राज्यात स्वतंत्र वन्यजीव संशोधन संस्थेची गरज...

    28-Feb-2026   
Total Views |

मुंबई : भारतीय वन्यजीव संस्थान (डब्लूआयआय) या केंद्र स्तरावरच्या वन्यजीव संशोधन संस्थेप्रमाणे राज्यातही वन्यजीव संशोधन संस्था स्थापन करण्याची मागणी दै. मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांनी केली आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत समितीचे सदस्य या नात्याने त्यांनी हा मुद्दा बैठकीत उपस्थित केला. यावर वन विभागाच्या वन्यजीव कक्षाने सकारात्मक प्रतिसाद नोंदवला असून राज्यात वन्यजीव संशोधन संस्थेच्या निर्मितीची निकड त्यांनी बोलून दाखवली आहे.

राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची बैठक सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत मंत्रालयात पार पडली. या बैठकीत समितीचे सदस्य किरण शेलार यांनी राज्यात केंद्राच्या डब्लूआयआय या संस्थेच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव संशोधन संस्थेची गरज असल्याची महत्वाची सूचना मांडली. राज्यात सध्या मानव-वन्यजीव संघर्ष, वनक्षेत्रामधून जाणारे पायाभूत प्रकल्पासंबंधी, वन्यजीवांकडून होणारे शेतपिकांचे नुकसान अशा बऱ्याच समस्या आहेत. या समस्यांचे निराकरण शास्त्रीयरित्या करण्यासाठी राज्य वन विभागाला दरवेळी डब्लूआयआयकडे उपाययोजनांसाठी जावे लागते. या पार्श्वभूमीवर प्रत्येकवेळी केंद्र सरकारच्या संस्थेकडे जाण्यापेक्षा राज्य स्तरावर वन्यजीव संशोधन संस्था असल्यास तिच्याकडून अधिक सोयीस्करित्या राज्यातील वन्यजीव संस्थाचे निराकरण होऊ शकते, या भावनेतून शेलार यांनी ही मागणी केली आहे.

सद्यपरिस्थितीत राज्य सरकार वन्यजीवांसंबधी समस्यांच्या निराकरणासाठी आवश्यक असणाऱ्या संशोधनात्मक उपायोयजनांचे काम डब्लूआयआयसारख्या सरकारी किंवा बीएनएचएस व अन्य खासगी वन्यजीव संशोधन संस्थांना देते. उदा. समृद्धी महामार्ग प्रकल्पामध्ये वन्यजीवविषयक उपाययोजनात्मक बांधकाम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संशोधनाची जबाबदारी ही डब्लूआयआयने पार पाडली. तर अटल सागरी सेतूच्या पर्यावरणीय उपाययोजनांचे काम हे बीएनएचएस या खासगी संस्थेने पूर्ण केले. या पार्श्वभूमीवर राज्यात स्वतंत्र वन्यजीव संशोधन संस्था निर्माण केल्यास त्या कामांचे विकेंद्रीकरण न होता ती एकाच पटलावर पार पाडली जातील.

संशोधन संस्थेची गरज

राज्यात आज कृषी आणि अन्य विभागाअंतर्गत काम करणाऱ्या अनेक संशोधन संस्था आहेत. यापार्श्वभूमीवर राज्याच्या वन विभागाच्या अंतर्गत वन्यजीव संशोधन संस्थेची निकड आहे. कारण, राज्यात आज वन्यजीवांसंदर्भातील अनेक समस्या आहेत. शिवाय अनेक प्रजातींवर काम करण्याची देखील गरज आहे. त्यामुळे आम्ही राज्यात वन्यजीव संशोधन संस्था स्थापन करण्यासाठी सकारात्मक आहोत. - एम. श्रीनिवास रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)


अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.