अजितदादांच्या रुपाने महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री मिळाला असता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वक्तशीर दादांनी जीवनाचा टायमिंग चुकवला...

    23-Feb-2026   
Total Views |
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) "अजितदादा अनेकदा गमतीने म्हणायचे की, मी कधीतरी मुख्यमंत्री होईल पण मी नेहमी उपमुख्यमंत्री राहील. अजित पवार हे महाराष्ट्राचे सर्वोत्तम मुख्यमंत्री असते. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळू शकला असता. राजकारणात वेगवेगळी गणिते असतात. पण क्षमतेचा विचार केल्यास अजितदादांकडे मुख्यमंत्री होण्याची क्षमता होती," अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा गौरव केला.
 
विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा सभागृहात मांडण्यात आलेल्या शोक प्रस्तावावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक, माजी मंत्री डॉ. शालिनी पाटील, माजी राज्यमंत्री राज पुरोहित, माजी विधानसभा सदस्य गंगाधर पटने, निळकंठ फालक, विश्वास नांदेकर, रूपलेखा ढोरे यांनाही श्रद्धांजली वाहिली.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज ज्या शोक प्रस्तावासाठी आपण सगळे एकत्रित सभागृहात आहोत, अशा शोक प्रस्तावावर आपल्याला व्यक्त व्हावे लागेल अशी कधीच कल्पना केली नव्हती. सभागृहामध्ये सुरुवातीपासून तर अगदी रात्रीपर्यंत अजितदादा आपल्या जागी बसले असायचे. आज दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत याची खंत आहे. यावर्षी अजितदादांनी बारावा अर्थसंकल्प मांडला असता. पुढच्या वर्षी तेरावा अर्थसंकल्प मांडून त्यांनी बॅ. शेषरावजी वानखेडे यांची बरोबरी केली असती. कदाचित पुढच्या काळात ते महाराष्ट्रातील सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री ठरले असते. पण अचानकपणे दादा आपल्यातून निघून गेले आणि हा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी माझ्यावर आली."
 
पोकळी या शब्दाची खरी व्याख्या कळली
 
"कठोर निर्णय घेताना कधीही मागेपुढे न पाहणारे अजितदादा होते. लाडकी बहीण योजनेचा भार अर्थसंकल्पावर मोठ्या प्रमाणात पडणार असल्याने याचा पुनर्विचार करावा, असे वित्त विभागाने सुचवल्यानंतरही ठामपणे निर्णय घेऊन मंत्रिमंडळापुढे तो विषय आणणारे अजितदादा होते. अजितदादांसारख्या सहप्रवाशाचा मृत्यू होणे ही केवळ राजकीय हानी नसून सर्वांच्याच अंत:करणाला वेदना देणारी बाब आहे. कितीही काळ गेला तरी काही वेदना कमी होत नाही. अनेकदा राजकीय नेत्याच्या निधनानंतर पोकळी निर्माण झाली असे बोलले जाते. ज्यावेळी एखादा ज्येष्ठ नेता आपल्यातून निघून जातो त्यावेळी त्याची कमतरता जाणवते ती पोकळी नसते. परंतू, राजकीय क्षेत्रात स्थिरावलेले अजितदादांसारखे व्यक्ती निघून जातात तेव्हा पोकळी निर्माण झाली म्हणजे काय या शब्दाची व्याख्या लक्षात येते. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण आहे," असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
हेही वाचा : Bombay High Court : अनिल अंबानींना उच्च न्यायालयाचा दणका! कर्जखाते फसवी ठरवण्याच्या प्रक्रियेवरील स्थगिती उठवली
 
अंत:करणातून प्रेम करणारा मित्र
 
"अजितदादा आणि माझा दोघांचाही जन्म २२ जुलैचाच. ते माझ्यापेक्षा ११ वर्षांनी मोठे असल्याने माझे दादाच होते. एक दशकापेक्षा जास्त काळ आमची जवळीक होती. २०१४ नंतर दादांशी माझे एक भावनिक नाते तयार झाले. अंत:करणातून प्रेम करणारा मित्र म्हणून मी त्यांच्याकडे बघितले. जीवनभर हे नाते कायम राहिले. २७ तारखेला नेहमीप्रमाणे मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यानंतर पायाभूत सुविधा बैठक झाली. दादा ५ ते १० मिनिटे केवळ कामासंदर्भात बोलले. त्यानंतर जवळपास पाऊण तास आम्ही इतर विषयांवर चर्चा केली. ती आमची शेवटची भेट ठरेल असे कधीही वाटले नव्हते."
 
वक्तशीर असलेल्या दादांनी जीवनाचा टायमिंग चुकवला
 
"अजितदादा हे केवळ व्यक्तिमत्व नव्हते तर ते एक पिढीचा आत्मविश्वास होते. शेतकऱ्यांचा कळवला असलेले मातीतून तयार झालेले नेतृत्व होते. जागणारा नेता अशी त्यांची ओळख होती. २०१९ साली आम्ही ते अनुभवले. दादांच्या स्वभावात पारदर्शकता होती. जे पोटात आहे ते ओठात होते. अशावेळी ते राजकीय परिणामांची चिंता करत नव्हते. दादांची सर्वात महत्वाची सवय म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा होता. मंत्रालयात कुठल्याही अधिकाऱ्यापेक्षा लवकर पोहोचणारे ते होते. हा सगळा वक्तशीरपणा आणि घड्याळाच्या काट्यावर चालणे खरे असले तरी पहिल्यांदाच दादांनी जीवनाचे टायमिंग चुकवले आणि ही हळहळ नेहमीच राहील. राजकारणात अनेक दादांनी चांगले काम केले. पण वसंतदादा आणि अजितदादा या दोन नावांना 'दादा' म्हणून महाराष्ट्र त्यांच्या कामासाठी लक्षात ठेवेल," असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करताना मुख्यमंत्र्यांनी कवी पी. सावळाराम यांच्या गीताच्या ओळी वाचून दाखवल्या.
 
"जनसेवेचे बांधून कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकून
अर्पुन आपुले हृदयसिंहासन, नित भजतो मानवतेला
जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला"
 
या गीतातील हे कडवे दादांकरिताच लिहिले आहे का असे वाटते. महाराष्ट्राने एक नेता गमावला, प्रशासक गमावला, मी एक मित्र गमावला आणि आपण सगळ्यांनी आपल्या कुटुंबातील एक सदस्य गमावला आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलत का?- Chitra Wagh: ‘राष्ट्रवादी सोडताना दादांचा फोन आला, म्हणाले…’; चित्रा वाघ सभागृहात भावुक
 
सुनेत्रावहिनी दादांसारखेच दृढतेने काम करतील
 
सुनेत्रा वहिनींनी या बिकट परिस्थितीतही धीरोदात्त पद्धतीने दादांचे कार्य पुढे नेण्याचा निर्णय घेतला. आमचा सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे. त्यासुद्धा दादांसारखे दृढतेने काम करतील, असेही ते म्हणाले.
 
अजितदादांच्या मामांचे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
 
"अजितदादांचा जन्म राहुरी तालुक्यातील होता. त्यांच्या मामांचे कुटुंब कट्टर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते. त्यांचे मामा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी होते. दादांचे बालपण मामांच्या घराकडे गेले असल्याने त्यांना त्या कार्याची जाणीव होती. पण दादा काँग्रेसी विचार किंवा शरद पवार यांच्या नेतृत्वातून पुढे गेले. दादांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये राजकोषीय स्थैर्यनिर्मिती, विकासाभिमुख विस्तार, संरचनात्मक संतुलन या तीन गोष्टींवर त्यांचा भर असायचा. कुठल्याही मुख्यमंत्र्याला अजितदादांसारखा अर्थमंत्री पाहिजे. जो वास्तविकतेचा आरसा दाखवत असतानाच राज्याची वाटचाल थांबवणार नाही," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....