नवी दिल्ली : (Noida International Airport) ग्रेटर नोएडातील जेवर येथे उभारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन शनिवार, दि. २८ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकत्याच लखनौ येथील कार्यक्रमात या उद्घाटनाची तारीख जाहीर केली होती. राज्य सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांचा हा एक भाग असून, पायाभूत सुविधांच्या विकासाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
विमानतळाने आवश्यक नियामक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता व्यावसायिक उड्डाण सेवांसाठी तो सज्ज झाला आहे. अलीकडेच राष्ट्रीय तपास यंत्रणाकडून सुरक्षा आणि एरोड्रोम मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने देशांतर्गत प्रवासी सेवा तसेच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय कार्गो सेवांसाठी अंतिम सुरक्षा मंजुरी दिली आहे.
यानंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयकडून विमानतळाला एरोड्रोम परवाना मिळाला असून, सुरक्षा प्रणाली, कार्यपद्धती, पायाभूत सुविधा, नेव्हिगेशन साधने आणि आपत्कालीन प्रतिसाद यासंबंधी सर्व निकष पूर्ण झाल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. आता पुढील टप्प्यात एरोड्रोम सिक्युरिटी प्रोग्रामला मंजुरी मिळाल्यानंतर पूर्ण क्षमतेने व्यावसायिक उड्डाणे सुरू होणार आहेत.
डिसेंबर २०२४ मध्ये इंडिगोने एअरबस A320 विमानाद्वारे व्हॅलिडेशन फ्लाइट घेऊन अप्रोच प्रक्रिया, नेव्हिगेशन प्रणाली आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलची यशस्वी चाचणी केली होती. विमानतळावरील सर्व प्रमुख पायाभूत सुविधा तयार असून, ग्राउंड हँडलिंग, इन-फ्लाइट केटरिंग, इंधन पुरवठा, कार्गो सेवा, रिटेल, खाद्यपदार्थ आणि हॉस्पिटॅलिटीसाठी कंत्राटे देण्यात आली आहेत. तसेच, एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडून कम्युनिकेशन आणि नेव्हिगेशन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
इंडिगो ही या विमानतळाची पहिली सेवा सुरू करणारी एअरलाईन असेल. प्रवाशांसाठी इंटरसिटी आणि लांब पल्ल्याच्या बस सेवा, विमानतळ टॅक्सी आणि अॅप-आधारित कॅब सेवा उपलब्ध असतील. यासाठी स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमचा वापर करण्यात येणार आहे.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.