मुंबई : (JNU Rally) जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गुरुवारी विद्यार्थी संघटनेतर्फे शिक्षण मंत्रालयाकडे काढण्यात आलेल्या मोर्च्यानंतर वाद तीव्र झाला आहे. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (एआयएसए) आणि जेएनयू विद्यार्थी संघाने आरोप केला आहे की शांततापूर्ण आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करून ५१ विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून १४ विद्यार्थ्यांना अटक केलीय. अटक करण्यात आलेल्यांमध्ये विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संयुक्त सचिव, माजी अध्यक्ष तसेच आयसाच्या अखिल भारतीय अध्यक्षा यांचा समावेश आहे. याविरोधात विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरातून वसंत कुंज पोलीस ठाण्यापर्यंत पायी मोर्चा काढून सहकाऱ्यांच्या सुटकेची मागणी केली.
विद्यार्थी संघाच्या म्हणण्यानुसार, २६ फेब्रुवारी रोजी विविध मागण्यांसाठी हा दीर्घ मोर्चा काढण्यात आला होता. कायद्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम लागू करणे, कुलगुरूंनी केलेल्या कथित जातीय वक्तव्याबाबत माफी व राजीनामा, तसेच सरकारी शैक्षणिक संस्थांसाठी निधीवाढ या मागण्या त्यात होत्या. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की हे मुद्दे समान संधी आणि सामाजिक न्यायाशी संबंधित आहेत. प्रशासन संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग अवलंबत असल्याचा आरोप त्यांनी केला.
एआयएसए आणि विद्यार्थी संघाचा दावा आहे की, शेकडो विद्यार्थी शांततेत जमले असतानाही पोलिसांनी बळाचा वापर केला. अनेक विद्यार्थी जखमी झाले असून काहींना १४ तासांहून अधिक वेळ पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये विद्यार्थी संघ अध्यक्षा अदिती मिश्रा, संयुक्त सचिव दानिश अली, उपाध्यक्ष गोपिका आणि नितेश यांच्यासह १४ जणांचा समावेश आहे.
पोलीस उपायुक्त अमित गोयल यांनी सांगितले की जेएनयू परिसराच्या बाहेर मोर्चा काढण्याची परवानगी विद्यार्थ्यांकडे नव्हती. तरीही दुपारी सुमारे ३.२० वाजता ४००-५०० विद्यार्थी मुख्य प्रवेशद्वाराबाहेर निघून मोर्चा काढू लागले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंदोलकांनी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सची तोडफोड केली. आंदोलन उग्र झाल्याने काही विद्यार्थ्यांनी बॅनर, काठ्या आणि बूट फेकल्याचा आरोप आहे. काहींनी पोलिस कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की केल्याचेही सांगण्यात आले. या गोंधळात काही पोलिस जखमी झाले. पोलिसांनी आंदोलकांना जेएनयूच्या नॉर्थ गेटवर थांबवून टप्प्याटप्प्याने त्यांना पुन्हा परिसरात पाठवले. जे विद्यार्थी उग्र झाले होते आणि वैधानिक आदेशांचे पालन करत नव्हते, त्यांना ताब्यात घेण्यात आले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक