भारतामधील सर्वात मोठे गिधाड बारामतीत; हिमालयातून आले स्थलांतर करुन

    09-Feb-2026   
Total Views |
Himalayan Griffon vulture


मुंबई (अक्षय मांडवकर) - प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये आढळणारे आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले ‘हिमालयीन ग्रिफाॅन’ जातीचे दुर्मीळ गिधाड पुण्यातील बारामती तालुक्यात दिसले आहे (Himalayan Griffon vulture). भिगवणच्या स्थानिक पक्षीनिरीक्षकांनी या गिधाडाची नोंद केली असून हे गिधाड महाराष्ट्रात हिवाळी स्थलांतर करुन येतात. (Himalayan Griffon vulture)

 


महाराष्ट्रात गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद असली तरी 'पांढऱ्या पुठ्ठ्याची', 'लांब चोचीची' आणि 'पांढरी गिधाडे' १९९० आणि त्यापूर्वी मोठय़ा संख्येने आढळत होती. गिधाडांची संख्या देशभरात कोलमडल्यानंतर अपुऱ्या खाद्यपुरवठय़ामुळे राज्यात आढळणारी गिधाडेसुद्धा दिसेनाशी झाली. त्यामुळे त्यांचा समावेश ‘नष्टप्राय श्रेणी’तील पक्ष्यांच्या यादीत करण्यात आला. भारतातील गिधाडांच्या प्रजातीमधील सर्वात मोठ्या 'हिमालयीन ग्रिफाॅन' गिधाडाचे दर्शन बारामती तालुक्यात झाले. भिगवणचे पक्षीनिरीक्षक संदीप नगरे यांना बारामतीमधील शिर्सुफळ गावातील गवताळ प्रदेशात या गिधाडाचे दर्शन रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी घडले.

 

मध्य आशियामधील पामीर पर्वतरांग, काझाखस्तान, तिबेटी पठार आणि हिमालय पर्वतरांगांमध्ये 'हिमालयीन ग्रिफाॅन' प्रजातीच्या गिधाडांचे वास्तव्य आहे. या गिधाडाचे वजन वजन साधारणतः ८ ते १२ किलो पर्यंत असून त्यांच्या पंखांचा व्यास ९ ते १० फूट इतका असतो. या जातीची गिधाडे कोकणताही स्थलांतर करुन येतात. मुंबईतही ती या काळात दिसतात.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.