पना मी किंवा कोणीच कधीही करू शकत नाही."
 
पीडितांनी समोर येऊन तक्रार नोंदवावी
 
"सार्वजनिक जीवनात वावरताना प्रत्येकाचाच अनेक व्यक्तींशी तसेच संस्थांशी संपर्क येतो. अनेकदा या संपर्काचे स्वरूप थेट स्वरूपाचे असतेच असे नाही. परंतू, याचा अर्थ असा नाही की, एखादे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घातले जाईल. उलट या प्रकरणातील पीडितांनी समोर येऊन पोलिसात तक्रार नोंदवावी. आमचे सरकार या प्रकरणात ठाम भूमिका घेऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सुद्धा या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या दृष्टीने काय पावले उचलायला हवीत ती आम्ही उचलू," असे ते म्हणाले.
 
हेही वाचा : Income Tax Rules: १ एप्रिलपासून मोठे बदल! नवीन आयकर कायदा लागू; तुमच्या खिशावर नेमका काय परिणाम?
 
योग्य कारवाई करणार - खा. प्रफुल पटेल
 
या प्रकरणावर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते खा. प्रफुल पटेल यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, "भोंदू बाबाचे प्रकरण अतिशय वाईट असून त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे. जे लोक त्याच्यासोबत या कामात सहभागी असतील आणि त्यांचे नाव तपासात पुढे आल्यास त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. काही राजकीय नेत्यांचीही नावे यात जोडली गेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही त्यांच्यावर योग्य कारवाई करणार असून येत्या एक दोन दिवसांत ते दिसेल. आमच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. पक्ष यावर नक्कीच योग्य कारवाई करेल."
 
भोंदुगिरी करणारे लोक जेरबंद होणार - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
 
"पोलिस या प्रकरणाचा योग्य तपास करून यात कोण कोण सहभागी आहेत हे शोधून त्यांच्यावर कारवाई करतील. कुणीतरी एखादा आश्रम बांधतो, तिथे एखादे संमेलन होते, अशा ठिकाणी लोक जात असतात. पण पडद्यामागे काय घडते हे लोकांना माहिती नसते. त्यामुळे दोषी असणाऱ्यांवर नियमानुसार पोलिस कारवाई करत आहेत. तपासानंतर सत्य समोर येईल आणि भोंदुगिरी करणारे लोक जेरबंद होतील."
 
हे वाचलत का? - माझ्या बदनामीचा कट रचणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार : रुपाली चाकणकर
 
नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात
 
दरम्यान, नाशिक पोलिसांनी कॅप्टन अशोक खरातचे बिंग फोडणाऱ्या नीरज जाधवला शुक्रवारी अटक केली. त्यानेच कॅप्टन खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय असून त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडीओचे स्क्रीनशॉट्स पाठवल्या प्रकरणी त्याच्यावर शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....