रत्नागिरीच्या निसर्गाचा मलंग

    19-Mar-2026   
Total Views |
Viraj Athalye
 
निसर्गासाठी काम करण्याची तळमळ असल्यास, निसर्ग आपसूकच आपल्या कुशीत सामावून घेतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे रत्नागिरीचा विराज विजय आठल्ये. त्याच्याविषयी...
 
विराजचा जन्म रत्नागिरीत दि. १८ ऑक्टोबर १९९२ रोजी झाला. त्याच्या वडिलांच्या कंपनीतील कर्मचार्‍यांच्या ‘ट्रेकिंग गु्रप’सोबत विराजही सहभागी होत असे. तिथेच निसर्गाची पहिली तोंडओळख झाली. शालेय सुटीमधील बरासचा वेळ कशेळीतील आपल्या आजोळी जाई. जंगलात फिरायला जाणे, किनार्‍यावर पाय मोकळे करून येणे, असा नित्यक्रम. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे रत्नागिरीच्या रा. भा. शिर्के प्रशालेत झाले. या काळात मोठ्या भावाने एक कॅमेरा खरेदी केला होता. विराजनेही कॅमेर्‍यातून सूक्ष्मजीवांची छायाचित्रे टिपण्यास सुरुवात केली आणि निसर्गामध्ये काम करण्यासाठीचा त्याच्या आयुष्यातील तो पहिला वळणबिंदू ठरला.
 
कॅमेर्‍याच्या माध्यमातून विराज छोट्या-छोट्या कीटकांचे फोटो टिपू लागला. घरच्यांचा कल त्याने इंजिनिअरिंग करावी, याकडे होता. त्यामुळे विज्ञान शाखेतून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आणि पुढे चार वर्षे ‘मॅकेनिकल इंजिनिअरिंग’चे शिक्षण असा प्रवास झाला. मात्र, या प्रवासातदेखील निसर्गाने विराजची साथ सोडली नाही. महाविद्यालयीन सुटीच्या वेळी किंवा अगदी तासांना बुट्टी मारून विराज आपल्या समविचार मित्रांसोबत फिरायला जात असे. या फिरण्यामधून सूक्ष्मजीवांकडे असणारा विराजचा कल हा पक्ष्यांकडे वळला. पक्ष्यांकडे नजर वळाल्यावर विराज निरनिराळी पुस्तके वाचून त्या पक्ष्यांची ओळख पटवू लागला. तोपर्यंत इंजिनिअरिंगचे शिक्षण संपले होते. आता वेळ होती, नोकरीला सामोरे जाण्याची! इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर विराज ११ महिन्यांकरिता गुजरातला नोकरीसाठी गेला. या ११ महिन्यांमध्ये त्याला यंत्राच्या कचाट्याने इतके घेरले की, त्याला एकदाही निसर्ग पाहण्याची संधी मिळाली नाही.
 
त्यावेळी विराजने ठरवले की, नोकरी करायची नाही. मात्र, पुढे नेमके काय करायचे? या मनात चाललेल्या कल्लोळामधूनच त्याने २०१८ साली रत्नागिरी गाठले. रत्नागिरीला आल्यानंतर आपल्या अंगी असलेल्या निरनिराळ्या कौशल्यांचा त्याने विचार करण्यास सुरुवात केली. त्या कौशल्यातील छायाचित्रणाचे कौशल्य विकसित असल्याचे त्याला जाणवले. निसर्ग आणि छायाचित्रण अशा स्वरूपाचे काम करायचे निश्चित झाले आणि संधीच्या शोधात निरनिराळ्या ठिकाणी त्याची उमेदवारी सुरू झाली. केंद्र सरकारच्या ‘सॅकोन’ या संस्थेत रानपिंगळा या पक्ष्यावर नंदुरबार येथे त्याने महिनाभर काम केले. महिना संपला आणि पुन्हा विराजची उमेदवारी सुरू झाली.
 
यादरम्यान, ‘यूथ फॉर क्लिक’ नावाची एक छायाचित्रणाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये देशभरातून आठ होतकरू वन्यजीव छायाचित्रकारांची निवड करून त्यांना दोन तज्ज्ञ वन्यजीव छायाचित्रकारांच्या मार्गदर्शनाअंतर्गत कोण्या अभयारण्यात मार्गदर्शन शिबिराकरिता धाडण्यात येणार होते. निसर्गाला विराजसोबत काम करायचेच होते. त्यामुळे या शिबिराकरिता त्याची निवड झाली आणि आठवड्याभराकरिता त्याची रवानगी दोन तज्ज्ञ वन्यजीव छायाचित्रकार आणि इतर सात होतकरू छायाचित्रकारांसोबत राजस्थानमधील भरतपूर अभयारण्यात झाली. त्याठिकाणी त्याला छायाचित्रणाच्या निरनिराळ्या पद्धती, छायाचित्रांचे संकलन याविषयी विस्तृत माहिती मिळाली. या निवडीमुळे घरच्यांचा त्याच्यावर आणि त्याच्या निसर्गप्रेमावर विश्वास बसला. तिथून परतल्यावर विराजने निसर्गाचे शास्त्रीय पद्धतीने शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यामुळे त्याने ‘बीएनएचएस’चा वर्षभराचा पक्षीविज्ञान अभ्यासक्रमामध्ये सहभाग घेतला.
 
‘बीएनएचएस’चा हा अभ्यासक्रम सुरू असतानाच, त्याला ‘बीएनएचएस’ आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘एन्व्हार्यमेंटल इन्फोमेशन सिस्टम’ या केंद्रात दोन वर्षे काम करण्याची संधी मिळाली. मात्र, निसर्गात रमणार्‍या विराजला दोन वर्षे कार्यालयीन काम केल्यावर ऊब आली. त्याने नोकरी सोडली आणि ‘बीएनएचएस’च्या पाणथळीसंबंधी सुरू असणार्‍या प्रकल्पांमध्ये कंत्राटी पदावर रुजू झाला. याठिकाणी त्याने चंबळच्या खोर्‍यातील ‘पाणचिरा’ या संकटग्रस्त पक्ष्यांसाठी साहाय्यक म्हणून काम केले. हे काम हंगामी स्वरूपाचे असल्याने रत्नागिरीत परतल्यावर, त्याने तेथील पक्षीवैभवाची नोंद करण्यास सुरुवात केली. कंत्राटी काम संपल्यांनतर पुण्यातील एका संस्थेत ताम्हिणी आणि मुळशी भागात ‘नॅचरलिस्ट’ म्हणून काम केले. या काळात वडिलांचे निधन झाल्याने रत्नागिरीत असणार्‍या आईची काळजी घेण्यासाठी विराज परतला. नेमक्या त्याच वेळेत देवरूखच्या ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’मध्ये धनेश पक्ष्यांवर काम करण्यासाठी तज्ज्ञ साहाय्यकाची गरज होती. सध्या तो या संस्थेसोबत रत्नागिरी जिल्ह्यातील धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी राबविण्यात येणार्‍या संशोधनात्मक प्रकल्पामध्ये कार्यरत करत आहे. तसेच ‘एन्व्हार्यमेंटल सायन्स’ या विषयामधून पदवीचे शिक्षणही घेत आहे. निसर्गासाठी काम करण्याची तळमळ असल्यास निसर्ग आपसूकच आपल्या कुशीत सामावून घेतो, याचे विराज म्हणजे उत्तम उदाहरण. त्याला पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कड़ून शुभेच्छा!
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.