मुंबई : (Eknath Shinde) "लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत, अशीच काहीशी अवस्था अजितदादांच्या जाण्याने झाली आहे. दादा, राजकारणात आपण घेतलेले अनेक निर्णय अचूक होते हे जनतेच्या न्यायालयाने सिद्ध केले आहे. पण तुमचा हा जगाचा निरोप घेण्याचा निर्णय मात्र चुकला आहे. तो मागे घ्या आणि परत या, अशा भावूक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधान परिषदेत श्रद्धांजली वाहिली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर दिवंगत सदस्यांच्या शोकप्रस्ताव मांडताना ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक, माजी विधान परिषद सदस्य अशोक गजानन मोडक, गंगाधर पटने, निला देसाई या दिवंगत सदस्यांना देखील उपमुख्यमंत्र्यांनी श्रध्दांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मी, देवेंद्रजी आणि अजितदादा म्हणजे राज्याच्या स्थैर्याचा एक भक्कम 'ट्रँगल ऑफ स्टॅबिलिटी' होतो. आम्ही तिघे एकत्र आलो म्हणून महाराष्ट्राची भूमिती आणि प्रगती वेगाने सुरू होती. २८ जानेवारीच्या त्या काळ्या दिवसाने आमचा हा आधार हिरावून नेला. दादा वेळ कधीच चुकवत नसत, पण त्या दिवशी नियतीने मात्र घात केला. टीव्हीवर त्या अपघाताची दृष्ये पाहिली आणि मनाचा थरकाप उडाला."
"प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड होती. फाईल हातात घेतल्यावर काही सेकंदात त्यांची नजर कागदावरून स्कॅन व्हायची आणि त्यातील चुका ते चटकन शोधायचे. साध्या वायर लटकत असल्या किंवा पायरी नीट बसवलेली नसली तरी ते अधिकाऱ्यांना झापायचे. ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम दादा बाहेरून फणसासारखे कडक वाटत असले तरी आतून ते अत्यंत मृदू मनाचे होते. लाडकी बहीण योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद करताना त्यांनी अर्थकारणाचा समतोल उत्तम राखला होता," असेही त्यांनी सांगितले.
"आभाळाएवढे दुःख समोर असतानाही सुनेत्राताई खंबीरपणे उभ्या आहेत. आम्ही दोन्ही भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. दादांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 'विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही' ही दादांची घोषणा आम्ही सत्यात उतरवू," असा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....