कमाल मौला मस्जिद? की राजा भोजाची पाठशाळा?

Total Views |
Bhojshala Survey
 
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, भारतीय पुरातत्त्व खात्याने धार या ठिकाणी अतिशय काटेकोरपणे सर्वेक्षण मोहीम राबवली. या मोहिमेत पुरातत्त्वशास्त्रज्ञ, शिलालेखतज्ज्ञ, रसायनतज्ज्ञ, संरक्षक, सर्वेक्षक, छायाचित्रकार, ड्राफ्टस्मन इत्यादी आपापल्या कामात तरबेज असलेली माणसे, तसेच ‘ग्राऊंड पेनिट्रेटिंग रडार’ किंवा ‘जीपीआर’ आणि ‘कार्बन १४’ आदी आधुनिक विज्ञान प्रणालींचादेखील वापर करण्यात आला. पुरातत्त्व खात्याच्या अहवालामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की, या वास्तूमध्ये गणपती, ब्रह्मदेव, नरसिंह, भैरव, कीर्तिमुख, व्याल, नाग, सिंह, हत्ती, घोडे, कुत्रे, वानर, कासव, हंस अशा नावाविध मूर्ती आढळल्या आहेत. मशीद या वास्तूमध्ये माणसे किंवा प्राणी कोणत्याच मूर्ती, प्रतिमा असणे अपेक्षित नसते.
 
आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आणि तापी नदीचे खोरे आहे. ते ओलांडले की, आपण नर्मदा नदीच्या खोर्‍यात प्रवेश करतो. अत्यंत सुपीक अशा या भागाला प्राचीन काळी ‘मालव’ असे नाव होते. तोच आताचा ‘माळवा.’ शासकीयदृष्ट्या आता तो मध्य प्रदेश राज्यात येतो. इसवी सनाच्या नवव्या शतकात मालव प्रांतावर ‘परमार’ नावाचे राजपूत राजे राज्य करत होते. मुळात ते राष्ट्राकूटांचे मांडलिक होते. पुढे स्वतंत्र बनले. धारानगरी म्हणजेच आताचे ‘धार’ ही त्यांची राजधानी होती. परमारांचे राज्य १३व्या शतकापर्यंत चालू असले, तरी महाराजाधिराज भोज परमार (कार्यकाळ सन १०१० ते १०५५) हा त्यांचा सर्वोच्च यशस्वी राजा होता. राजा भोज रणधुरंधर सेनापती तर होताच; पण तो अत्यंत विद्वानही होता. त्याला अनेक भाषा अवगत होत्या. त्याने एकंदर ८४ ग्रंथ लिहिले, असा उल्लेख आहे. त्यांपैकी व्याकरण आणि काव्यशास्त्र यांच्यावर ‘सरस्वतीकंठाभरण’, आयुर्वेदावर ‘आयुर्वेदसर्वस्व’ आणि शिल्पशास्त्रावर ‘समरांगणसूत्रधार’ हे ग्रंथ उपलब्ध आहेत.
 
इथे काही गोष्टी स्पष्ट करायला हव्यात. शिल्पशास्त्र म्हणजे शिल्पे किंवा मूर्ती बनवण्याचे शास्त्र नव्हे, तर अभियांत्रिकी किंवा इंजिनिअरिंग होय. या ग्रंथात विमान कसे बनवावे, ते सांगितलेले आहे. हा ग्रंथ उपलब्ध आहे. सन १८९७ साली मुंबईत गिरगाव चौपाटीवर, गिरगावातच राहाणारे एक अभ्यासक शिवकर बापूजी तळपदे यांनी एक विमान बनवून उडवून दाखवले होते. आपण हे विमान ‘अथर्ववेदा’तील काही ऋचांचा अभ्यास करून तयार केले, असे त्यांनी म्हटले होते. ‘समरांगणसूत्रधार’ ग्रंथाचा उल्लेख मात्र त्यांनी केलेला नव्हता. पुढे त्यांची सर्व कागदपत्रे चोरीला गेली आणि आर्थिक हलाखीत त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात अभ्यास करणारे काही संशोधक एका ख्यातनाम मराठी वैज्ञानिकाला भेटले आणि त्यांनी त्याला ‘अथर्ववेद’, ‘समरांगणसूत्रधार’ किंवा अन्यही हिंदू विमान विद्येबाबत काही शोधकार्य करण्याची विनंती केली. तेेव्हा त्याने अत्यंत तुसडेपणाने, ‘तुमच्या वेदात आणि रामायणात विमान होते म्हणता? मग त्या फॉर्म्यूल्यानुसार बनवा ते आणि दाखवा उडवून आम्हाला,’ असे उद्गार काढत्याचे सांगितले जाते.
 
असो. तर याच भोजराजाने ‘भोजपालपूर’ या नावाचे एक सुंदर शहर नव्याने वसवले. मुळात त्याने ‘भोजताल’ नावाचा एक अतिशय विशाल तलाव बांधला. त्याच्या काठावर हे भोजपालपूर वसवले. त्या विशाल तलावात कमळांची शेती केली जात असे आणि कमळांच्या पानांपासून अत्यंत शास्त्रीय पद्घतीने अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा कागद बनवला जात असे. भोजराजाला स्वत:ला अनेक विद्या आणि कला अवगत होत्याच; पण अशा असंख्य विद्या, कला आणि शास्त्रे अवगत असणार्‍या विद्वानांचा, कलावंतांचा आणि शास्त्रज्ञांचा तो आश्रयदाताही होता. या सगळ्या विद्या आणि कला सतत अभ्यासल्या जात राहाव्यात, एक पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जात राहाव्यात म्हणून त्याने आपली राजधानी धारानगरीमध्ये एक मोठी पाठशाळाही बांधली. तिला नंतर ‘भोजशाळा’ असेच नाव पडले.
 
सन १०५५ मध्ये भोजराजा मरण पावला. या वेळेपावेतो प्रथम अरब आणि मग तुर्क मुसलमान भारतात घुसू लागले होते. मुहम्मद गझनी हा मूळचा तुर्क. हे तुर्क भारताच्या गांधार प्रदेशात घुसले आणि स्थिरावले. म्हणून त्यांना ‘अफगाण-तुर्क’ म्हणू लागले. मुहम्मद गझनीच्या सोमनाथावरच्या पहिल्या काही स्वार्‍या असफल झाल्या. त्यापैकी एका स्वारीत भोजराजाचा पुतण्या लक्ष्मदेव याने गझनीचा पराभव केला होता. पण, अफगाण-तुर्क सातत्याने स्वार्‍या करत राहिले आणि हिंदू राजांच्या एकजुटीत सातत्य राहिले नाही. कारण, त्यांना इस्लामच्या सर्वभक्षक आक्रमणाचे स्वरूप कळलेच नाही. गझनीनंतर घोरी आला. घोरीनंतर खिलजी आला. सन १३०५ मध्ये अल्लाउद्दिन खिलजीने माळव्यावर स्वारी केली. भोजराजाचा अखेरचा वंशज महलकदेव परमार याला ठार मारून त्याने माळवा दिल्ली सल्तनतीच्या अमलाखाली आणला. अल्लाउद्दिनाचा सरदार ऐन उल मुल्क मुलतानी हा माळव्याचा सुभेदार बनला.
 
या ऐन उल् मुल्काच्या कारकिर्दीतच भोजशाळेची कमाल मौला मशीद बनली असावी. सन १३९२-९३चा एक फारसी शिलालेख सापडला आहे. त्यात असा उल्लेख आहे की, माळव्याचा तत्कालीन सुभेदार दिलावरखान याने सन १३३१ साली बांधलेली कमाल मौला मशीद जीर्ण झाल्यामुळे दुरुस्त करण्यात आली आहे. याचा अर्थ, सन १३०५ मध्ये ऐन उल् मुल्क माळव्याचा सुभेदार बनल्यावर कमाल अल मौला हा सुफी संत धारला येऊन राहिला असावा. सन १३३१ मध्ये तो तिथेच मरण पावला. त्याची कबर शेजारी आहेच. ऐन उल् मुल्कने उद्ध्वस्त केलेल्या भोजशाळेला ‘कमाल मौला मशीद’ हे नाव देऊन टाकले. सन १३९२-९३ मध्ये दिलावरखानाने ती जीर्ण इमारत दुरुस्त केली.
 
पुढे माळव्याचे सुभ्याचे मुख्य ठाणे भोजपालपूर येथे झाले. या अफगाण-तुर्क सुभेदारांच्या आणि सुलतानांच्या कारकिर्दीत भोजपालपूरचे भोपाळ झाले. १५व्या शतकातला माळव्याचा एक सुलतान होराग शहा याने भोजताल हा विशाल तलाव नष्ट करण्यासाठी तो ठिकठिकाणी फोडला. तरीही, आज भोपाळ शहरातला हा ‘बडा तालाब’ ३१ चौ.किमी. क्षेत्रावर पसरलेला आहे आणि आजच्या भोपाळ शहराच्या पिण्याच्या पाण्याची ४० टक्के गरज याच तलावातून भागते. असो. पुढे पहिल्या बाजीराव पेशव्याच्या कारकिर्दीत मराठे नर्मदा ओलांडून माळव्यात घुसले. बाजीरावाने ठिकठिकाणी मोक्याच्या ठाण्यांवर आपले विश्वासू सरदार नेमले. जसे इंदोर-महेश्वर होळकरांना दिले. तसेच धार हे ठाणे सन १७३२ साली सरदार आनंदराव पवार यांच्याकडे सोपवण्यात आले. पंवार किंवा पवार हा ‘परमार’ या नावाचाच अपभ्रंश समजला जातो. थोडक्यात, ४०० वर्षांनंतर धारानगरी पुन्हा परमार घराण्याचे वारस असणार्‍या पवारांकडे आली.
 
नंतर इंग्रजांच्या राज्यात धार हे एक संस्थान बनले. धारमध्ये सर्वत्र असंख्य उद्ध्वस्त अवशेष होते. बंगालची फाळणी करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेला व्हाईसरॉय लॉर्ड नाथानेल कर्झन हा मोठा इतिहासप्रेमी होता. धारला आपण कदाचित भेट देऊ, असे त्याने १९०२ साली धारचा ब्रिटिश पोलिटिकल एजंट कॅप्टन अर्नेस्ट बार्न्स याला कळवले. बार्न्सने घाईघाईने काशिनाथ कृष्ण लेले यांना धारमधले पुरातत्त्व अवशेष एकत्रित करून त्यांचे एखादे संग्रहालय बनवण्याच्या कामी जुंपले. हे के. के. लेले संस्कृत विद्वान असून, धार संस्थानचे मुख्य शिक्षणाधिकारी होतेच. हौस म्हणून त्यांनी तोपर्यंत धार संस्थानमधली काही संस्कृत नाटके, काव्ये आणि शिलालेख यांचे वाचन करून त्यावर लेखही लिहिले होते. आता कॅप्टन बार्न्सच्या आदेशावरून त्यांनी कमाल मौला मशिदीत काटेकोर संशोधन केले. काय सापडले त्यांना? ‘कूर्मशतकद्वयम्’ नावाची दोन प्राकृत काव्ये आणि राजगुरू मदन लिखित ‘विजयश्रीनाटिका’ नावाचे संस्कृत नाटक सापडले. दि. ३० डिसेंबर १९०३ या दिवशी त्यांनी याबाबत विस्तृत अहवाल लिहून सादर केला.
 
म्हणजेच, स्थानिक हिंदूंच्या परंपरागत श्रद्धेनुसार कमाल मौला मशिदीच्या जागी आधी भोजशाळा होती, याचा पुरावा मिळाला; पण हे इंग्रज सरकारच्या सोईचे नव्हते. त्यामुळे प्रकरण लोंबकळत राहिले. १९३५ साली संस्थानी प्रशासनाने परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश काढला. मात्र, दर आठवड्यात मंगळवारी हिंदूंना पूजा करण्याची, तसेच शुक्रवारी मुसलमानांना नमाज अदा करण्याची परवानगी मिळाली. तसे वसंत पंचमी हा उत्तर भारतात देवीचा सण मानला जातो, म्हणून वर्षातून एकदा वसंत पंचमीला पूजा करण्याची हिंदूंना परवानगी देण्यात आली. वेळोवेळी खुद्द धार शहरातले आणि एकंदर मध्य प्रदेशातले अनेक हिंदूप्रेमी लोक भोजशाळेचा पुनरुद्धार करण्याच्या प्रयत्नात होते. अखेर १९९८ साली विमल कुमार गोधा यांनी बंजरंग दलामार्फत मध्य प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली की, भोजशाळा हे हिंदू ठिकाण आहे. कमाल मौला मशीद, भोजशाळा उद्ध्वस्त करून, तिचेच खांब आणि अन्य साहित्य वापरून उभारण्यात आली आहे. न्यायालयाने याबाबत आधुनिक साधनांनी शोध करून ते ठिकाण हिंदूंच्या ताब्यात द्यावे. मुसलमानांनी ‘मौलाना कमालुद्दिन वेल्फेअर सोसायटी’ अशी संस्था निर्माण करून या दाव्याला आव्हान दिले.
 
१९९८ पासून तारखा पडत पडत अखेर दि. ११ मार्च २०२३ रोजी उच्च न्यायालयाने पुरातत्त्व खात्याला सर्वांगीण संशोधन करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. दि. २२ मार्च २०२४ पासून पुरातत्त्व खात्याने प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात केली. सर्व प्रकारची अत्याधुनिक साधने आणि विशेषज्ञ व्यक्ती यांच्या साहाय्याने सर्वेक्षण करण्यात आले. फिर्यादी आणि प्रतिद्वंद्वी उभय पक्षांचे प्रतिनिधीही तिथे उपस्थित होते. जुलै २०२४ मध्ये पुरातत्त्व खात्याने आपला सुमारे २२०० पानांचा अहवाल न्यायालयाला सादर केला. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या वास्तूमध्ये देव, मानव, पशू, फुले यांच्या विविध प्रकारच्या प्रतिमा ठिकठिकाणी आढळल्या. अनेक ठिकाणी त्या प्रतिभा कानशीने घासून नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे; पण तो प्रयत्न फारसा यशस्वी न झाल्याचे दिसून आले. कारण, ज्या दगडावर त्या प्रतिभा कोरल्या होत्या, तो दगड पक्का बेसॉल्ट दगड आहे.
 
अनेक शिलालेख आढळले. १९०३ साली के. के. लेले यांना जे नाटक आणि काव्ये सापडली, ती दगडावर कोरलेलीच आहेत. पश्चिमेकडच्या व्हरांड्यात एक मेहराब म्हणजे मौलवी ज्यावर उभा राहून प्रवचन देतो, ती पायर्‍यांसारखी रचना, ही मात्र नवी आहे, असेही दिसून आले. एकंदर १७०० पुरावशेष आढळले की, जे भोजशाळा किंवा तत्सम हिंदू स्थान पाडून तिथे मशीद बांधण्याकडे
निर्देश करतात. आता दि. २४ मार्च २०२६ रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाचे माननीय न्यायमूर्ती स्वत: धारला भेट देऊन निरीक्षण करणार आहेत.
 
 

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.